आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाघ आणि माणसाच्या भल्यासाठी बफर क्षेत्र!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ताडोबाच्या बफर झोनला अभयारण्याचा दर्जा देण्याची शक्यता आहे, अशा आशयाच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी दिल्याने खरे तर (वन विभागासह) सर्वच जण हैराण झाले आहेत. 625 चौ.कि.मी.चे गाभा क्षेत्र असलेल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाभोवती 1100 चौ.कि.मी.चे बफर क्षेत्र असून ते भद्रावती, चिमूर, सिंदेवाही, मूल व चंद्रपूर या पाच तालुक्यांत विभागलेले आहे. या 1100 चौ.कि.मी. बफरपैकी 400 चौ.कि.मी. क्षेत्र हे वनेतर (खासगी) असून 700 चौ.कि.मी. क्षेत्र हे वनक्षेत्र असून ते वनविभाग - वनविकास महामंडळ यांच्या ताब्यात आहे. या बफर क्षेत्राचा मुख्य उद्देश हा त्या क्षेत्रातील ग्रामस्थांकडून वन्यजीव संरक्षणास मदत व्हावी, वन्यजीव पर्यटनाच्या अनुषंगाने त्यांना रोजगार मिळावा, वनांमुळे व त्यातील वन्यजीवांमुळे आपल्याला रोजगार मिळत आहे ही भावना त्यांच्यात निर्माण व्हावी, हा आहे. त्या दृष्टीने बफर क्षेत्राची निर्मिती सर्वच व्याघ्र प्रकल्पांभोवती करण्यात आली आहे. तसेचा गाभा क्षेत्राचे व्यवस्थापन कसे करावे व बफर क्षेत्राचे व्यवस्थापन त्यातील ग्रामस्थांना वन-वन्यजीवपूरक पर्यटनासारख्या व्यवसायातून रोजगार मिळण्यासाठी उपयोगी पडावे, असा यामागचा सर्वसामान्य हेतू आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षात नवीन बोर अभयारण्य, नवीन नागझिरा अभयारण्य यासारखी नवी अभयारण्ये घोषित झाली आहेत. कोलामारकासारखे क्षेत्र रानम्हशींच्या संवर्धनासाठी (संवर्धनक्षेत्र) म्हणून घोषित झालेले आहे. नुकत्याच पुणे येथे झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या सातव्या बैठकीत ताम्हिणी अभयारण्य घोषित करण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाने शिफारसही केलेली आहे व या वेळेसही वन विभागाने संवर्धनासाठीचा एक महत्त्वाचा प्रयत्न, की ज्यामध्ये स्थानिकांचा विरोध होऊ नये म्हणून निव्वळ वनक्षेत्रच अभयारण्य म्हणून घोषित करण्याचे प्रस्तावित केलेले आहे. म्हणजेच ज्या क्षेत्रात स्थानिकांचे हक्क व सवलती या आधीच ठरवल्या गेल्या आहेत, असे क्षेत्र अभयारण्यासाठी प्रस्तावित केले आहे.

कोलामारका ही गडचिरोली जिल्ह्यातील जागा ही रानम्हशींसाठी प्रसिद्ध आहे ती अभयारण्य म्हणून घोषित न करता संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित केली आहे. या संवर्धन क्षेत्रात अवघी 4 ते 5 कुटुंबे राहत असून त्यांनाही रानम्हशींच्या संवर्धनात भाग घेता येईल. वन विभागाचे सध्याचे धोरण हे स्थानिकांच्या मदतीनेच वन्यजीवांचे संरक्षण करण्याचे आहे. त्यामुळेच अभयारण्य घोषित करताना राज्य सरकार पुरेपूर काळजी घेत आहे. त्यामुळे ताडोबाच्या बफर क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देणे ही सध्या तरी कोठेही विचाराधीन नसलेली बाब आहे. सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये म्हणजेच महाराष्ट्राचे उदाहरण घ्यायचे झाले तर ताडोबा, मेळघाट, पेंच, नागझिरा, व सह्याद्री (कोयना व चांदोली वनक्षेत्र मिळून) या पाच व्याघ्र प्रकल्पांमध्ये गाभा क्षेत्र व बफर क्षेत्र अशी क्षेत्रे निश्चित केलेली आहेत.

