आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Surendra Dighe Article About Subhaschandra Bose, Divya Marathi

आझाद हिंद सेनेचे सोनेरी पर्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

13 एप्रिल 1944 हा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातला सुवर्णदिन. या दिवशी आझाद हिंद सेनेच्या एका रेजिमेंटने जपानी सैन्याच्या 15 व 31 डिव्हिजनच्या बरोबरीने मणिपूरच्या पूर्व भागातून पारतंत्र्यात असलेल्या भारतात प्रवेश केला होता. वाटेतील टामू आणि उफूल ही दोन गावे जिंकत त्यांनी आगेकूच सुरू ठेवली. वाटेत अर्थातच त्यांना मणिपूर जनतेची उत्स्फूर्त साथ मिळत होती. जयहिंदचा नारा देत आझाद हिंद सेना वीस मैल आत भारतीय हद्दीत असलेल्या मोइरांगला पोहोचली. इंडियन नॅशनल आर्मी म्हणून संबोधल्या जाणार्‍या आझाद हिंद सेनेचे प्रमुख होते कर्नल शौकत अली मलिक. त्यांनी त्वरित स्थानिक स्वातंत्र्य लढ्यातील मणिपुरी नेत्यांशी चर्चा केली. मणिपूरमध्ये त्या वेळी हिंदू राजघराणे राज्य करत होते. ब्रिटिश राजवटीविरुद्ध स्थानिक नेते आपला स्वातंत्र्य लढा लढवत होते. सर्व नेत्यांशी चर्चा करून कर्नल मलिक यांनी सेनेचे प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संपर्क साधला. सुभाषबाबूंची परवानगी घेऊन स्वतंत्र भारताच्या अस्मितेचे प्रतीक असलेला आझाद हिंद सेनेचा ध्वज 14 एप्रिलला स्वतंत्र झालेल्या भारत भूमीत उभारण्याचे नक्की झाले.

14 एप्रिलला संध्याकाळी पाच वाजता मावळत्या सूर्याच्या साक्षीने भारतीय स्वातंत्र्याचा अरुणोदय झाला. कर्नल मलिक यांनी स्वतंत्र भारताच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या तिरंगा ध्वजाचे आरोहण केले. या ध्वजावर आझाद हिंद सेनेचे प्रतीक असलेल्या सिंहाचे चिन्ह होते. हा क्षण खरोखरच ऐतिहासिक आणि रोमांचकारक होता. दीडशे वर्षांच्या ब्रिटिश राजवटीनंतर प्रथमच स्वतंत्र भारत भूमीवर तिरंगा फडकत होता. नेताजी सुभाषबाबूंचेच नव्हे, तर कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न साकारत होते. स्वा. सावरकरांसारख्या काळ्या पाण्याची शिक्षा आणि भारतातील तुरुंगवास भोगणार्‍या लाखो भारतीयांचा त्याग आणि कष्ट यांचे फलित साध्य झाले होते. ध्वजारोहण झाल्यानंतर आपल्या भाषणात कर्नल शौकत अली मलिक यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पाठवलेल्या संदेशाचे वाचन केले. या संदेशात नेताजींनी दिल्लीत लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याचा आपला निर्धार व्यक्त केला होता.

