व्यवस्थेच्या नावाने खडे फोडायला हल्ली निमित्त लागत नाही. व्यवस्था रसातळाला गेली, असे म्हणण्याला अवकाश, की मीडिया-सोशल मीडियावरून व्यवस्थेचा जाहीर पंचनामा सुरू होतो. मात्र, व्यवस्थेविषयी मनात रुजलेले पूर्वग्रह दूर सारून व्यवस्थेच्या गौरव व्हावा, अशी घटना दिल्लीच्या ‘कुप्रसिद्ध’ तिहार तुरुंगामध्ये घडली आहे. एरवी तुरुंग म्हणजे गुन्हेगारांना अंधार्या कोठडीत डांबून ठेवण्याची जागा असते, येथे शिक्षा भोगत असलेले गुन्हेगार समाजाच्या दृष्टीने माणुसकीला काळिमा असतात. म्हणून शिक्षा भोगून झाल्यानंतरही समाजात त्यांना स्थान मिळत नसते. त्याचमुळे तुरुंगातल्या काळोख्या दुनियेतून बाहेर पडल्यानंतरही अनेकांच्या नशिबी अंधकारमय आयुष्यच येत असते. मात्र, हे चित्र तिहार तुरुंगात नुकत्याच झालेल्या ‘कॅम्पस रिक्रूटमेंट’ उपक्रमामुळे बदलणार आहे. शिक्षेचा कालावधी संपत आलेले तब्बल 66 बंदिवान आपापल्या गुणवत्तेनुसार विविध कंपन्यांमध्ये सन्मानाने रुजू होणार आहेत. या बंदिवानांना सामावून घेण्यास अशा तशा नव्हे, तर ताजमहाल ग्रुप, वेदांत ग्रुप, आयडी ईआयएम इंडिया लिमिटेड यासारखा 31 प्रतिष्ठित कंपन्यांनी पुढाकार घेतला होता. 66 जणांपैकी राजू पारसनाथ नावाच्या बंदिवानास ताजमहाल ग्रुपने 35 हजार महिना पगाराची असिस्टंट बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजरपदाची नोकरी दिली आहे. पारसनाथ वयाच्या 18 व्या वर्षीपासून खुनाच्या गुन्ह्याखाली तिहार तुरुंगात शिक्षा भोगत होता. त्याचे वर्तन आणि शिक्षणाची असलेली ओढ याचे फ लित त्याला या निमित्ताने मिळाले आहे.
हे यश जितके पारसनाथसारख्या स्वत:चे जगणे सुंदर करण्यासाठी धडपडणार्या तरु ण बंदिवानांचे आहे, तितकेच ते त्याला संधी देणार्या तुरुंग व्यवस्थापनाचेही आहे. अर्थात, व्यवस्थापनाचे हे पहिले यश नाही, तर यापूर्वी 400 बंदिवानांना सन्मानाचा रोजगार उपलब्ध करून देण्याचे श्रेयदेखील तिहार व्यवस्थापनाने कमावले आहे. अर्थात, कॅम्पस रिक्रुटमेंट उपक्रमात महिला बंदिवान नसल्याच्या वास्तवाकडेही व्यवस्थापनाने गांभीर्यपूर्वक लक्ष घातले, हीसुद्धा समाधानकारक बाब आहे. सगळीच व्यवस्था सडली आहे, अशी ओरड ठोकणार्या तमाम निराशावादी मंडळींना तिहार तुरुंगातल्या या घटनेने समर्पक उत्तर दिले आहे.