आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनवची नवी ‘शूटिंग रेंज’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘भारताचा एकमेव ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता खेळाडू’ हा पराक्रम अभिनवच्या नावावर आजमितीस आहे. दहा मीटर एअर रायफल शूटिंग या आवडत्या प्रकारात जगज्जेता ठरलेलासुद्धा अभिनव हाच एकमेव भारतीय. कॉमनवेल्थ स्पर्धांमधली चार सुवर्णपदके त्याच्या गळ्यात आहेत. पाच ऑलिम्पिक स्पर्धा खेळलेला अभिनव यापुढे कोणत्याच स्पर्धेत नेम धरणार नाही. हातातली रायफल त्याने कायमची खुंटीला टांगली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले तेव्हाच निराश झालेल्या अभिनवने शूटिंग रेंजमधून काढता पाय घेण्याचे निश्चित केले होते. त्याच ऑलिम्पिकमध्ये साक्षी-सिंधू यांनी जिंकलेल्या दुर्मिळ पदकांच्या चकचकाटात दिग्गज अभिनवच्या मावळण्याची तितकीशी दखल भारतीयांनी घेतली नाही.

एका तपाहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय दबदबा निर्माण केलेला अभिनव फक्त ३३ वर्षांचा आहे. हे खरे तर निवृत्तीचे वय नाही. रायफल शूटिंग या क्रीडा प्रकारात तर नाहीच नाही. आंतरराष्ट्रीय पदकांचा दमदार इतिहास आणि अथक मेहनत घेण्याचा गुण जवळ असल्याने सहावे ऑलिम्पिक खेळण्याची संधी तो सहज घेऊ शकला असता. पण निवृत्तीचा क्षणही त्याने अचूक टिपला. शिखरावर असताना थांबण्याचे भान भल्याभल्यांना दाखवता येत नाही.
इतिहास उगाळण्याचा अभिनवचा स्वभाव नाही आणि झालेल्या चुकांच्या रडकथा सांगत बसण्यातही त्याला रस नाही. त्याच्याच शब्दांत सांगायचे तर “नव्या खेळाडूंवर विश्वास टाकण्याची वेळ आली आहे. रिओत काय चुकले यात मला वेळ घालवायचा नाही. भविष्यात देशाची कामगिरी कशी सुधारेल यावर मी लक्ष केंद्रित करणार आहे.’ अभिनवचे हे स्वप्न प्रचंड आव्हानात्मक आहे.

‘स्पोर्ट सायन्स’ या आधुनिक शाखेच्या उदयानंतर क्रीडा क्षेत्र प्रचंड बदलले. एखाद्या दशांश सेकंदांच्या फरकाने अनेक वर्षांची मेहनत क्षणात उद्ध्वस्त करणारी टोकदार स्पर्धात्मकता येथे आली आहे. रायफल शूटिंगसारख्या महागड्या खेळाची तर बातच और. सुदैवाने गर्भश्रीमंत घरात वाढल्याने अभिनवला आर्थिक अडचणी आल्या नाहीत. त्याच्या वडलांनी घरातच त्याला अद्ययावत शूटिंग रेंज उपलब्ध करून दिली. लाखो रुपयांच्या रायफल्स त्याच्या हाती आल्या. घरच्या श्रीमंतीमुळेच अभिनव पुढे गेला असे म्हणणे मात्र त्याच्यावर सपशेल अन्याय करणारे ठरेल. मैदानात उतरल्यानंतर तुमची आर्थिक, कौटुंबिक पार्श्वभूमी कवडीमोल असते. मैदानात फक्त आणि फक्त तुमची गुणवत्ताच तारून नेते. अभिनवने पंधराव्या वर्षापासूनच ऑलिम्पिक पदकाच्या लक्ष्यावर नेम धरला होता. घरच्या आर्थिक पाठिंब्यामुळे तो सरावावर लक्ष केंद्रित करू शकला इतकेच.

जर्मन आणि इटालियन प्रशिक्षकांकडून धडे गिरवण्यासाठी त्याने देशाच्या सीमा ओलांडल्या. हे करत असताना भारतीय खेळाडूंनी सल्ला मागितला तर अभिनवच्या शूटिंग रेंजचे दरवाजे त्यांच्यासाठी कायम खुले असायचे. स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केल्यानंतरही अभिनवला सरकारी लालफितीचे अडथळे आडवे येत राहिले. त्या वेळी दोषारोपात शक्ती वाया घालवण्याऐवजी तो मार्ग शोधून पुढे जात राहिला.

सचिन तेंडुलकर, विश्वनाथन आनंद आणि अभिनव बिंद्रा या क्रिकेट, बुद्धिबळ आणि शूटिंगमधल्या जगज्जेत्यांमधले साम्य काय असेल तर हेच. आकाश कोसळले तरी लक्ष्यापासून विचलित होण्याचा त्यांचा दृढनिश्चय. दुर्दैव हे की एकूणच भारतीय क्रीडा व्यवस्थेतला नेमका दोषदेखील हाच आहे. वैयक्तिक पातळीवर संघर्ष करून जग जिंकणारे खेळाडू भारतात तयार होतात. मात्र गावखेड्यांमध्यल्या लहान मुलांमध्ये, आदिवासी पाड्यांवरच्या पोरांमध्ये, शहरांमधल्या अफाट गर्दीत लपलेली गुणवत्ता शोधून त्याला पैलू पाडणारी सामूहिक क्रीडा संस्कृती आपल्याकडे तयार होऊ शकत नाही.

पुढच्या दोन ऑलिम्पिकचे ध्येय ठेवून खेळाडू शोधण्याची आणि त्यांना घडवण्याची जबाबदारी पेलणारे राज्यकर्ते, धोरणे अमलात आणणारे प्रामाणिक सरकारी बाबू, झोकून देणारे निष्ठावान क्रीडा प्रशिक्षक आणि या सगळ्यांना साथ देणारा क्रीडाप्रेमी समाज अशी सामूहिक मोट बांधली जाईल; तेव्हा ‘भारताचा एकमेव सुवर्णपदकविजेता’ या सिंहासनावरचे अभिनवचे एकाकीपण दूर होण्याची शक्यता निर्माण होईल. हृदयाच्या दोन ठोक्यांमध्ये जितके अंतर असते तेवढ्या क्षणात अचूक लक्ष्यभेद करण्याचे कसब अभिनवने कष्टपूर्वक कमावले होते. त्याचा अनुभव देशासाठी नवे ‘गोल्डन बॉय’ घडवण्याच्या कामी तो लावणार आहे. या नव्या शूटिंग रेंजवरही त्याच्याकडून अपेक्षा ठेवता येतील.
(विशेष प्रतिनिधी, पुणे ब्यूरो)
बातम्या आणखी आहेत...