आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक जाणिवांचा आधारवड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अत्यंत आधुनिक विचार, सामाजिक भान, माणसे जपण्याचा अव्यभिचारी स्वभाव आणि दुस-या च्या मताविषयी कमालीचा आदर हे डॉ. शरच्चंद्र गोखले यांच्या स्वभावाचे पैलू म्हणता येतील. ते गेले तेव्हा माझ्या मनात स्वाभाविकच त्यांच्याविषयीच्या या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. केसरीत त्यांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळाली. त्याआधी ते केसरी-मराठा संस्थेचे विश्वस्त म्हणून परिचित होते, पण ते तसे दर्शन दुरूनच होते. संपादकीय बैठकीत त्यांच्या जगभरातल्या नेत्यांच्या ओळखी आम्हाला वैचारिक खाद्य पुरवायच्या. एका क्षणापूर्वी आलेला दूरध्वनी हा राजीव गांधींचे सल्लागार जी. पार्थसारथी यांचा होता आणि त्यांनी आपल्याला उद्या दिल्लीला बोलावले आहे, असे ते सहज सांगून जात. मोबाइल नसलेल्या त्या काळात कोणताही संवाद ते कधी चोरून करत नसत. आम्ही सगळे त्यांच्या लेखी लहान मुलेच असल्याने की काय, ते आम्हाला एकेरीतच संबोधत. त्यांचा हा स्वभाव मूलत: ‘पुणेरी’ असल्याचे आम्हाला वाटले तरी ते तसे नव्हते. सगळ्यांशीच त्यांचा तसा व्यवहार होता. त्यांचे वडील हे केसरीत स्वातंत्र्यपूर्व काळात संपादक होते, पण त्यांचे ते पद काही काळच टिकले ही खरे तर त्यांची रुखरुख असावी, असा आमचा त्या वेळचा समज होता. केसरीचे संपादकपद स्वीकारण्याची गळ त्यांना तेव्हा जयंतराव टिळकांनी घातली आणि त्यांनी ती फार आढेवेढे न घेता मान्यही केली. त्या वेळी त्यांनी आपल्या संपादक पदाविषयी लोकसत्तेचे तेव्हाचे संपादक माधवराव गडकरी यांच्याशी चर्चा केली होती. केसरीकडे माणसांचा ओघ त्याआधीच्या काळापासूनच होता. कारण जयंतरावांसारख्या साक्षेपी व्यक्तीकडे त्या वृत्तपत्राचे नेतृत्व होते. पण डॉ. गोखले संपादक झाल्यापासून आंतरराष्‍ट्री य क्षेत्रात काम करणा-या मंडळींची रीघ लागल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी रविवार केसरीसाठी दोन स्वत:चीच सदरे सुरू केली. मैफल आणि आकाशपत्रे ही ती दोन सदरे. अनेक थोरामोठ्या व्यक्तींच्या मुलाखतींवर आधारलेले ‘मैफल’ हे सदर होते, तर ‘आकाशपत्रे’ या सदरामध्ये त्यांचे लेखन हे प्रामुख्याने जगभरात हिंडताना त्यांना जे अनुभव आले आणि जी माणसे अनुभवायला मिळाली त्याविषयी होते.