हा सुवर्णाक्षरात लिहिलेला इतिहास माझ्यासमोर उभा केला तो मोइरांग येथील आझाद हिंद सेनेच्या वस्तुसंग्रहालयात जपून ठेवलेल्या ऐतिहासिक दस्तऐवजाने. याच इमारतीत 14 एप्रिल 1944 रोजी हा ऐतिहासिक क्षण साजरा झाला होता. या स्मृती संग्रहालयाच्या मुख्य आवारात दोन इमारती आहेत. जुनी इमारत पाडून त्या जागेवर दोन इमारती बांधलेल्या आहेत. एका इमारतीत युद्धकालीन वस्तुसंग्रहालय आहे. दुसर्‍या इमारतीत ग्रंथालय आणि कार्यालय आहे. इमारतीच्या बाहेर सुभाषचंद्र यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. या स्मृती भवनाची पायाभरणी 25 नोव्हेंबर 1955 रोजी भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष यू. एन. ढेबर यांच्या हस्ते झाली होती; परंतु अनंत अडचणींना तोंड देता देता उद्घाटन व्हायला 1969 वर्ष उजाडले व 22 सप्टेंबर 1969 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या युद्ध स्मृती भवनाच्या प्रथम दर्शनावर आझाद हिंद सेनेचे घोषवाक्य एकता, विश्वास, त्याग हे आहे. युद्ध स्मृती संग्रहालयातील प्रमुख दालनात सुभाषचंद्रांची दुर्मिळ छायाचित्रे आहेत. यामध्ये सुभाषचंद्र बोस यांचे रेडिओ सिंगापूरहून स्वतंत्र भारताची घोषणा करताना, आझाद हिंद सेनेची मानवंदना स्वीकारताना, प्रत्यक्ष युद्धभूमीवर पाहणी करताना, राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटची पाहणी करताना तसेच आंतरराष्ट्रीय नेत्यांबरोबर अशा दीडशे दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन आहे. याबरोबरच दुसर्‍या भागात युद्धकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आहे. यामध्ये तत्कालीन शस्त्रास्त्रे, इतर युद्ध साहित्य, कपडे, बूट याबरोबरच भारतीय हंगामी सरकारचे अधिकृत चलनही आहे.

शेजारच्या ग्रंथालयात सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील नऊ हजार पुस्तकांचा संग्रह आहे. आझाद हिंद सेनेच्या युद्धकालीन काळातील दस्तऐवज हे प्रमुख आकर्षण असून यातील प्रमुख दस्तऐवज म्हणजे आझाद हिंद सेनेच्या हंगामी सरकारची सनद. हे ऐतिहासिक दस्तऐवज वाचता वाचता भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे एक अपूर्ण प्रकरण डोळ्यांसमोर साकारायला लागले. आझाद हिंद सेनेची लढाई हा भारतीय स्वातंत्र्य इतिहासाचा एक उज्ज्वल आणि तेजोमय खंड; परंतु आपल्या दुर्दैवाने आपल्याला त्याची फारच कमी माहिती आहे, म्हणूनच या इतिहासाची थोडीशी ओळख करून देण्याचा मोह आवरत नाही.

जानेवारी 1944 ला नेताजींनी रंगूनला भेट दिली व तेथून इंफाळमार्गे भारतात प्रवेश करण्याची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू झाली. मार्च 1944 ला जपानच्या तीन आर्मी डिव्हिजन व आझाद हिंद सेनेच्या सुभाष बिग्रेड यांनी भारताच्या दिशेने आगेकूच केली. वाटेत त्यांना मोठ्या नद्या आणि पर्वताच्या रांगा ओलांडून दाट जंगलातून दरमजल करावी लागली. जपानी आणि आझाद हिंद सेनेने मणिपूरच्या दक्षिणेकडून भारतीय हद्दीत प्रवेश केला. त्याच वेळेस पूर्वेकडून आझाद हिंद सेनेने 31व्या जपानी डिव्हिजनबरोबर ब्रिटिशांचा कडवा प्रतिकार मोडून कोहिमा शहरात प्रवेश केला. कोहिमाची लढाई अतिशय घनघोर लढाई म्हणून प्रसिद्ध पावली.

