आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचा मुख्यमंत्री की लोकनेता?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सन १९९२ मध्ये देवेंद्र फडणवीस नागपुरात नगरसेवक झाले. पुढे महापौर आणि १९९९ पासून विधानसभा ही त्यांची राजकीय चढण आहे. सार्वजनिक जीवनातल्या रौप्यमहोत्सवी वर्षात फडणवीस थेट राज्याचे मुख्यमंत्री आहेत. संसदीय राजकारणातली पंचविशी याच आठवड्यात साजरी करत असताना त्यांचे वय जेमतेम ४७ वर्षांचे आहे. 
 
हेवा वाटावा असा हा राजकीय प्रवास आहे. दुसऱ्या बाजूला शरद पवार आहेत. योगायोगाने पवारही याच आठवड्यात त्यांच्या संसदीय राजकारणाची अपराजित पन्नाशी साजरी करत आहेत. पंतप्रधान आणि राष्ट्रपती ही पदे वगळल्यास काही कमावण्यासारखे पवारांपुढे उरलेले नाही. 
 
मात्र, फडणवीसांच्या बाबतीत नेमके उलटे चित्र आहे. पहिली पंचविशी सोपी म्हणावी, असा अवघड काळ फडणवीसांपुढे उभा ठाकला आहे. लोकांमधून सातत्याने निवडून येत जास्तीत जास्त काळ सत्तेत राहण्याची किमया दोनच गोष्टींमुळे साध्य होते. लोकांचा अमर्याद पाठिंबा आणि निष्ठावंतांची फौज. पवारांनी हे साधले.
 
फडणवीसांकडे या दोन्हींचा अभाव दिसतो. पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरचे राजकीय गणगोत वाढवण्यात आणि ते सांभाळण्यात फडणवीसांची हातोटी दिसलेली नाही. मुख्यमंत्रिपदाची खुर्ची आज आहे, उद्या नसेल. पक्षनेतृत्वाच्या विश्वासामुळे त्यांचे पद भक्कम आहे. फडणवीसांचा प्रयत्न ‘लोकनेता’ होण्याचा आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या आधी व नंतर असा ‘लोकनेता’ भाजपला महाराष्ट्रात गवसलेला नाही. 
 
निवडणुका जिंकून देणारा, सहकाऱ्यांना निवडून आणू शकणारा, ठरवून एखाद्याला पराभूत करू शकणारा पुढारी ‘लोकनेता’ ठरतो. फडणवीसांना पक्षांतर्गत आव्हान फारसे नाही. चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे, गिरीश महाजन अशा चार-दोन नावांनंतर राज्यव्यापी किमान ओळख असलेले मंत्री भाजपमध्ये शोधावे लागतात. या पार्श्वभूमीवर फडणवीस महाराष्ट्राचा विश्वास कमावण्याची कठीण कामगिरी साधण्याच्या प्रयत्नात आहेत.  
 
नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपचे यापूर्वी कधी नव्हे इतके सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले. हे यश फडणवीसांच्या  खात्यात  जमा झाले. आताही  दहा महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतला भाजपचा प्रचार फडणवीसांना केंद्रस्थानी ठेवून झाला. फडणवीसांचा चेहरा समोर ठेवून मते मागण्यात आली. शरद पवार, ठाकरे बंधू यांच्यापासून अशोक चव्हाण, ओवैसी आदींपर्यंतच्या सर्वांच्या टीकेचे लक्ष्य नरेंद्र आणि देवेंद्र होते.
 
फडणवीसांकडची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची हे एकमेव कारण यामागे नव्हते. भाजपचा चेहरा म्हणून मोठी होत जाणारी फडणवीसांची प्रतिमा तितकीच कारणीभूत ठरली. साहजिकपणे उद्याच्या यशापयशाचे शिल्पकार म्हणून फडणवीसांची नोंद होईल.
 
या वेळच्या निवडणुकीत म्हटले तर भाजपला गमावायचे काहीच नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधल्या जेमतेम अकरा टक्केसुद्धा जागा सध्या भाजपकडे नाहीत. महापालिकांमध्ये हीच स्थिती. नागपूर-अकोला वगळता उर्वरित आठ महापालिकांमध्ये भाजपचा महापौर नाही.
 
ही दोन शहरे राखून त्यात आणखी एक-दोन महापौरांची भर पडली तरी मुख्यमंत्र्यांनी बाजी मारल्याचे तांत्रिकदृष्ट्या सिद्ध होईल. भाजप नगरसेवकांच्या संख्येतली वाढ हेसुद्धा तांत्रिक यश मानले जाईल. खरे मोजमाप होईल ते शिवसेनेची सत्ता असणाऱ्या मुंबई, ठाणे आणि ‘राष्ट्रवादी’च्या ताब्यातल्या पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावतीतल्या कामगिरीच्या आधारे. 
 
फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाच्या पुढच्या वाटचालीवर उद्याच्या निकालांचा गडद ठसा उमटणार आहे. फडणवीसांना याची पुरती जाणीव होती. म्हणूनच त्यांनी जवळपास साठ सभांचा धडाका लावला. मुंबईत शिवसेनेपेक्षा एक जरी जागा भाजपने जास्त जिंकली तर त्यापेक्षा मोठे यश भाजप आणि फडणवीसांसाठी दुसरे नसेल. महापालिकांमध्ये सपशेल अपयश पदरी आले तर मात्र दिल्लीश्वरांच्या फडणवीसांवरील विश्वासाला ओहोटी लागू शकते. पक्षांतर्गत विरोधकांच्या कुरघोड्यांना बळ मिळू शकते.  

महापालिकांच्या निकालापाशीच फडणवीसांपुढचे  प्रश्न संपत नाहीत. लोकांपुढे मतांचा जोगवा मागत असताना उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीविषयी भाजपने आरोप केले. ‘जे बोलतो ते करतो,’ ही पारदर्शकता फडणवीस दाखवणार की त्यांचे शब्द म्हणजे केवळ प्रचारातले मनोरंजन ठरणार यावर लोकांची बारीक नजर असेल.
 
‘काँग्रेस-राष्ट्रवादी’च्या कथित भ्रष्ट मंत्र्यांविरुद्धची कारवाई, आरक्षणे, स्मारके, शेती आदींबद्दलचे अनेक शब्द फडणवीसांनी यापूर्वीच दिले आहेत. या सर्वांची खिल्ली उडवणारे ‘गाजर कँपेन’ सोशल मीडियातून चांगलेच गाजते आहे. 
 
‘गाजरवाला’ की ‘लोकनेता’ ही प्रतिमा ठसवण्यासाठी फडणवीसांपुढे फार अवधी शिल्लक नाही. विधानसभा-लोकसभेची लढाई अडीच वर्षांवर आली आहे. या दृष्टीने मोदी-शहांच्या कृपेवर नाही, तर जनतेच्या पाठिंब्यावर मी राज्य सांभाळू शकतो, हा संदेश फडणवीस देऊ इच्छितात.
 
वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या शरद पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या एका ज्येष्ठ लोकनेत्याची राजकीय कारकीर्द अस्ताला जात असताना पन्नाशीही न ओलांडलेला, पण संसदीय कारकीर्दीची अपराजित पंचविशी पूर्ण केलेला दुसरा नेता उदयास येऊ पाहत आहे. यासंदर्भात लोकांनी घ्यायचा तो निर्णय घेतला आहे. येत्या काही तासांत तो जाहीर झालेला असेल.
बातम्या आणखी आहेत...