आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅम्बेसेडर मोटारपर्वाचा अस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1983 मध्ये भारतातील रस्त्यांवर मारुती 800 ही मोटार धावू लागली. तिच्या आगमनाने भारतातील मोटार बाजारपेठेची परिमाणे बदलून गेली. आजमितीला भारतात देशी-विदेशी बनावटीच्या सर्व प्रकारच्या मोटारगाड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विदेशांतील अनेक महत्त्वाच्या मोटार उत्पादकांनी आपले कारखाने भारतात सुरू केले आहेत. त्याचप्रमाणे टाटा, मारुती-सुझुकी, महिंद्रसारखे भारतीय मोटार उत्पादकही या स्पर्धेत मागे नाहीत. मात्र या सार्‍या गलबल्यात अ‍ॅम्बेसेडर ही मोटार आपले सम्राज्ञीपद अभिमानाने टिकवून होती. पश्चिम बंगालमधील उत्तरपारा येथे सी. के. बिर्ला ग्रुपच्या मालकीच्या हिंदुस्थान मोटर्स कंपनीच्या कारखान्यात अ‍ॅम्बेसेडर मोटारींचे उत्पादन होत असे. हा कारखाना गेल्या शनिवारपासून बंद करण्यात आल्याने अ‍ॅम्बेसेडर मोटारीच्या अस्तपर्वाचा अखेरचा अंक सुरू झाला आहे. अ‍ॅम्बेसेडर मोटार ही टॅक्सी म्हणूनही वापरली जात असे. मात्र भारतात विविध प्रकारच्या मोटारी उपलब्ध झाल्यानंतर सर्वसामान्य लोकांनी अ‍ॅम्बेसेडर मोटारीचा वापर खूपच कमी केला होता. पूर्वी देशाचे पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यातील मंत्री, आयएएस अधिकारी हे प्राधान्याने अ‍ॅम्बेसेडर मोटारच वापरत. 2003 मध्ये पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अ‍ॅम्बेसेडरऐवजी बीएमडब्ल्यू मोटार वापरायला सुरुवात केली आणि अ‍ॅम्बेसेडर गाडीच्या उर्वरित साम्राज्याला मोठा धक्का बसला. आर्थिक उदारीकरणाच्या पर्वानंतर देशात जो नवश्रीमंत वर्ग उदयाला आला, त्याला आलिशान व आधुनिक सोयीसुविधांनी यु्क्त मोटारींचे आकर्षण आहे. अ‍ॅम्बेसेडर गाडीची वैशिष्ट्ये या नवग्राहकाला भुरळ पाडू शकली नाहीत. परिणामी अ‍ॅम्बेसेडर गाडीची विक्रीही कमी होत गेली. 1980च्या दशकात दरवर्षी सरासरी 24 हजार अ‍ॅम्बेसेडर गाड्यांची विक्री होत असे. हे प्रमाण 2000च्या दशकात घसरून दरवर्षी फक्त 6 हजार अ‍ॅम्बेसेडर गाड्यांचीच विक्री होऊ लागली. आता तर मागणी इतकी कमी झाली होती की, उत्तरपारा येथील कारखान्यात दिवसाला फक्त पाचच अ‍ॅम्बेसेडर मोटारींचे उत्पादन होत होते. हा कारखाना आता बंद करण्यात आला असला तरी अ‍ॅम्बेसेडर मोटारीच्या वैभवशाली आठवणी लोकांच्या मनात दीर्घकाळ नक्कीच रेंगाळत राहतील.