कोहिमाच्या लढाईचे वर्णन जनरल इव्हान्स यांनी ‘इंफाळ वॉर बुक्स’मध्ये केले आहे. 3 एप्रिल 1944 रोजी ही लढाई सुरू झाली. मेजर कोटक आटो यांच्या नेतृत्वाखाली 15,000 जपानी सैनिकांनी कोहिमावर हल्ला केला होता. ब्रिटिश सैन्यात फक्त 1500 आसामी रायफलच्या जवानांचा समावेश होता. तरुण ब्रिटिश अधिकार्‍यांनी आपल्या या आसामी जवानांना सोबत घेऊन 15 दिवस कोहिमाचा किल्ला लढवला. शेवटचा संघर्ष तर समोरासमोर हातघाईच्या लढाईने झाला. शेवटी रॉयल इंडियन आर्मीची 161 वी तोफखाना डिव्हिजन दक्षिणेकडून येणार्‍या जपानी सेनेच्या अगोदर कोहिमात पोहोचले. मणिपूरच्या दक्षिणेकडून आलेली जपानी सेना इंफाळपर्यंत पोहोचू शकली नाही. त्यांचे प्रमुख कारण होते भौगोलिक परिस्थिती. त्या वर्षी मोसमी पाऊस लवकर सुरू झाला. कोहिमा येथील जपानी सेना एकटी पडली. इथूनच जपानी सेनेची माघार सुरू झाली होती. या परिस्थितीला दुसर्‍या महायुद्धातील परिस्थितीसुद्धा कारणीभूत होती. प्रशांत महासागर परिसरात अमेरिकन सेनेने मोठी आघाडी उघडली होती. यामुळे जपानी हवाईछत्र हरपले होते. ब्रिटिश सेनानी जनरल विंग गेट यांनी आपल्या ‘डिफीट इन टू व्हिक्टरी’ या पुस्तकात या यशस्वी मोहिमेचे सविस्तर वर्णन केले आहे. स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा अचूक फायदा हे इंग्रजाच्या यशाचे रहस्य होते.

ब्रह्मदेश-भारत सीमेवर पर्वतरांगा संपल्यावर मोठे सखल प्रदेश आहेत. याच प्रदेशात 100 हेक्टर परिसरात पसरलेला सुप्रसिद्ध ‘लेकताक’ तलाव आहे. हा अवाढव्य तलाव पावसाळ्यात पाण्याने पूर्ण भरलेला असतो; परंतु मार्च-एप्रिल महिन्यात या तलावात मोठमोठी डबकी तयार होतात; परंतु त्या वर्षी एप्रिल महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने संपूर्ण तलावात दलदल माजली होती. या चिखलात जपानी रणगाडे रुतू लागले. मोइरांगचे आणि इंफाळ रस्त्यावरील बिष्णीपूर येथील ब्रिटिशांचे ठाणे जपानी सेनेला जिंकता आले नाही व तेथून जपानी सैन्याच्या पराभवाला सुरुवात झाली. या पंधरा दिवसांच्या लढाईत 108 ब्रिटिश तरुण सेनाधिकारी मरण पावले. त्यांचे स्मारक आजही दिमाखात कोहिमा शहरात उभे आहे. कॉमनवेल्थ फंडातून या स्मृतिस्थान असलेल्या बगिचाची निगा राखली जाते. प्रत्येक ब्रिटिश अधिकार्‍याचे नावासहित थडगे आहेत. या प्रत्येक थडग्यापाशी गुलाबाचे फुललेले रोपटे आहे; परंतु याचबरोबर ब्रिटिशांकरिता बलिदान केलेल्या भारतीय आसामी रायफलच्या जवानांचा कुठेही उल्लेख नाही याची खंत वाटते. हा सर्व इतिहास समजून घेताना मनात विचार येतो की, जर त्या वर्षी पाऊस उशिरा सुरू झाला असता, तर दक्षिणेकडील जपानी आणि आझाद हिंद सेना वाटेतील बिष्णीपूर जिंकून इंफाळमार्गे कोहिमाला पोहोचली असती. अशा वेळेस दोन्ही दिशांकडून आलेल्या सैन्यदलाने एकत्र मिळून कोहिमा जिंकले असते, हेच सैन्य लाखो भारतीयांना बरोबर घेऊन गोहत्तीमार्गे भारताच्या प्रमुख भूमीवर पोहोचले असते.

अशा वेळेस नेताजींच्या नेतृत्वाखाली निघालेल्या लाँग मार्चला जगातील कुठलीही शक्ती दिल्ली गाठण्यापासून रोखू शकली नसती. लाल किल्ल्यावर नेताजींच्या हस्ते सिंहाचे चिन्ह असलेला तिरंगा फडकलेला बघण्याचे भाग्य भारतीयांना नक्कीच मिळाले असते. अशा परिस्थितीत भारताची फाळणी टाळली गेली असती का? स्वतंत्र भारताचा इतिहास आणि आताचा वर्तमान काळ बदलला असता का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे खरे तर कोणीच देऊ शकणार नाही. इतिहासात अशा
जर-तरला स्थान नसते.
सुरेंद्र दिघे
(सामाजिक कार्यकर्ता)