Home | Editorial | Agralekh | sunita williams takes off on her second space odyssey

सुनीताची दुसरी अंतराळ झेप

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jul 16, 2012, 10:45 PM IST

अमेरिकी अंतराळयात्री सुनीता विल्यम्स यांची दुसरी अंतराळ झेप यशस्वी झाली आहे.

  • sunita williams takes off on her second space odyssey

    अमेरिकी अंतराळयात्री सुनीता विल्यम्स यांची दुसरी अंतराळ झेप यशस्वी झाली आहे. आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या यानाची कक्षा स्थिर होईल. त्यानंतर त्या पृथ्वीपासून 410 किमी अंतरावर घिरट्या मारणा-या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात आपले यान उतरवतील व नंतर तेथून काम करण्यास सुरुवात करतील. वास्तविक विज्ञानाने इतकी प्रगती केली असताना अवकाशात जाऊन प्रयोग करण्याची गरज काय, असा साधा प्रश्न कोणालाही पडू शकतो; पण ते तसे नाही. कारण अवकाशात असणारी परिस्थिती ही पृथ्वीवरील प्रयोगशाळांमध्ये हुबेहूब तयार करण्यास बरेच अडथळे येत असतात. उदाहरणार्थ, पृथ्वीवर शून्य गुरुत्वाकर्षण (झीरो ग्रॅव्हिटी) किंवा सूक्ष्म गुरुत्वाकर्षण (मायक्रो ग्रॅव्हिटी) प्रदीर्घ काळासाठी निर्माण करणे तसे खर्चिक आणि कठीण असते. असे केले तरी त्यामुळे वैज्ञानिक प्रयोगांवर अनेक मर्यादा येऊ शकतात. वैज्ञानिक नोंदींमध्ये अचूकता येण्याची शक्यता कमी होते. जे अंतराळवीर अंतराळात प्रयोग करणार आहेत, त्यांच्या शारीरिक-मानसिक अवस्थांचा आलेख पृथ्वीवरील प्रयोगशाळेत अचूक येत नाही. हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी अवकाशातच एक स्थानक बांधून तेथे अंतराळवीरांच्या राहण्याची व्यवस्था करून त्यांच्या मदतीने प्रयोग करण्याची अभिनव कल्पना पुढे आली. अमेरिकी अवकाश संस्था ‘नासा’ने या कामी पुढाकार घेऊन अवकाशात एक स्थानक बांधले. या अवकाश स्थानकात मानवासोबत रोबोटनाही सामील केले जात असल्याने आता सर्वच अवकाश मोहिमांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अवकाश स्थानकात प्रयोग करण्याचे फायदे असे की, मानवाला त्याच्या शारीरिक आणि मानसिक मर्यादाही समजल्या. अवकाशातील शून्य गुरुत्वाकर्षणामध्ये अनेक दिवस काम करण्याची व तेथे प्रदीर्घ काळ राहण्याची क्षमताही मानवाने विकसित केली. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक ही एक प्रयोगशाळाच असल्याने अनेक वैज्ञानिक प्रयोगांची निरीक्षणे/नोंदीही अवकाशात मिळू लागल्या. या निरीक्षणांमुळे दरवेळच्या नव्या अवकाश मोहिमांसाठी कोणती उद्दिष्टे असावीत याचे अंदाज मिळू लागले. जे अंतराळवीर अवकाशात राहून आले आहेत त्यांचे अनुभव, त्यांनी केलेले शास्त्रीय प्रयोग आणि निरीक्षणे नव्या अंतराळवीरांच्या मदतीला, अभ्यासाला येऊ लागले. सध्याच्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अमेरिकेशिवाय फ्रान्स, चीन, जपान, रशिया या देशांचेही अंतराळवीर ये-जा करत असल्याने अवकाश संशोधनात बरीच मदत झाली आहे. भविष्यात चंद्र आणि मंगळ ग्रहाला ‘टुरिस्ट डेस्टिनेशन’ तयार करण्याची मानवाची महत्त्वाकांक्षा आहे. त्या दृष्टीने त्याचे प्रयत्नही सुरू आहेत. या प्रयत्नांचा एक टप्पा हे अवकाश स्थानक आहे हे लक्षात घेतले पाहिजे. ज्या ब्रह्मांडाच्या जन्माविषयी अनादि अनंत काळापासून मानवाला उत्सुकता आहे, त्या ब्रह्मांडाच्या जन्माचा छडाच लावण्याचा चंग विज्ञानाने बांधला आहे. काही दिवसांपूर्वी युरोपातील सर्न या