व्याघ्र प्रकल्प ही 1973 मध्ये नऊ संरक्षित क्षेत्रात सुमारे 14 हजार चौ. कि.मी. क्षेत्रावर सुरू झालेली योजना होती. आता ती 41 संरक्षित क्षेत्रात सुमारे 64 हजार चौ. कि. मी. वर पसरलेली योजना असून एकूण 17 राज्यांमध्ये ती कार्यान्वित आहे. या 64 हजार चौ. कि.मी. क्षेत्रापैकी सुमारे 35 हजार चौ. कि.मी. हे गाभा क्षेत्र असून सुमारे 29 हजार चौ.कि.मी. हे बफर क्षेत्र आहे. 2006 मध्ये वाघांची भारतातील संख्या सुमारे 1411 होती ती आता 2010 च्या गणनेप्रमाणे 1706 झालेली आहे. एकंदरीत नवीन व्यवस्थापन पद्धतीमुळे ही वाढ झालेली आहे, असे निश्चितच दिसून येते. आतापर्यंतच्या व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन अनुभवावरून असे दिसून आले आहे की, व्याघ्र प्रकल्पाच्या सभोवतालच्या क्षेत्रातील स्थानिकांच्या सहकार्याशिवाय व्याघ्रसंवर्धन होणे शक्य नाही. परंतु सध्याच्याअनिर्बंधित विकासाचा वेग लक्षात घेतला तर व्याघ्र प्रकल्पांच्या भोवती असलेल्या क्षेत्रात अनिर्बंधित व पर्यावरणास बाधक विकास होऊ नये म्हणून अशा क्षेत्रांत विकास कामांवर थोड्याफार प्रमाणात बंधने टाकून हे क्षेत्र बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथे विकासावरील निर्बंध हे स्थानिकांच्या रोजगार मिळण्यावर बंधने नसून कोणत्याही पर्यावरणपूरक विकासास अशा क्षेत्रामध्ये बंदी नाही, हे ध्यानात ठेवले पाहिजे. परंतु अशा क्षेत्रातील कोणताही विकास हा पर्यावरणास हानिकारक असेल तर तो मात्र हळूहळू बंद करावा लागेल व असे धोकादायक म्हणजेच मोठ्या प्रमाणावरील खाणकाम, धोकादायक रासायनिक उद्योग हे मात्र या क्षेत्रात चालू करता येणार नाहीत. म्हणजेच वन्यजीवांबरोबरच येथे मानवाच्या आरोग्याचीही काळजी घेण्यात आलेली आहे.

बफर क्षेत्र का ठेवावे लागते, याबाबत शास्त्रीय माहिती पाहणेसुद्धा महत्त्वाचे आहे. सुमारे 80 ते 100 वाघ जर एखाद्या क्षेत्रात राहू शकत असतील तर अशा संख्येला व्हॉयेबल पॉप्युलेशन म्हणतात व त्यासाठी काही ठरावीक अशा किमान जननक्षम वाघिणींची अशा व्याघ्रसंख्येत गरज असते. त्यामुळे या 80 ते 100 व्याघ्रसंख्येला सुमारे 800 ते 1200 चौ. कि.मी. इतक्या क्षेत्राची गरज भासते. त्यामुळे मूळ गाभा क्षेत्राच्या बाहेर अशा प्रकारे वाढीव बफर क्षेत्र घेणे म्हणजेच व्याघ्र संवर्धनात मदत करणे हेच होय व हे बफर नावाप्रमाणेच वाघाच्या मूळ वसतिस्थानाला त्याच्या संरक्षणासाठी मदत करते. त्यामुळे बफर क्षेत्र घोषित करणे म्हणजे निव्वळ वाघांना नव्हे तर सभोवतालच्या मनुष्यवस्तीलासुद्धा मदत आहे, हे किमान सध्याच्या परिस्थितीत तरी विसरून चालणार नाही. या बफर क्षेत्रामुळे सगळ्यात महत्त्वाचा स्थानिकांना होणारा फायदा म्हणजेच पर्यटनात मिळाणारा वाटा. छोटी छोटी पर्यटनगृहे अशा बफर क्षेत्रात उभारायला परवानगी आहे व अर्थातच या पर्यटनासाठी वा व्याघ्र संवर्धनासाठी व व्यवस्थापनासाठी स्थानिकांना स्थानिक सल्लागार समितीमध्ये स्थानही मिळणार आहे.

स्थानिकांच्या मनात अभयारण्यातील बफर क्षेत्राविषयी कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या कल्पना बसवल्या जाऊ नयेत, यासाठी जागोजागी ग्रामपंचायतींमधून या बफर संकल्पनेची माहिती दिली गेली पाहिजे. हे बफर क्षेत्र फक्त वन्यजीवांसाठी नसून त्यामध्ये स्थानिकांनाही तेवढेच किंबहुना जास्त महत्त्व आहे, हे समजावण्यासाठी व त्यांना नियमित रोजगार मिळून त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी सर्व प्रकारच्या पर्यावरणपूरक योजना स्थानिक प्रशासनाने राबवायला हव्यात. व्याघ्र संवर्धनाने वा वन्यजीव संवर्धनाने आपला फायदाच होतो आहे व त्याच वेळेस पर्यावरणही राखले जात आहे, हा दुहेरी फायदा जेव्हा स्थानिकांच्या लक्षात येईल, तेव्हा बफर क्षेत्र वा गाभा क्षेत्र हा वादच राहणार नाही व त्यामुळे कोणताही वादंग निर्माण होण्याची शक्यता उरणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ताडोबाच्या उदाहरणातूनच बाकीच्या चार व्याघ्र प्रकल्पांतही या दृष्टीने कार्यवाही होणे हे वन प्रशासन व स्थानिक प्रशासन यांच्या दृष्टीने अत्यंत जरुरीचे आहे.