आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नको पुन्हा हिरोशिमा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जपानला सूर्य सर्वात आधी उगवतो म्हणतात. पण जपानवासीयांसाठी 6 ऑगस्ट 1945 ची सकाळ उगवली ती घनघोर काळोख घेऊन. आकाशात विरळ होणारा पिवळा धुरळा, उद्ध्वस्त घरे, चक्काचूर पूल, खच्चून भरलेल्या बेचिराख ट्रम्स, दगड-माती-फुफाट्याचा प्रचंड ढिगारा, कातरलेल्या लोंबत्या कातडीच्या छातीशी हात कवटाळणा-या, जळकी कापडे कमरेला गुंडाळलेल्या आणि मेंदूचे विखुरलेले तुकडे पायांखाली तुडवत जाणा-या नागड्या माणसांच्या विव्हळत असणा-या टोळ्या, मानवी विष्ठेत लडबडलेल्या, फुगलेल्या पोटांच्या, तिरळ्या डोळ्यांच्या, सोललेल्या चामडीच्या, केस नदारद झालेल्या शाळकरी मुली शस्त्रागाराच्या जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेल्या दिसत होत्या. वीज पडतानाचा लखलखाट, डोळे दिपवणा-या मॅग्नेशियमच्या ज्वाळांत संपूर्ण शहर मोडून पडले, एखाद्या चित्रासारखे. हे होते हिरोशिमाचे 6 ऑगस्ट 1945 चे वास्तवचित्र.
ही घटना अनपेक्षित होती असे म्हणता येत नाही. हिरोशिमाचा सर्वनाश केला जाणार असल्याचा इशारा 5 ऑगस्टपासूनच दिला जात होता. शहर रिकामे करण्याच्या कामी माध्यमिक शाळेतल्या मुलींना जुंपलेही गेले होते. तरीही इतके भयानक आपल्या देशाबाबत घडू शकेल, असे कोणाच्या मनातही आले नाही. सोव्हिएत शक्तीने नाझींना नमवून तटस्थता करार उधळून लावला, इम्पीरियल जपानच्या महत्त्वाकांक्षेला अडसर घातला आणि जपानला पराभूत करण्याच्या दुष्ट प्रेरणेने अणुबॉम्ब टाकण्याची योजना 16 जुलैच्या अणुपरीक्षणानंतर नक्की झाली. हिरोशिमावर अणुबॉम्ब पडला तो इतका जबरदस्त नुकसान करणारा होता, की अणुस्फोटाच्या जागेपासून तीन हजार मीटर्सवर घर असलेला तोगे संकिची काचेच्या तुकड्यांनी जखमी झाला. त्याच्या शरीरावर-मनावर झालेल्या जखमा कधीच भरून येऊ शकल्या नाहीत. किरणोत्सर्गाच्या आजाराला तोंड देतच तो पुढचे आयुष्य जगला आणि अवघ्या छत्तिसाव्या वर्षी हे जग सोडून गेला. दोन हजार मीटर्सच्या त्रिज्येत राहणारे हवेच्या प्रचंड झोतामुळे दगडविटांच्या ढिगा-याखाली दबल्याने काळाने कायमचे दृष्टीआड केले. त्या वेळी रस्त्यावरच्या चालत्याफिरत्या तीन हजार लोकांपैकी काहींचे निमिषार्धात तुकडे तुकडे झाले, काही जळून मेले, काही वाचले पण भाजल्याच्या दु:सह्य जखमा सोसत आठवडाभरात मेले, काहींनी महिनाभर तग धरली.
त्या वेळी शहर रिकामे करण्याच्या कामात गुंतलेल्यांनी आपले प्रियजन गमावले. 6 ऑगस्टला हिरोशिमात तीन लाख आणि अवघ्या तिस-याच दिवशी 9 ऑगस्टला नागासाकीत दीड लाख लोकांची अशी निर्घृण हत्या झाली. असंख्य निष्पाप व्यक्तींना दु:खाच्या खाईत लोटणारी ही घटना, तिची भीषणता संवेदनशील मनाला गोठवून टाकल्याखेरीज राहत नाही. तीन लाखांच्या शहरावर सत्ता गाजवणारी नीरव शांतता कोण विसरू शकेल? मरणासन्न बायकामुलांच्या मलूल नजरांनी आमची हृदये चिरून त्या गाडलेल्या आशाआकांक्षा कोण विसरू शकेल? जपानवासीयांच्या हृदयातली तीव्र अंतर्वेदना कैक पिढ्या विसरणे केवळ अशक्य. संपूर्ण जग आज या घटनेकडे ‘मानवतेविरुद्ध केलेला अक्षम्य अपराध’ याच दृष्टीने पाहत आहे. त्या वेळच्या मूळ भावनांना वाचा फोडण्यासाठी आणि इतिहासाच्या संदर्भात तत्कालीन लोकांच्या वेदनेचे महत्त्व पुढच्या पिढ्यांसाठी अधोरेखित करण्यासाठी या घटनेची नोंद काव्यबद्ध करणे तोगे संकिचीला आवश्यक वाटले. आपण फार प्रतिभावंत कवी नसल्याची जाणीव हायकू लिहिणा-या या कवीला होती. हिरोशिमाचे आपण प्रवक्ते आहोत, या भावनेने लिहिताना तो म्हणतो, ‘ज्यांची मनं अजून कलुषित झालेली नाहीत, अशा लोकांना मी जास्तीत जास्त इतकंच देऊ शकतो. त्यांच्या दयावंत आणि सहानुभूतिशील हातांमध्ये इतकंच ठेवू शकतो. वाचक माझ्या विचारांचा स्वीकार करतील अशी मला आशा वाटते.’