प्रयोगशाळेत वैज्ञानिकांनी हिग्ज-बोसॉन कणांचा शोध लावून विज्ञानात एक मोठी झेप घेतली होती. त्यानंतर सुनीता विल्यम्स यांची अवकाशवारी ही वैज्ञानिक घटनाक्रमांतील आणखी एक सकारात्मक घटना म्हटली पाहिजे. सुनीता विल्यम्स यांनी या अगोदर डिसेंबर 2006मध्ये अवकाशात झेप घेतली होती. त्या वेळी त्या तेथे 195 दिवस इतका काळ थांबल्या होत्या. तसेच त्या वेळी त्यांनी चार वेळा स्पेसवॉकही केला होता. या वेळीही सुनीता विल्यम्स नोव्हेंबरपर्यंत अवकाशात राहणार आहेत. त्यांच्यासोबत रशिया आणि जपानचे अंतराळवीर असून अवकाश स्थानकात सध्या तीन अंतराळवीर आहेत. हे सर्व जण सुमारे 30हून अधिक वैज्ञानिक प्रयोग करणार आहेत. या वैज्ञानिक प्रयोगासाठी जपानचे एक कार्गो यान पुढील आठवड्यात येणार आहे. या अवकाश मोहिमेचे एक वैशिष्ट्य इतिहासात कोरले जावे म्हणून नासाने सुनीता विल्यम्स यांच्यासाठी ‘व्होटिंग फ्रॉम स्पेस’ हा कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमांतर्गत सुनीता विल्यम्स नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत होणा-या अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी ही बाब गौरवशाली आहे; पण एक मतदार म्हणून आपला हक्क बजावणा-या सुनीता विल्यम्स यांचा हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. येत्या काही दिवसांत लंडन ऑलिम्पिकला सुरुवात होत असून ही स्पर्धा अवकाशातून बघणार असल्याचे सुनीता विल्यम्स यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामार्फत होणारे संशोधन ही कोणत्याही एका देशाची मक्तेदारी नाही. हे संशोधन म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध देशांचे सहकार्य आहे. आंतरराष्ट्रीय सामंजस्य व शांतता या व्यापक भावनेतूनच 1896 पासून ऑलिम्पिकची स्पर्धा भरवली जात आहे. योगायोगाने यंदा या दोन्ही घटना एकाच वेळी घडत असल्याने मानवी इतिहासातील हा एक सुवर्णक्षण म्हटला पाहिजे. आपल्याकडच्या प्रसारमाध्यमांनी सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या असल्याचा डांगोरा पहिल्यापासून पिटला होता. ‘सुनीता विल्यम्स यांनी अवकाशात गणपती नेला, जिलेबी आणि फाफडा नेला’, अशा संकुचित व हीन दर्जाच्या बातम्या न्यूज चॅनेल्सनी देण्यास सुरुवात केली आहे. वास्तविक सुनीता विल्यम्स या जन्माने अमेरिकनच आहेत. त्यांचे वडील भारतीय आहेत, इतकाच त्यांचा भारतीयत्वाशी संबंध आहे. आपल्याकडे भारतीय वंशाच्या पण अमेरिकेत जन्माला आलेल्या एखाद्या व्यक्तीने अमेरिकेतील सार्वजनिक जीवनात एखादे यश कमावले तर त्याचा उगाचच गहजब माजवण्याची फॅशनच झाली आहे. कल्पना चावला, बॉबी जिंदाल यांच्याबाबतही असाच प्रचार करण्यात आला होता. मीडियाचे असले वर्तन म्हणजे आपल्या नाकर्तेपणावर पांघरूण घालण्याचा एक प्रयत्न असतो; पण त्याचबरोबर भारतीय असल्याचा वृथा अभिमान वा गर्व समाजात पसरवण्याचा एक डाव असतो. ‘आंतरराष्ट्रीय अवकाश संस्था’ ही अखिल मानव जातीच्या प्रगतीचे एक प्रतीक आहे. तेथे येणारा कोणताही अंतराळवीर ‘मी अमुक देशाचा आहे’, असे सांगत नाही. सुनीता विल्यम्स यांच्या भारतीय वंशत्वाबद्दल गर्व वाटण्याऐवजी एक महिला अंतराळात जाऊन मानव जातीच्या उन्नतीसाठी प्रयत्न करत आहे, एवढी कृतज्ञता आपण ठेवली पाहिजे. विज्ञानाला जात-धर्म-वंश यांच्या सीमा नसतात. ते अखिल मानव जातीच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असते, एवढी सारासार विवेकबुद्धी ठेवली तरी खूप झाले.Trending