समाजकल्याण हा त्यांचा ध्यास नक्कीच होता. त्यांनी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑ फ सोशल सायन्सेसची निवड केली आणि या संस्थेच्या वतीने जिथे जिथे काम करण्याची संधी मिळेल तिथे ते न कुरकुरता गेले. दिल्लीत आणि कुरुक्षेत्रावरही ते गेले. तिथे त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सरदार पटेल यांच्या आगेमागे स्वयंसेवक म्हणूनही काम केले. टाटा इन्स्टिट्यूटमध्ये त्यांना डॉ. सुबोधचंद्र रॉय, डॉ. कुमारप्पा, डॉ. बेहराम मेहता यांचे मार्गदर्शन लाभले. त्या संस्थेत शिकत असतानाच त्यांना त्या वेळच्या समाजकल्याण खात्याकडून बोलावणे आले आणि त्यांनी तिथे काम करण्याचे मान्य केले. त्या वेळी समाजकल्याण खात्याला ‘ज्युवेनाइल अँड बेगर्स डिपार्टमेंट’ म्हणून ओळखले जात होते. मागास वर्ग आणि आदिवासी यांच्याकरिता ‘बॅकवर्ड क्लास वेल्फेअर डिपार्टमेंट’ असे. तेव्हा नोकरशाहीत मुरलेल्यांना समाजशास्त्र शिकवायला टाटा इन्स्टिट्यूटची आवश्यकताच काय असेही वाटे; त्यामुळे संघर्ष हा अपरिहार्य होता, पण डॉ. गोखले हे तेव्हाही ‘गोडबोले’च होते. त्यांनी कुणाशी भांडणतंडण न करता नेहमीच मार्ग काढला. पुढे त्यांच्याकडे रिमांड होमविषयक कामही आले. तिथे त्यांना अधिक अनुभवसमृद्ध होता आले.

लहान मुलांचे शोषण हा सर्वात मोठा गुन्हा मानला पाहिजे, या भूमिकेतून त्यांनी नंतर केंद्र सरकारकडे त्याविषयीचा कायदा करायचा आग्रह धरला. पुढे त्याच भूमिकेतून त्यांनी ‘कम्युनिटी एड अँड स्पॉन्सरशिप प्रोग्रॉम’ (कास्प) या संस्थेची स्थापना केली. मुंबईला त्यांनी भिक्षाप्रतिबंधनाचे आणि कुष्ठनिवारणविषयक सरकारी कामही स्वीकारले होते. तिथले अनुभवविश्व कितीतरी आगळेवेगळे होते. कुष्ठरोग्यांच्या संस्थेत ते राहायलाही गेले. तिथे त्यांना रस्त्यावरचे जग काय आहे ते अर्थातच कळले.

एकदा ते भिका-या ंच्या शोधार्थ निघाले. रीगल चित्रपटगृहाबाहेर त्यांना एक भिकारी भेटला. त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी विचारले, काय करतोस? त्यावर तो म्हणाला की आज मी आंधळा आहे, मला पुरेसे पैसे मिळाले तर मग मी सिनेमा पाहणार आहे. एकदा एक पांगळा भिकारी कुबड्या टाकून दोन पायांवर पळत सुटल्याचा त्यांचा अनुभव आगळाच होता. एक भिकारी गळ्यात अजगर अडकवून उभा होता. तेव्हा बरोबरच्या पोलिसाने त्यांना आपल्याला नागाचा शाप भोवेल, म्हणून त्याला पकडायला नकार दिला. ते भिका-या ला पकडायला गेले, तर तो अजगर त्याने त्यांच्याच गळ्यात अडकवून पोबारा केला. अशा कितीतरी गमती ऐकवून ते आमची करमणूकही करत.

त्यांच्या कारकीर्दीतला मला आवडलेला सर्वात मोठा निर्णय कोणता, असे जर मला विचारले तर मी त्यांचा केसरीला ब्रेल लिपीत प्रकाशित करण्याचा निर्णय असे सांगेन. आज कोणतेही मराठी वृत्तपत्र ब्रेलमध्ये छापले जात नाही. त्यांनी हा प्रयोग सलग दोन वर्षे राबवला. आमच्याकडे दर आठवड्याला ते अंक येत, पण ते वाचता येण्याएवढे आम्ही डोळस नव्हतो. त्यांनी हे अंक गावोगावच्या अंधशाळांकडे फुकट पाठवायची व्यवस्था केली होती. आज मागे वळून पाहताना त्या वेळचे ते कंगोरे अधिक गडद झाले. डॉ. गोखले यांच्या निधनाने सार्वजनिक जीवनाच्या बखरीचे एक पान गळून पडले आहे.

arvindgokhale@gmail.com