आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suresh Bhatevara Article About Ashok Jain, Divya Marathi

आनंदलोकी पोहोचला कलंदर...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलंदर’ हे खरं तर अशोक जैन यांचं टोपणनाव. मात्र, सारं आयुष्य जैन खर्‍याखुर्‍या कलंदरासारखेच जगले. त्यांच्या लेखनात, बोलण्यात, वागण्यात सतत फिरक्या घेणारा, एक मिश्कील, खोडकर कलंदर दडलेला असायचा. जैन जवळपास असले की उंच कड्यावरून कोसळणार्‍या दुधाळ धबधब्याचा प्रसन्न शिडकावा अंगावर होत असल्यासारखे वाटायचे. त्यांचे वार्तापत्र असो की ‘कानोकानी’ हे महाराष्‍ट्र टाइम्समध्ये सलग दहा वर्षे प्रसिद्ध झालेले सदर, शब्दांचे सुंदर तारांगण त्यात गवसायचे. राजकीय नेते असोत की साहित्यिक; कलंदर अनेकांच्या खोड्या काढायचा. मात्र, त्याच्या मनात कोणाविषयी आकस अथवा किल्मिष कधीच जाणवलं नाही. विनोद निर्विषच असला पाहिजे, याविषयी कलंदर आग्रही होता. डिसेंबर 2001 च्या सुमारास ‘कानोकानी’ सदर बंद झालं. याचं कारण जैन पक्षाघाताच्या विकाराने जायबंदी झाले. त्यामुळे 2003 पासून बारा वर्षे त्यांना अंथरुणावर काढावी लागली. आजारपणात हालचालींवर मर्यादा आल्या. तल्लख विनोदबुद्धी मात्र अखेरपर्यंत शाबूत होती. 18 फेब्रुवारीच्या सायंकाळी अखेर या सुहृद मित्राची इहलोकातली यात्रा संपली आणि आनंदलोकी तो पोहोचलादेखील.
सार्‍या देशाचे राजकीय स्पंदन जिथे धडधडते, त्या राजधानी दिल्लीत 1978 ते 1989 अशी सलग अकरा वर्षे अशोक जैन महाराष्‍ट्र टाइम्सचे विशेष प्रतिनिधी होते. ऐंशीच्या दशकात आजसारख्या 24 तास थेट प्रक्षेपण करणार्‍या असंख्य वाहिन्या नव्हत्या. दूरदर्शन ही एकमेव वाहिनी. तिलाही राजकीय दबावाचे ग्रहण लागलेले. ब्लॅक अँड व्हाइट टीव्ही सेटवर रंग आणि गंधहीन बातम्या दिसायच्या. अशा काळात साहित्यिक शब्दालंकारांचे गुलाबपाणी शिंपडलेल्या दिल्लीच्या राजकारणाच्या रंगीबेरंगी छटा, महाराष्‍ट्र टाइम्सच्या दर सोमवारच्या अंकात जैनांच्या ‘राजधानीतून’ या वार्तापत्राद्वारे मराठी वाचकांपर्यंत पोहोचायच्या. सारे वाचक त्यासाठी सोमवारची आतुरतेने वाट पाहायचे. जैन यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रचंड ऊर्जा, उदंड उत्साह आणि कमालीची सळसळ जाणवायची. संसदेच्या आवारात विविध घटनांचा वेध घेताना ही लगबग त्यांच्या हालचालीतून दिसायची. राजकारण या विषयाला हजारो पैलू. देशभर विखुरलेले अनेक राजकीय पक्ष. त्यांचे चलाख, चतुर, व्यवहारी, विक्षिप्त अशा विभिन्न वर्गात मोडणारे नेते. प्रत्येक पक्षाची स्वतंत्र अस्मिता. विविध भाषा, विविध प्रकारची संस्कृती, देशभर दररोज उद्भवणारे नवनवे प्रश्न, त्यातून उडणार्‍या संघर्षाच्या ठिणग्या, अशा अनेक गोष्टींनी भारतासारख्या खंडप्राय देशाचे राजकारण घडत असते. आपल्या राज्याशी संबंधित बातम्या अग्रक्रमाने देण्याचे बंधन राजधानीतल्या तमाम भाषिक वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींवर असते. जैन यांच्यावरही ते होतेच. मात्र, जैनांची पत्रकारिता त्यात कधी अडकून पडली नाही. ती कधीच त्यापुढे गेली होती. याचे कारण त्यांच्या नजरेत देशव्यापी आवाका होता. जैन नेहमी म्हणायचे, इतिहास कधीही सनावळ्यांच्या आकडेवारीत अथवा परंपरेने चालत आलेल्या चाकोरीत घडत नसतो. माणसं इतिहास घडवतात. दिल्लीत दर क्षणाला विविध घटना घडत असतात. आपल्या डोळ्यासमोर देशाचा इतिहास पुढे सरकत असतो. त्याचा डोळसपणे वेध घेता आला पाहिजे. दिल्लीतल्या पत्रकाराने राजधानीचा माहोल आपल्या लेखणीतून जिवंत उभा केला पाहिजे. सत्तानगरीत सत्ताबदलाचे अनेक रंग अशोक जैन यांनी तटस्थपणे पाहिले. आॅगस्ट 1978 मध्ये जैन दिल्लीत दाखल झाले. त्या वेळी मोठ्या आकांक्षेने जनतेने निवडून दिलेल्या जनता सरकारचा एकेक चिरा कोसळत होता. वैयक्तिक महत्त्वाकांक्षा अन् सत्तालालसेने पछाडलेले नेते आपल्याच विनाशाची कबर खोदत होते. 1979 च्या अखेरीस अवघ्या 28 महिन्यांत जनता सरकार पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. अपूर्व जिद्दीने इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या. अमृतसरच्या सुवर्णमंदिरातले आॅपरेशन ब्ल्यू स्टार, इंदिराजींची निर्घृण हत्या, पंतप्रधानपदी राजीव गांधींचे नाट्यमय पदग्रहण, पक्षांतरबंदीचे विधेयक, शाहबानो खटल्याचा निकाल, निकालानंतर संसदेने केलेले कायद्याचे शीर्षासन, पंजाब करार, आसाम करार, बोफोर्स प्रकरणानंतर काँग्रेसचे सत्तेतून उच्चाटन अशा भारतीय राजकारणावर दूरगामी परिणाम घडवणार्‍या अनेक महत्त्वपूर्ण घटनांचे पत्रकाराच्या भूमिकेतून जैन साक्षीदार होते. भाजप आणि डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर विश्वनाथ प्रतापसिंग पंतप्रधान झाले. देशाच्या राजकारणात आघाडी सरकारांचा कालखंड सुरू झाला. तोपर्यंत जैन दिल्लीतच होते. 90 मध्ये तळवलकरांच्या आग्रहास्तव महाराष्‍ट्र टाइम्सचे ज्येष्ठ सहसंपादक म्हणून ते मुंबईत दाखल झाले.
