आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘खेलरत्न’ची इतिकर्तव्यता! (सुकृत करंदीकर )

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीव्ही सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर व जितू राय या बहाद्दरांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला. सिंधू आणि साक्षीप्रमाणे दीपा व जितू या दोघांना ऑलिम्पिक पदक जिंकता आले नसले तरी त्यांनी उच्च स्पर्धात्मकता दाखवली. खेळात अनेकदा नशिबाचा हातचा गरजेचा ठरतो. तो असता तर दीपा आणि जितू यांनीही पदके जिंकली असती. महाराष्ट्राची ललिता बाबर ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धावली. हा पराक्रम तिला अर्जुन पुरस्कार देऊन गेला. हे सर्व खेळाडू कारकीर्दीच्या पहिल्या टप्प्यात आहेत; म्हणूनच त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप वेळेत पडणे आवश्यक होते. ती तत्परता सरकारने दाखवली. यांना मिळणारे प्रोत्साहन उगवत्या खेळाडूंनाही प्रेरणा देईल.

सव्वाशे कोटींच्या भारताला अवघी दोन पदके मिळाल्याचे किती कौतुक करायचे, असा प्रश्न काहींना पडला. ‘आपल्यापेक्षा लहान व गरीब अाफ्रिकी देशांनी भारतापेक्षा जास्त पदकांची लयलूट केली. शेजारचा चीन कुठे पोचला ते बघा,’ असा शेलका सवाल विचारला जातो आहे. सत्य नाकारण्यासारखे नसले तरी ही तुलना अनाठायी असल्याचे म्हणावे लागते. ऑलिम्पिक पदकांच्या संख्येवरून भारताची क्षमता जोखणे गैर आहे. भारताच्या इतिहासातील सर्वाधिक खेळाडू यंदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होते हे विसरून चालणार नाही. ऑलिम्पिकच्या १४ खेळांसाठी भारताचे ११८ खेळाडू पात्र ठरले. आता खेळ फक्त ‘खेळ’ उरलेला नाही. क्रीडा कौशल्यासोबत शरीरशास्त्र, औषधशास्त्र, योगशास्त्र, आहारशास्त्र, मानसशास्त्र आणि तंत्रज्ञान या सगळ्याचा आधार घेतला जातो. अत्याधुनिक ‘स्पोर्ट्स सेंटर’ हे जागतिक खेळाडूंचे उत्पादन करणारे कारखाने बनले आहेत. अंगभूत गुणवत्ता, खेळावरची निष्ठा आणि अथक कष्ट एवढ्या शिदोरीवर आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचे दिवस केव्हाच संपले. वेग, शक्ती, दम, लवचिकता यातील वर्चस्व सिद्ध करण्याचे व्यासपीठ म्हणून जागतिक क्रीडा स्पर्धांकडे पाहिले जाते. ही ‘क्रीडा संस्कृती’ भारतीयांसाठी नवी आहे. बाळपणीची करमणूक किंवा आरोग्यवर्धन एवढ्या माफक उद्देशाने खेळांकडे पाहणारे भारतीय या बदलांशी जरा उशिरानेच जुळवून घेत आहेत. सध्याचा सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली त्याच्या फिटनेस आणि आहारावर आज जितके लक्ष देतो तेवढे लक्ष देण्याची गरज गावस्कर-तेंडुलकरला कधी भासली नाही. मानसिकतेतला हा फरक पाहता भारताच्या ऑलिम्पिक कामगिरीबद्दल फार निराश होण्याची गरज नाही.
खेळांकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टिकोन बदलण्याची सुरुवात आता कुठे झाली आहे. डोपिंगमध्ये बाद ठरलेला नरसिंग यादव राजकारणाचा बळी ठरला की त्याने गुन्हा केला याचे उत्तर केवळ त्याच्याकडेच आहे. मात्र गळेकापू स्पर्धा या दोन्हीच्या मुळाशी होती हे नक्की. खेळ ‘करिअर ऑप्शन’ झाल्याचे हे द्योतक आहे. कॉर्पोरेट क्षेत्र ठराविक खेळांसाठी का होईना पण पैसा ओतू लागले आहे. बिगरसरकारी व्यवस्थापन असल्यावर किती उंची गाठता येते हे बीसीसीआयकडे पाहिल्यानंतर स्पष्ट होते. इतर अनेक खेळांना अजूनही सरकारी लाल फितीचा विळखा आहे. मॅरेथॉन धावणाऱ्या ओ. पी. जैशाला पाणी देण्यासाठी सहायक नसतो, पण त्याच रिओ ऑलिम्पिकमध्ये देशाचे क्रीडामंत्री ‘सेल्फी’वरून वादात सापडतात. ऑलिम्पिक पदकांचे घोस आणणे भारतासाठी किती सोपे आहे, यावर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान होण्यापूर्वी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात चमकदार भाषण झोडले होते. राज्यकर्त्यांची अनास्था हे गेल्या सत्तर वर्षांपासूनचे क्रीडा क्षेत्राचे दुखणे आहे. ऑलिम्पिकवीर रात्रीतून जन्मत नाहीत. त्यासाठी सर्व राज्ये, कॉर्पोरेट क्षेत्र, क्रीडा संघटना यांचा मेळ घालून राष्ट्रीय मोहीम राबवावी लागेल. खंडप्राय भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन खेळ निवडावे लागतील. गुणवान देशी-विदेशी प्रशिक्षकांची फळी तयार ठेवावी लागेल. ‘भावी’ ऑलिम्पिकवीर शाळांमधून शोधावे लागतील. साडेपाच हजार मीटरवर जगातल्या सर्वात उंच सियाचीन रणक्षेत्रात उणे पन्नास अंश तापमानात तग धरणाऱ्या भारतीयांमध्ये शारीरिक क्षमता नाही असे कोण म्हणेल? सॉफ्टवेअर, मेडिकल, अवकाश विज्ञान यात अव्वल असणाऱ्या भारतीयांना तंत्रज्ञानाचेही वावडे मुळीच नाही. ध्येयाच्या दिशेने सातत्यपूर्ण वाटचाल करण्याचा वस्तुपाठ सिंधू-साक्षीने घालून दिला आहे. त्यांना खेलरत्न दिल्याने इतिकर्तव्यता पार पाडल्याच्या समाधानात सरकारने राहू नये म्हणजे मिळवले.

(विशेष प्रतिनिधी, पुणे)
बातम्या आणखी आहेत...