कवितांद्वारे शांतीची ध्वजा फडकवण्याची तोगे संकिची याची इच्छा होती. ते एकच प्रभावी शस्त्र किंवा साधन आपल्या हाती आहे असे त्याला वाटले असले तरी त्याचमुळे त्याला त्याच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवले गेले. या साहित्यिक कलाकृतीमुळे त्याला पोटापाण्यासाठी एखादी नोकरी मिळणेही दुरापास्त झाले. आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अशा प्रकारे दबाव आणणारे लोक हेसुद्धा माणुसकीविरुद्ध अपराध करणारे आहेत, अशी त्याची धारणा झाली. हिरोशिमा उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याविषयीचे लेखन करायला आपल्याला सहा वर्षे लागली, याची बोच गॅस कंपनीत काम करणा-या या कवीच्या मनाला आहे. आपल्या कवितासंग्रहाकडे लोकांनी केवळ भेटवस्तू म्हणून पाहू नये, तर मानवजातीकडे प्रेमाने पाहणा-या सगळ्यांसाठी एक धोक्याची सूचना म्हणून पाहावे, असे त्याला वाटते. 6 ऑगस्ट 1950 रोजी हिरोशिमा शांतिसभेवर बंदी आणली गेली. हा दिवस जपानी लोक आपल्या आप्तांचा श्राद्धदिवस म्हणून पाळतात. त्याविषयीची प्रतिक्रिया देताना हा कवी उपहासाने म्हणतो, शांतीची घोषणा छापलेली पत्रकं मिळवण्यासाठी ते संघर्ष करताहेत! त्यांना त्या दिवशी पोलिसांचे फटके खावे लागताहेत. सशस्त्र आणि साध्या कपड्यांतल्या सैनिकांच्या तपासणीला त्यांना सामोरं जावं लागतंय.
अणुबॉम्बने हिरोशिमातल्या अनेकांचं पुरुषत्व ठेचलं, हिरोशिमाच्या रात्री आता नपुंसक झाल्या आहेत. ‘मूल होण्याच्या आपल्या आशा एखाद्या सणासारख्या आल्या आणि जळून गेल्या... जिवंत असूनही कबरीवर लावलेल्या स्मृतिचिन्हासारखे आपण दिसतो’ असं कवी प्रेयसीला उद्देशून म्हणतो, तेव्हा त्यातली दाहकता आणि दारुणता जाणवल्याशिवाय राहत नाही.
तोगे संकिची हा नसेल फार प्रतिभावंत, पण त्याने आपल्या कवितांतून अणुबॉम्बस्फोटाच्या परिणामांची दाहकता अतिशय परिणामकारक शब्दांत जगासमोर मांडली आहे. ‘अण्वस्त्र वापरल्यानंतर होणारी माणुसकीची दारुण दशा वाचकाच्या मनावर बिंबवावी, अण्वस्त्रविरोधी मानसिकता निर्माण व्हावी’ अशी मनोमन इच्छा बाळगून निरंजन उजगरे यांनी ‘गेनबाकूशिशू’चा अनुवाद मराठी-हिंदी वाचकांसाठी इंग्रजी अनुवादावरून पूर्ण केला. दरम्यान, प्रा. हिदेआकी इशिदा जपानला जाण्यापूर्वी आमच्याकडे हा अनुवाद नजरेखालून घालण्यासाठी राहिले तेव्हा इंग्रजी अनुवादात त्रुटी असल्याने तो मुळीच परिपूर्ण नसल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. ‘माणूस शोधण्यासाठी’ तोगे संकिचीने केलेली ही आगळीवेगळी ‘प्रार्थना’ वाचकांपुढे आणण्याच्या प्रामाणिक इच्छेपोटी इशिदा आणि निरंजन या दोघांनीही एक रात्र, दोन दिवस या अवधीतला प्रत्येक क्षण पुरेपूर वापरून घेतला. इशिदा जायला निघाले तेव्हा प्रत्येक कवितेची एकेक ओळ तपासून ती दुरुस्त करून झाल्याचे समाधान दोघांनाही मिळाले. युद्धाचा तिरस्कार वाटूनदेखील आजही निष्क्रिय उभे राहणा-यांनी जगभर अण्वस्त्रविरोधी भावना तयार करण्यासाठी एकजूट करून मानववंश गिळंकृत करणा-या त्या शापित सूर्याला काबूत ठेवावे म्हणून संकिची आजही विनंती करतो आहे.