दिल्लीत असताना चतुरस्र नजरेने जैन बातमीचा वेध घ्यायचे. कोणा एकाशी बोलत असताना ते दुसर्‍याकडे बघायचे, हाताने खूण करत तिसर्‍याला काहीतरी सांगायचे आणि हळूच डोळे मिचकावत चौथ्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायचे. साहजिकच चौघांनाही जैन आपले जवळचे स्नेही वाटायचे. टेलेक्स अथवा तारेने बातम्या पाठवण्याचा तो काळ होता. फॅक्सची सोय कालांतराने सुरू झाली. बातम्या मिळवण्यासाठी घटनांचा मागोवा घेत पत्रकारांना जागोजागी हिंडावे लागे. आजसारख्या इंटरनेट, मोबाइल अशा सुविधा नव्हत्या. दैनंदिन कामकाजात बरीच धावपळ असायची. अशोक जैन प्रचंड मेहनती होते. त्यांच्या लेखणीने तो कालखंड गाजवला याचे कारण त्यांच्या शब्दांमध्ये सामर्थ्य होते. पत्रकारितेला विश्वासार्हतेचे बळ असावे लागते. अशोक जैन यांनी लिहिलं म्हणजे ते खरंच असणार, अशी विश्वासार्हता त्यांच्या लेखणीत होती. बातम्या आणि वार्तापत्रे वाङ्मयीन शैलीतून लिहिण्याची अलौकिक देणगी मराठी पत्रसृष्टीला अशोक जैनांनी दिली, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. दिल्लीत जैन केवळ पत्रकाराच्या भूमिकेत वावरले नाहीत, तर महाराष्‍ट्राचे ते एक चालतेबोलते सांस्कृतिक केंद्र होते. मराठी कवी, नाटककार, साहित्यिक, कलावंत दिल्लीत आले की हमखास जैनांना शोधायचे. आपल्याला काय हवे-नको ते हक्काने सांगायचे. जैनांमधला सांस्कृतिक कार्यकर्ता अशा वेळी जागा व्हायचा.
आयुष्यातले अनेक मौल्यवान क्षण अशोक जैनांबरोबर जगण्याचा योग आला. ‘इंदिरा गांधी’ या इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाची प्रत जैनांनी पुपुल जयकरांच्या स्वाधीन केली तेव्हा मी एकटाच त्यांच्यासोबत होतो. मनावर कोरल्यासारखा आजही तो प्रसंग ताजा आहे. महाराष्‍ट्र टाइम्समधे 1991 मध्ये मी रुजू झालो तेव्हापासून
जैनांनी हुकूमत गाजवलेल्या दिल्लीच्या विशेष प्रतिनिधी पदावर 2001 मध्ये जॉइन होईपर्यंत प्रत्येक वेळी त्यांनी माझा हुरूप वाढवला. दिल्लीत बारा वर्षांच्या कारकीर्दीत ‘राजधानीतून’ आणि ‘जंतरमंतर’ ही सदरे लिहिताना त्यांचे लेखन कायम एखाद्या दीपस्तंभासारखे माझ्या मनात असायचे. त्यांनी आखून दिलेल्या मार्गावरूनच चाललो. मात्र, त्यांच्या सुंदर भाषाशैलीची नक्कल करण्याचा खटाटोप मी कधी केला नाही. मला जमेल त्या शैलीत लिहिले. जैनांच्या सहवासाच्या हृद्य आठवणी, मित्रांच्या सान्निध्यात रंगलेल्या गप्पा, आयुष्याला आकार देणार्‍या सुरेख मैफली नि:संशय दीर्घकाळ स्मरणात राहतील. एक ज्येष्ठ मित्र, हक्काचा मार्गदर्शक निघून गेल्याची प्रचंड खिन्नता आज मनात आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीला अखेरचा सलाम!