आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसोटी क्रिकेटचा व्याख्याता गेला!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डिकी रत्नागर गेला. आजच्या क्रिकेट पिढीला ‘डिकी’ ठाऊक नसेलही. भारतीय क्रिकेट कसोटी प्रांतात रांगत रांगत रांगडे होत गेले, त्या कालखंडाचा तो साक्षीदार होता. आपल्या मिठ्ठास वाणीने त्याने भारतीय क्रिकेटला फुटणा-या पालवीचे वर्णन केले. लेखणीने अनेक भारतीय क्रिकेटपटूंना समृद्ध केले. डिकी पारशी वंशाचा. अस्सल मुंबईकर. 1960 च्या सुमारास साहेबांच्या खेळापाठोपाठ त्यांच्या देशाच्याही प्रेमात पडला आणि तेथेच स्थायिक झाला. स्थायिक झाला म्हणजे, ‘डिकी’चा देह ब्रिटनमध्ये स्थायिक झाला. त्याची नाळ भारताशी कायम जुळलेलीच राहिली.
विजय मर्चंट, मांजरेकर, बोर्डे यांच्यापासून सलीम दुराणीपर्यंतच्या क्रिकेटपटूंवर तो मनापासून प्रेम करायचा आणि लिहायचाही.

ब्रिटनमध्ये स्थायिक झाल्यानंतर डिकीने ब्रिटिशांचे काही गुण अचूक उचलले. त्यातला एक गुण होता मदिरापानाचा निखळ आनंद लुटण्याचा. डिकीचे दारू पिणे हा एक सोहळा असायचा. दारूच्या पोटात जाणा-या प्रत्येक थेंबाबरोबर ‘डिकी’ची क्रिकेटची ‘मेमरी डिस्क’ उघडायला लागायची. भारतीय क्रिकेटपटूंच्या मर्दानी खेळाच्या कहाण्या तो मग ऐकवायचा. भारतीय फलंदाजांचे प्रत्येक डाव त्याला तोंडपाठ होते. प्रत्येक फटका त्याला आठवायचा. आठवणींचा खजिना रिता करता करता ‘डिकी’च्या डोळ्यांच्या कडा कधी ओल्या व्हायच्या, ते कळायचेच नाही. आजच्या पिढीला तो ठणकावून सांगायचा, त्या वेळीही भारताकडे आजच्यापेक्षाही चांगले क्रिकेटपटू होते.


एक पिढी क्रिकेटच्या अशा शब्दांवर जगली तर त्याच काळातील एका क्रिकेटरसिक वर्गाला डिकीच्या आवाजाने समालोचनाच्या माध्यमातून मंत्रमुग्ध केले. याचे मुख्य कारण म्हणजे, तो स्वत: प्रत्येक कसोटी सामना मनापासून पाहायचा. प्रत्येक गोष्ट आठवणींच्या कप्प्यात साठवून ठेवायचा. एक-दोन नव्हे तर त्याने चक्क 300 कसोटी सामने कव्हर केले. तब्बल पाच दशके तो जगातील क्रिकेट खेळणा-या देशांमधील मैदानांवर वावरला. इंडियन क्रिकेट या भारतीय क्रिकेट नियतकालिकापासून इंग्लंडच्या डेली टेलिग्राफपर्यंत सर्वांसाठी त्याने लेखणी परजली. त्याने अखेरपर्यंत मर्यादित क्रिकेटच्या अवताराला कधीही जवळ केले नाही. डिकीला क्रिकेट चांगले कळत होते, परंतु त्याने त्या गोष्टीचा कधीही गर्व केला नाही. दिखावा केला नाही. आपल्याला जे वाटायचे ते तो बोलायचा किंवा लिहायचा. क्रिकेटपटूंना उपदेशाचे डोस पाजण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे अनेक क्रिकेटपटू त्याला जवळचा मानायचे. त्याच्यासोबत ‘ट्रिंक्स’ शेअर करायचे.


तो जसा क्रिकेटच्या प्रेमात होता तसाच क्रिकेटच्या जन्मदात्यांच्याही. ब्रिटिशांची शिस्त, आचार-विचार, वागणूक त्याच्यात मुरली होती. एखाद्या खेळाडूचे वर्णन करताना त्याच्या क्रिकेटच्या तंत्राबाबतही माहिती द्यायचा. प्रत्येक चेंडूदरम्यान तो धावफलक सांगायचा. खेळाडूंच्या धावा सांगायचा. ज्या काळात टेलिव्हिजन नव्हता, रेडिओ कॉमेंट्री हा एकमेव आधार होता, त्या काळात सामन्यातील प्रत्येक क्षण तो श्रोत्यांसमोर जिवंत उभा करायचा. माझा डिकीशी संबंध 1989 च्या भारताच्या वेस्ट इंडीज दौ-यावर प्रथम आला होता. पत्रकार कक्षात त्या वेळी एक वेस्ट इंडीजन क्रिकेटपटू आला होता. मराठी भाषेतील क्रिकेट सामन्यांचे वर्णन लिहिलेले पान तो कौतुकाने पाहत उभा होता. एवढ्या वेगात मी कसे लिहू शकतो, असे तो सुनील गावसकरला विचारत होता. सुनील गावसकर यांनी मी लिहिलेले त्याला वाचून दाखवले, त्यावर तो खेळाडू आश्चर्यचकित झाला होता. त्यापेक्षाही त्या खेळाडूसह आम्हा सर्वांना धक्का बसला, जेव्हा डिकी रत्नागर यांनी मराठीत लिहिलेला तो मजकूर वाचून दाखवला. ‘डिकी’ पक्का मुंबईकर होता. मुंबईच्या पत्रकारांशी तो मराठीतच बोलायचा. त्याच्या जुन्या आठवणी त्या वेळी ताज्या व्हायच्या. मुंबईचा ‘वडापाव’ त्याच्या आठवणीच्या कप्प्यात होता. डिकीला प्रकर्षाने आठवण होत होती ‘बॉम्बे डक’ची. आपल्या मुंबईच्या बोंबील माशाची. डिकी त्या वेळी म्हणाला, जगात सगळे मासे मिळतात; पण आपला मुंबईचा बोंबील कुठेच मिळत नाही.

डिकी अस्सल पारसी होता. ‘डिकी’ स्वत:च्या टाइपरायटरवर मनापासून प्रेम करायचा. जमैका कसोटीसाठी भारतीय संघाचे विमानतळावर आगमन झाले त्या वेळी कपिलदेवने आपल्या सामानासोबत डिकीचा टाइपरायटर नेला. कपिलला डिकीची थट्टा करायची लहर आली होती, पण डिकीने ते फारच मनाला लावून घेतले होते. जणू काही त्याची प्रेयसीच कुणी पळवली होती. त्याने एक छायाचित्रकाराचे कॅमेरा व अन्य किमती साहित्य रागाने स्वत:बरोबर नेले. शेवटी कपिलदेवने मध्यस्थी केल्यामुळे त्याने ते साहित्य परत केले. पारसी वंशाचे गोरेपण, तरतरीत नाक आणि राजबिंडे रूप घेऊन वावरलेला हा क्रिकेटच्या खेळाचा अस्सल प्रवचनकार शुक्रवारी काळाच्या पडद्याआड गेला.