आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापार मेळावा : व्यवसायाची संधी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन वर्षांपूर्वी पहिल्यांदाच परदेशात जाण्याचा योग आला आणि त्यामुळे भव्य-दिव्य असा व्यापार मेळावा (ट्रेड शो) बघण्याची संधी मिळाली. जर्मनीतल्या हॅनोव्हर फेअरग्राउंडवर जवळपास 5.3 दशलक्ष चौरस फूट जागेवरील बंदिस्त सभागृह, 6,24,306 चौरस फूट खुल्या मैदानावर 27 मोठे हॉल/ पॅव्हेलियन आणि 35 फंक्शनल रूम यासह एक मोठे कन्व्हेन्शन सेंटर इतका मोठा या प्रदर्शनाचा आवाका.

एवढेच नाही तर सात हजारांपेक्षा जास्त प्रदर्शक या मेळाव्यात सहभागी झाले होते, तर सहा लाखांपेक्षा जास्त लोकांनी या मेळाव्याला भेट दिली. ही सगळी अतिशयोक्ती वाटेल, पण खरंच आपल्या येथे भरणार्‍या व्यापार मेळाव्याच्या तुलनेत खरोखरच हा सगळा भव्य-दिव्य प्रकार मी अनुभवत होतो, पण काही म्हणा दुसर्‍या जागतिक महायुद्धानंतर आपली आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी व्यापार मेळावे भरवण्यासारखा दुसरा कोणता चांगला पर्याय असू शकत नाही हे जर्मनीने त्याच वेळी ओळखले होते. त्यामुळेच इतके अवाढव्य व्यापार मेळावे भरवण्यात जर्मनीचा हात कोणीही धरू शकत नाही. हॅनोव्हर व्यापार मेळावा पहिल्यांदा 1947 मध्ये आयोजित करण्यात आला. त्यानंतर त्याचे नामकरण ‘एक्स्पोर्ट मेसे 1947’ असे करण्यात आले.

व्यापार मेळाव्याची ही संकल्पना चांगलीच यशस्वी झाली आणि कालांतराने हे मैदान व्यापार मेळाव्यांचे कायमस्वरूपी माहेरघर बनले. मग जर्मनीतल्या अनेक शहरांनी याचेच अनुकरण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आज जर्मनीमध्ये जवळपास 600 राष्‍ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मेळावे होतात. त्यावरही कडी म्हणजे एकट्या जर्मनीमध्येच शंभरएक आंतरराष्‍ट्रीय प्रदर्शने झाली आहेत. ही प्रदर्शने साधारण तीन प्रकारची असतात. ग्राहक प्रदर्शन जी साधारणपणे सर्व जनतेसाठी खुली असतात, पण अन्य प्रदर्शनात केवळ व्यापारी सदस्य आणि प्रसारमाध्यमांनाच उपस्थित राहता येते. काही प्रदर्शने संमिश्र स्वरूपाची असून ती दोन ते तीन दिवस चालतात. शेवटच्या दिवशी सामान्य जनतेला या प्रदर्शनात सहभागी होता येते. आपल्या व्यवसायात वाढ व्हावी, अन्य कंपन्यांशी सहकार्य, कामकाजात सुधारणा तसेच स्वत:चा ब्रॅँड बाजारात ठसवणे अशा विविध कारणांसाठी जगभरातल्या कंपन्यांची सर्व भिस्त अशा प्रकारच्या औद्योगिक आणि व्यापारी मेळाव्यांवर असते. त्यामुळे जगभरातल्या अनेक कंपन्या अशा प्रकारच्या मेळाव्यांची संधी साधून फायदा घेतात; परंतु भारतीय कंपन्या मात्र याबाबत काहीशा उदासीन असल्याचेच दिसून येते. एकतर अशा प्रकारचे वेगळे पाऊल टाकण्यात या कंपन्या थोड्या कचरतातच. त्यातूनही धाडस करून असे काही पाऊल टाकले आणि पदरात काहीच पडले नाही तर पुन्हा कसोशीने प्रयत्न केले जात नाही हेही तितकेच खरे, पण थोडासा संयम ठेवला तर यशाची गोड फळेही चाखता येतात आणि असे येथे सहभागी झालेल्या अनेक कंपन्यांच्या बाबतीत घडले आहे. मुळात भारतीय प्रदर्शक कंपन्यांच्या मदतीसाठी अनेक संस्थाही कार्यरत आहेत. या संस्था कंपन्यांना आंतरराष्‍ट्रीय प्रदर्शनात सहभागी होण्यापासून ते सरकारी सवलती मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करतात. ‘ईएससी’ ही संस्था भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना विशेष करून लघु मध्यम उद्योगातील कंपन्यांना जर्मनी, दुबई, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, हॉँगकॉँग या देशातल्या जागतिक पातळीवरील कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी भारत सरकारकडून देण्यात येणार्‍या आर्थिक साहाय्याच्या माध्यमातून प्रोत्साहन देत असते असे ‘ईएससी’चे कार्यकारी संचालक डी. के. सरीन यांनी सांगितले.

