आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटा : असली-नकली !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर सातत्याने सर्वतोमुखी चर्चेचा विषय ठरली आहे. तिकडे दिल्लीत पंतप्रधान मोदीजींनी पाचशे अन् हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा करताच इकडे येवल्याच्या नरेंद्रजींच्या अधिपत्याखालील जिल्हा सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणात अशाच कोट्यवधींच्या नोटांची अत्यंत हातचलाखीने अदलाबदली केली गेल्याची एकच बोंब गावभर सुरू झाली. खरं तर जिल्हा बँकेचा कारभार आता मोठ्या किमतींच्या नोटांमुळे अन् या अगोदरही वेगवेगळ्या कारणांनी वादग्रस्त ठरत आला आहे.

थोडक्यात म्हणाल तर, राज्याच्या सहकार क्षेत्रातील एकेकाळी प्रतिष्ठाप्राप्त असलेल्या या बँकेला आजवर ‘असली – नकली’ कारभाराचे वावडे कधीच राहिलेले नाही वा या पुढील काळात असू शकेल याचीही शाश्वती आजघडीला कुणीही देऊ शकत नाही.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभाराबाबत अनेक वाद तसेच प्रवाद आहेत. सेवानिवृत्तांना मुदतवाढ देऊन त्यांच्या सेवांचा उपयोग सोयीसोयीने स्वत:साठी करून घ्यायचा एक फंडा नाशिक पॅटर्न नावाने रूढ झाला आहे.
नोटाबंदीच्या घोषणेपाठोपाठ एकाच रात्रीतून कोट्यवधींच्या नोटा बदली करण्याचा जो मुद्दा सध्या गाजतो आहे तोही अशाच एका मुदतवाढ मिळालेल्या महोदयांच्या कार्यकाळातील आहे, अशी सार्वत्रिक चर्चा आहे. वर्षभरापूर्वी कार्यकारी संचालक पदावर आरूढ असलेल्या महोदयांनाही मुदतवाढीचा प्रसाद मिळालेला असताना त्यांचा कार्यकाळ तर प्रचंड गाजला.
बँकेच्या जिल्हाभरातील शाखांमध्ये चोऱ्या वा दरोड्यांचे सत्र सुरू झाले. बँकेच्या तिजोरीतील रोकड व सोन्याची चोरट्यांनी अक्षरश: लूट झाली. त्या प्रकरणांचा तपास अजूनही सुरू असून त्यापैकी एखाद-दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले खरे, पण अन्य ठिकाणच्या दरोड्यांचा तपास लागणे बाकी आहे.
नाशिक जिल्हा बँकेच्या बदनामीस कारणीभूत ठरणाऱ्या चोऱ्यांच्या घटनांना पूर्णपणे आळा बसलेला नसतानाच अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या अधिपत्याखालील कार्यकाळात कोट्यवधींच्या नोटा बदली केल्या गेल्याचे प्रकरण बाहेर आले आहे. नोटा बेकायदेशीररीत्या बदलल्या गेल्या असतील तर हादेखील बँकेच्या तिजोरीवर एका अर्थाने दरोडाच म्हणता येईल.
आयकर विभागाने राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मदतीने असली – नकली नोटांच्या शोधकार्यात हात घातला आहे. त्यातून काय निष्पन्न होईल हे तपास यंत्रणेच्या इच्छाशक्तीवर अवलंबून राहणार आहे.
बँकेच्या तथाकथित बदनामीला सुरुवात होऊन तीन आठवड्यांहून अधिक काळ लोटला, परंतु या काळात बँकेकडून कोणताही अधिकृत खुलासा वा इन्कार झाला नाही. परंतु, नोटा बदलीचा बभ्रा होताच रोखपालाची छाती दुखू लागल्याची तक्रार होऊन त्याच्यावर तत्काळ रुग्णालयात उपचार करण्याचा प्रसंग गुदरल्याचीही सार्वत्रिक चर्चा आहे.

या एकूण संशयकल्लोळ वातावरणाच्या पार्श्वभूमीवर नोटांच्या अनुषंगाने बँकेच्या अध्यक्षांनी उशिरा का होईना खुलासा करण्याची तत्परता दाखवली आहे. प्राप्तिकर विभागाच्या पथकाने बँकेच्या प्रधान कार्यालयास भेट दिल्याची व अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्याचीही कबुलीही अध्यक्षांनी दिली आहे. त्यामुळे असली नोटांच्या जागी नकली नोटा, यात कुठे तरी पाणी मुरते आहे.
कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या पुण्याईमुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा दबदबा फार पूर्वीपासून सहकार क्षेत्रावर व पंचक्रोशीतील जनमानसावर होता. महाराष्ट्रातील बोटावर मोजल्या जाणाऱ्या बँकेच्या क्रमवारीत ती गणली जात असे. हा महिमा ओसरत जाऊन त्याची जागा संशयकल्लोळाच्या कारभाराने घेतली. पाचशे-हजाराच्या नोटा अदलाबदली करण्याच्या अलीकडच्या कथित कृत्याने तर त्यावरही कळस चढवला आहे.

ज्या उदात्त हेतूने ही बँक सुरू झाली त्याच्या मूळ हेतूलाच कारभाऱ्यांमुळे हरताळ फासला जात आहे. सहकाराच्या भावनेतून शेतकऱ्यांच्या अडीअडचणींमध्ये मदतीचा हातभार अथवा अस्मानी संकटाच्या काळात बँकेने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी जनभावना आहे.
शेतकऱ्यांच्या फळबागा फुलाव्यात, त्यातून उत्पन्नाची साधनं निर्माण होतानाच भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात.
सहकारी तत्त्वावरील साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावेत अन् त्याच्याही विकासाचा पाझर पंचक्रोशीत व्हावा, अशी माफक अपेक्षा होती. पण, बदलत्या जमान्यात अन् बदलत्या राजकारणामुळे बँकेतील कारभाऱ्यांच्या आशा-आकांक्षा एवढ्या बळावल्या की सहकाराची जागा आता स्वाहाकाराने घेतली आहे.
संधी मिळेल वा सापडेल तेथे खऱ्याचे खोटे करून स्वहित कसे जपले जाईल हा सहकारातील बव्हंशी मंडळीचा एकमेव अजेंडा ठरला आहे. परिणामी, सहकाराच्या क्षेत्रात एकेकाळी दबदबा असलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सांप्रत काळामध्ये केवळ बदनामीची धनी ठरू पाहते आहे.

- जयप्रकाश पवार निवासी संपादक, नाशिक
बातम्या आणखी आहेत...