Home »Editorial »Columns» Temple Mony And Drought Conditon

मंदिरांत सुकाळ, देशात दुष्काळ... असे कसे होऊ शकते?

यमाजी मालकर | Feb 09, 2013, 03:00 AM IST

  • मंदिरांत सुकाळ, देशात दुष्काळ... असे कसे होऊ शकते?

भारतातील श्रीमंत देवस्थानांतील किंवा मंदिरांतील प्रचंड पैसा दुष्काळी कामांसाठी वापरण्यास द्यावा, अशा मागण्या सध्या होऊ लागल्या असून त्यांना व्यापक पाठिंबा मिळत असल्याचे चित्र उभे केले जात आहे. अशा मागण्यांना पाठिंबा मिळतो, याचे कारण अनेकदा तसे होण्याची फारशी शक्यता नाही, हे अनेकांना माहीत असते. मात्र आपण जणू समाजाचे कळीचे प्रश्न सोडवण्याचे सूत्र शोधून काढल्याचा आव अशा वेळी आणला जातो. वास्तविक या देशात मुळातच पैसा कमी नाही. तो चुकीच्या ठिकाणी पडला (सडतो) आहे आणि जो आहे त्यात काळ्या पैशाचे प्रमाण आता या थराला गेले आहे की असे थातूरमातूर, तात्कालिक, भावनिक आणि फसवे मार्ग अशा प्रश्नांवर उतारा ठरू शकत नाहीत, हे समजून घेतले पाहिजे.
तिरुपती देवस्थान तेथे दररोज होणा-या प्रचंड गर्दीचे व्यवस्थापन कसे करते, हे पाहण्यासाठी मी एकदा तिरुपतीला गेलो होतो. तिरुपतीच्या गाभा-यातून बाहेर पडताच तेथे पैसे, दागिन्यांचे दान टाकण्यासाठी हुंडी ठेवण्यात आली आहे. ती हुंडी भरताच गर्दीतील दोघांना थांबण्यास सांगितले जाते आणि त्यांच्यासमोर हुंडीचे तोंड बांधून त्यावर त्या दोघांच्या सह्या घेण्यात येतात. म्हणजे त्यातील धन कोणी बाहेर काढलेले नाही आणि आमच्यासमोर हुंडीला सील करण्यात आले, असे त्यांच्याकडून लिहून घेतले जाते. त्या दिवशी त्या फेरीला मला आणि एका भक्ताला पंच बनवण्यात आले. आम्हाला काही कळण्याआधीच त्यांनी सील केले आणि आमच्या सह्या घेण्यात आल्या. हुंडी बाजूला करेपर्यंत भाविकांची दान टाकण्यासाठी एकच गर्दी झाली होती. रिकामी हुंडी तेथे ठेवली आणि लगेचच ती भरायला लागली. म्हणजे आणखी काही मिनिटांत ही हुंडीही भरणार. तो वेग पाहून मी अवाक् झालो. आपले भले व्हावे म्हणून भाविक आपापल्या परीने देवाला एक प्रकारे लाच देत आहेत, असे मला वाटले.

दान देण्याचा हा विषय आपण भाविकांची श्रद्धा म्हणून सोडून देऊ. मात्र हुंडीत पडणारा गर्भश्रीमंतांचा बहुतांश पैसा काळा असतो, हे कसे विसरता येईल? या काळ्या पैशांतून ही देवस्थाने श्रीमंत होणार आणि ती समाजसेवा करणार ! याला समाजसेवा म्हणायचे काय, हे एकदा भाविकांनीच ठरवण्याची वेळ आता आली आहे.

दुष्काळी कामांसाठी या मंदिर किंवा देवस्थानांचा पैसा वापरला पाहिजे, अशी मागणी केली जाते तेव्हा आपण मान्य करून टाकतो की तेथील स्थानिक प्रशासन, राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा अगदी कोणी धनिक माणूस ते काम करू शकत नाही. खरोखरच अशी वेळ आली आहे की सरकार ज्या यंत्रणेला म्हटले जाते ती इतकी कमकुवत बनत चालली आहे की तिची कामे दुस-या कोणी तरी करावी, असे आपण म्हणायला लागलो आहोत. एक प्रकारे कर चुकवून मंदिरात देणगी टाकणे आणि आपल्याला मिळणारी मदत कोणी तरी उपकार म्हणून केली हे आपल्याला मान्य आहे. शिक्षण, आरोग्य, मूलभूत सुविधा पुरवणे ही कोणत्याही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र ती ते पार पाडू शकत नाही. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे ते हे करण्यासाठीचा पुरेसा महसूल जमाच होत नाही. जो होतो त्यातील बहुतांश पगारपाण्यात किंवा लाचखोरीतच जातो. आणि कर बुडवून जो काळा पैसा तयार होतो, त्यातील पैसा कोठे जातो की कोठे सडतो आहे, हे तर ब्रह्मदेवही सांगू शकत नाही. पण त्यातील बराचसा मंदिरांच्या दानपेट्यांमध्ये पडतो, हे मात्र सर्वांनाच माहीत आहे. याला श्रद्धा म्हणायचे, फसवणूक म्हणायची, देवाचा (गैर) वापर म्हणायचा की ढोंग म्हणायचे ?

अशी अनेक गावे आणि शहरे आज पाहायला मिळतात जेथे टोलेजंग मंदिरे उभी राहिली आहेत, मात्र तेथे प्यायला पाणी नाही. गावात येण्यासाठी चांगला रस्ता नाही. आरोग्यसेवा नाही. स्वच्छतागृहे नाहीत. शाळेची चांगली इमारत नाही. शाळेतील मुलांना बसण्यासाठी बाके नाहीत. त्यांना प्रवासासाठी वाहन नाही. अशा गावात आपला प्राधान्यक्रम हा मंदिराची भव्यता हाच राहिला आहे. कारण मंदिर बांधण्याची जबाबदारी आपण अजून सरकारवर सोपवली नाही. याचा अर्थ ज्याची जबाबदारी आपण घेतली, त्यासाठी आपण पैसा कमी पडू दिलेला नाही. मात्र जेथे आम्ही आमची जबाबदारी सरकारवर टाकली त्या व्यवस्थेला कोणीच वाली नाही. या व्यवस्थेने अतिगैरसोय झाली की आम्ही सरकारला धारेवर धरतो. पण सरकारला धारेवर धरतो म्हणजे नेमके कोणाला धारेवर धरतो? सरकार म्हणजे का कोणी व्यक्ती आहे? ते तर
आपल्यातूनच तयार झाले आहे. आणि त्यालाही देवधर्म प्रिय आहे. म्हणजे तेही (म्हणजे ती माणसे) मंदिरे सजवण्यातच व्यग्र आहेत. म्हणूनच मंदिरांच्या उत्पन्नावर कर लावण्यास एकमुखी विरोध केला जातो. कारण त्यांना भक्तांचे (लोकांचे) लांगूलचालन करायचे आहे. भक्तांना देवाचे आणि नेत्यांना लोकांचे लांगूलचालन करायचे आहे, त्यामुळे लांगूलचालन हाच आपला प्राधान्यक्रम झाला आहे. हे ढोंग संपत नाही तोपर्यंत दुष्काळ हा देवाची करणी म्हणूनच येत राहणार. जग म्हणते की तुमच्या संपत्तीचे व्यवस्थापन तुम्हाला जमत नाही, त्यामुळे तुम्ही दरिद्री आहात, मात्र आम्हाला ते अजिबात मान्य नाही!

Next Article

Recommended