जगभरातून आलेल्या विद्यमान तसेच भावी ग्राहकांशी संपर्क साधून आदानप्रदान करण्याची मोलाची संधी अशा प्रकारच्या ट्रेड शो मधून मिळत असते. व्यवसाय किंवा ग्राहकांना संपर्क करण्यासाठी विविध उपखंडात प्रदीर्घ प्रवास करण्याऐवजी या पाच-सहा दिवसांच्या ट्रेड शोमध्ये यापैकी बहुतांश ग्राहक एकाच छताखाली भेटतात हे तितकेच महत्त्वाचे. हॅनोव्हर फेअरचे भारतातील माजी व्यवस्थापकीय संचालक एस. जे. पाटील म्हणतात की, कोणत्याही व्यापार मेळाव्यात केवळ एकदाच सहभागी होणे पुरेसे नाही. या मेळाव्याचा व्यावसायिक लाभ मिळवायचा तर सलग तीन वर्षे तरी सहभागी होण्याची योजना कंपन्यांनी आखायला हवी. अर्थातच सहभागी झाल्यानंतर त्याचा नफ्यावर लगेच परिणाम होणार नाही; परंतु यामुळे कंपनीचे ‘रेप्युटेशन’ मात्र वाढण्यास मदत होते. अर्थात अशा प्रकारच्या व्यापार मेळाव्यात सहभागी होताना खर्च हादेखील कळीचा मुद्दा ठरतो. केवळ स्टॉल लावण्याचाच नाही तर भाड्याने घेतलेली जागा, व्यापार मेळाव्याच्या स्टॉलकडे लक्ष वेधून घेण्यासाठी होणारी सजावट, दूरसंपर्क आणि नेटवर्किंग या सगळ्या खर्चाबरोबरच प्रवास, खानपान (विशेष करून भारतीय रेस्टॉरंटचा शोध घेताना), प्रवास विमा, माहिती देणारी छापील पत्रके, कर्मचारी हा खर्चही दुर्लक्षून चालणार नाही; परंतु जर व्यापार मेळाव्याचे स्वरूपच लहान असेल आणि तेथे फार काही प्रतिसाद मिळणार नसेल तर पैसा आणि वेळ खर्च करण्यात काही मतलब नाही; परंतु विविध क्षेत्रांमध्ये काही महत्त्वाचे ट्रेड शो होत असतात याची दखल घेणेदेखील गरजेचे आहे.

उदाहरणार्थ, मार्चमध्ये हॅनोव्हर येथे होणारा ‘सेबीट’ हा सर्वात मोठा आयसीटी ट्रेड शो, दूरसंचार क्षेत्रासाठी मोबाइल वर्ल्ड कॉँग्रेस (बार्सिलोना), अभियांत्रिकी क्षेत्रासाठी ‘हॅनोव्हर मेसे’ बांधकाम उपकरणांसाठी ‘बाउमा’ म्युनिचमधील सर्वात मोठा व्यापार मेळावा, क्रीडा वस्तूंसाठी ‘आयएसपीओ’( म्युनिच),पर्यटन व्यापारासाठी ‘आयटीबी (बर्लिन) आणि ‘डब्ल्युटीएम’ (लंडन), हॅम्बर्गमधील विमानांच्या अंतर्गत सजावटीचा एक्स्पो, वैद्यकीय बाजारपेठेसाठी ‘मेडिका’ (ड्युसेलडॉर्फ), ऑक्टोबरमध्ये भरणारे अतिभव्य पुस्तक प्रदर्शन फ्रॅँकफर्ट बुक फेअर, ग्राहकोपयोगी वस्तूंचे ‘सीईएस’ (लास व्हेगास) आणि ‘आयएफए’ (बर्लिन), घड्याळे आणि अलंकारांसाठी ‘बॅसलवर्ल्ड’ (स्वित्झर्लंड), इलेक्ट्रॉनिक्सच्या सुट्या भागांसाठी इलेक्ट्रॉनिका (म्युनिच) अशी अनेक प्रदर्शनांची नावे घेता येतील. व्यापार मेळाव्यात गुंतवणूक करणे फारच खर्चीक असते असे सगळे म्हणतात, पण तरीही बर्‍याच कंपन्या वर्षानुवर्षे त्याच व्यापार मेळाव्यात सहभागी होत असतात. अर्थात त्याची गोड फळे त्यांनाही चाखायला मिळाली असणारच त्याशिवाय नाही. मग तुमच्या कंपनीला अशा ट्रेड शोमध्ये सहभागी होऊन आपल्याला हवी असलेली बाजारपेठ काबीज करणे आणि आपला ब्रॅँड जगभरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे.
(chandraguataa@hotmail.com)