आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुरसट हिमनगाचे टोक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र पुरोगामी असल्याच्या कितीही वल्गना होत असल्या तरी मनात रुतलेली जात नष्ट होत नाही हे कटू सत्य आहे. जात, धर्म, श्रद्धा हे वैयक्तिक विषय ठरवून खासगी आयुष्यात ते जपण्याचे पूर्ण स्वातंत्र्य राज्यघटनेने दिले आहे. राज्यघटनेच्या चौकटीत बंदिस्त असणारे हे खासगी स्वातंत्र्य सार्वजनिक ठिकाणीसुद्धा गुपचूपपणे पण तितक्याच कट्टरतेने पाळले जाते हे आपल्या समाजाचे वैशिष्ट्य आहे. शेकडो जाती आणि पाच-पन्नास धर्मांच्या चालीरीती, प्रथा-परंपरांचे कप्पे समाजात आहेत, हे उघड गुपित नाकारता येत नाही. ‘आमच्यात असं नसतं’, ‘तुमच्यात तसं असतं का?’ वगैरे चर्चा नव्या नाहीत. भारतीय समाजमनाच्या अशा दुहेरी वागण्याला कोणी दांभिकता म्हणेल, कोणी सहिष्णुता तर कोणी आचार-विचाराचे स्वातंत्र्य. जे असेल ते पण एकमेकांमधल्या भेदांना स्वीकारून अठरापगड जातींचा भारतीय समाज शतकानुशतके स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व राखून पुढे चालतो आहे. म्हणूनच विशिष्ट लोकांना विशिष्ट धर्मस्थळांमध्ये प्रवेशबंदी असते, याचा बाऊ केला जात नाही. अमुक धर्मात तमुक खायचे नाही, हे स्वीकारले जाते. लग्नसंबंध जुळवताना शक्य तर आपल्याच पोटजातीत, नाहीच तर आपल्याच जातीत, तेही नाही तर स्वधर्मातच जुळवण्याचा आटापिटा नैसर्गिक मानला जातो. प्रत्येक जाती-धर्माच्या सोवळ्या-ओवळ्याच्या नियम-प्रथा वेगवेगळ्या आहेत. जात जपण्याची, जात मानण्याची, जातीला चिकटून राहण्याची उदाहरणे समाजात उदंड आढळतात. हे सगळे एकमेकांच्या संमतीने, समजून-उमजून चाललेले असते तोवर कोणालाही आक्षेप नसतो. पण जाती-धर्माचे अवडंबर, अतिरेक उफाळून बाहेर पडतो तेव्हाचे त्याचे रुपडे फार ओंगळवाणे असते. मग आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह केला म्हणून खून पाडले जातात. मांस शिजवतो म्हणून सोसायटीतच कोणाला प्रवेश नाकारला जातो. गाय कापली म्हणून हिंसा होते. डुक्कर मारले म्हणूनही हिंसा होते.

विशिष्ट धर्मगुरू असल्याशिवाय धर्मकार्ये आटोपत नाहीत. विशिष्ट धर्मविधी झाल्याशिवाय जातीत राहता येत नाही. जातीला धरून राहण्यासाठी प्रथा-परंपरांची चाकोरी न मोडण्याची काळजी बहुतांश लोक घेतात. शिक्षण किंवा आर्थिक स्थितीमुळेही यात फार फरक पडत नाही, हे दुर्दैव. पुण्यातल्या डॉ. मेधा खोले यांनी कोणत्या विषयात पीएचडी मिळवली आणि भारतीय हवामान खात्यात किती महत्त्वाची पदे भूषवली यालाही काडीचा अर्थ उरत नाही. कारण विज्ञान शाखेतले उच्च शिक्षणसुद्धा त्यांची बुरसटलेली मानसिकता बदलवू शकत नाही. इतर जातीच्या विधवा स्त्रीने स्वयंपाक करून फसवणूक केली, माझे सोवळे बाटले, अशी तक्रार मानसिक आजारपण असल्याशिवाय खोलेंच्या मनात उत्पन्न होणे शक्य नाही. खोलेंचे अवडंबर त्यांच्या घराचा उंबरठा ओलांडून पोलिस ठाण्यापर्यंत पोचले नसते तर ते खासगी स्तरावर जातीयता पाळणाऱ्या बहुसंख्यांच्या समाजवृत्तीला धरून झाले असते. पुण्याच्या पोलिसांनी खोलेंना समजावून सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्यांचा आक्रस्ताळेपणा कायम राहिला. परिणामी संतापजनक प्रकरणाची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात झाली. खोलेंचे वर्तन पुण्यातल्या फुले-आगरकर परंपरेला काळिमा फासणारे आहे. खोलेंच्या तक्रारीवर न्यायव्यवस्था काय निकाल घ्यायचा तो घेईल. खोलेंच्या निमित्ताने जातीय अंधत्व दूर करण्याची चर्चा ऐरणीवर यावी. 

जातिअंताच्या भूमिकेचे प्रबोधन या निमित्ताने नव्याने सुरू व्हावे. सार्वजनिकच काय पण खासगी व्यवहारातूनही जाती हद्दपार करण्याला चालना मिळावी. दिसते असे की, सामाजिक प्रबोधनाऐवजी राजकीय पोळी भाजून घेण्याचाच प्रयत्न सुरू झाला आहे. खोलेंच्या मागास प्रवृत्तीपेक्षा त्यांच्या जातीचे भांडवल करण्यातच काहींना जास्त रस दिसतो आहे. पुण्यातल्या खोलेंनी लावलेले दिवे कमी की काय, म्हणून दिल्लीत निर्मला सीतारमण यांनीही ‘पराक्रम’ गाजवला. बऱ्याच वर्षांनी महिलेच्या हाती देशाच्या संरक्षणाची सूत्रे आल्याच्या आनंदावर त्यांनी पाणी ओतले. संरक्षण मंत्रालयाच्या कार्यालयात त्यांनी पूजापाठ करवून घेतले. का तर म्हणे पितृ पंधरवडा. शत्रूशी लढण्याची वेळ उद्या आलीच तर या संरक्षणमंत्री सीमेवर सत्यनारायण तर घालणार नाहीत ना, अशीच भीती आता वाटू लागली आहे. ‘जप-अनुष्ठानात वेळ घालवून युद्धे जिंकता येत नाहीत,’ असे पेशव्यांना खडसावणारे रामशास्त्री प्रभुणे आता दिल्लीत नाहीत. खोले आणि सीतारमण यांचे कृत्य विधिनिषेधशून्य आहे हे सत्यच; पण जाती-धर्माच्या बुरसट संकल्पनांचे ओझे जपणाऱ्या भारतीय समाजमनाच्या हिमनगाचे हे केवळ टोक आहे, हेदेखील तितकेच खरे. हा हिमनग वितळवण्यासाठी खोले प्रकरणाची धग कामी आली तर महाराष्ट्राचे भले होईल.
बातम्या आणखी आहेत...