Home | Editorial | Agralekh | tragedy and farce

ट्रॅजिडी आणि फार्स

- | Update - Jun 07, 2011, 08:44 AM IST

साधू, योगी, बाबा यांचे आणि तथाकथित सिव्हिल सोसायटीचे आंदोलन हे सर्व मुख्यत: सत्तेचे राजकारणच आहे

  • tragedy and farce

    आभाळ फाटल्यावर त्याला ठिगळे लावायचे तंत्रज्ञान अजून निर्माण झालेले नाही. दिल्लीतील यूपीए सरकारची अवस्था सध्या आभाळ फाटल्यासारखी झाली आहे. स्वत: पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांपैकी कुणीही ते आभाळ शिवायला पुढे आले नाही. याची मुख्यत: दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे साधू, योगी, बाबा यांचे आणि तथाकथित सिव्हिल सोसायटीचे आंदोलन हे सर्व मुख्यत: सत्तेचे राजकारणच आहे, हेच त्यांच्या लक्षात आले नसावे.    दुसरे कारण म्हणजे हे सरकार उलथून टाकण्यासाठी अण्णा आणि बाबा यांना पुढे करून प्रत्यक्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याचे समांतर डावपेच करीत आहे हे सोनिया-राहुल प्रभृतींना समजलेच नाही. जेव्हा समजले तेव्हा उशीर झाला होता. कारण तोपर्यंत परिस्थिती ठिगळे लावण्याच्या पलीकडे गेली होती. रामदेवबाबा हे एक ठकसेन आहेत हा शोध दिग्विजय सिंग यांना इतक्या उशिरा लागावा, हेही राजकीय दिवाळखोरीचे लक्षण आहे. या ठकसेनाबरोबर प्रणव मुखर्जींसह इतर ज्येष्ठ मंत्री चक्क वाटाघाटी करीत होते तेव्हा या दिग्गीराजांनी त्याला अटकाव करण्याचा प्रयत्नही केला नाही. रामदेवबाबांना मध्यरात्रीनंतर अटक झाली आणि मग काँग्रेसच्या नेत्यांना वाचा प्राप्त झाली. आता सोनिया गांधींनी एक खास बैठक बोलावली आहे. त्या बैठकीतून फारसे निष्पन्न होण्याची शक्यता नाही.    काळ्या पैशाचा प्रश्न आर्थिक नाही. तो आहे अव्वल राजकीय प्रश्न. केवळ तथाकथित नैतिकतेच्या निकषांवर त्या प्रश्नांचा सामना करता येणार नाही. सर्व नीतिमान मंडळींचे सर्व प्रश्नांवर आजवर कुठेही एकमत झालेले नाही. रामदेवबाबांच्या प्रतिष्ठानवर जी मंडळी ट्रस्टी आहेत, त्यांच्या सर्व व्यवहारांची चौकशी केली तरी योगी गुरूची नैतिकता किती दुटप्पीपणाची आहे हे लक्षात येईल. ज्या संघ व भाजपच्या स्वयंसेवक व स्वयंभू नेत्यांनी ऊरबडवेगिरीचे ओंगळ प्रदर्शन चालविले आहे, त्यांच्या नैतिकतेची लक्तरे देशात ठिकठिकाणी वेशीवर टांगली गेली आहेत. रामदेवबाबांनी भाजपमधील भ्रष्टाचाराबद्दल ‘ब्र’ (किंवा ‘भ्र’) सुद्धा काढलेला नाही. खरे म्हणजे तेव्हाच काँग्रेसवाल्यांना संशय यायला हवा होता. परंतु आपमतलबाच्या दलदलीत पाय रुतलेल्या काँग्रेसवाल्यांनी संवेदनशीलता व राजकारण दोन्ही सोडून दिले आहे. आता 2014 मध्ये, किंवा त्या अगोदर निवडणुका आल्या तर तेव्हा, हातातून सत्ता जाईल तेव्हाच त्यांच्या लक्षात येईल की, ठिगळे लावायला हाताशी सुई-दोराही नाही. लालकृष्ण अडवाणींना तर एक प्रकारचा ‘फोबिया’ ऊर्फ भयगंडच झाला आहे. तो फोबिया आहे आणीबाणीचा. बरोबर 36 वर्षांपूर्वी याच महिन्यात इंदिरा गांधींनी जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई अशा बर्‍याच ज्येष्ठ-र्शेष्ठ रथी-महारथींना अटकेत टाकले होते. त्यांनीही भ्रष्टाचारविरोधी चळवळीचे मुखवटे चढवून देशात अराजक माजविले होते. जर इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर करून तो अराजकाचा डाव उधळला नसता, तर देशात हिंसाचाराचा आगडोंब उसळला असता. तशाच प्रकारचे उग्र थैमान देशात घालायचा डाव आताही असावा. इजिप्तमधील जन आंदोलन झाल्यापासून तशा प्रकारचे उग्र वातावरण निर्माण करायचा प्रयत्न आपल्या देशात सुरू झालाच होता. इजिप्तमध्ये जसे मुबारक यांना जावे लागले तसेच आपण डॉ. मनमोहन सिंग यांनाही ‘तडीपार’ करू शकू, असा विश्वास संघ आणि मार्क्‍सवादी परिवार या दोघांनाही वाटू लागला होता. आणीबाणीच्या वेळेस इंदिराविरोधी अराजकाची सूत्रे थेट राजकीय पक्षांच्या हातात होती.    जयप्रकाश आणि त्यांचे सर्व सहकारी राजकारणात पूर्ण मुरलेले होते. जेपींचा त्या नव-राजकीय अवतारातील पवित्रा जरी बाबा-साधूसदृश होता, तरी त्यात सामील झालेले सर्वजण अस्सल राजकारणी होते. या वेळेस मात्र सर्वच राजकीय पक्षांचे वस्त्रहरण झालेले असल्यामुळे असेल कदाचित, लाल आणि भगवे, एका साधूच्या मेळ्यात शिताफीने सामील झाले आहेत. पण अराजक निर्माण करून आणीबाणी कशी अपरिहार्य केली हे त्यांना उत्तम आठवत असणार, कारण त्या वेळचे अनेक ‘यशस्वी’ कलाकार बाबांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. रामदेवबाबांना अटक करून त्यांना हरिद्वारला रवाना केले नसते आणि दुसर्‍या दिवशी जर दिल्लीत योगी मंडळींचा संयम सुटून त्यांनी हिंसक आंदोलन सुरू केले असते, तर त्यात काही माणसे मरण पावली असती. असे ‘हुतात्मे’ व्हावे ही परिवारांची व बाबांची इच्छा असणारच. कारण आपल्या देशातील चळवळींमध्ये ‘हुतात्म्यांची’ आहुती द्यावी लागते, असा अनुभव आहे. आपले राजकीय पक्ष आणि पुढारी इतके सत्तांध झालेले असतात की, त्यांना आपल्या खेळात सामान्य माणसाचा बळी जातो याचेही भान नसते. याच स्तंभात आम्ही म्हटल्याप्रमाणे काळ्या पैशाचा प्रश्न केवळ कायदे करून वा देहान्ताच्या शिक्षा ठोठावून सुटण्यासारखा नाही. समांतर अर्थव्यवस्था अगदी खालपर्यंत पोहोचलेली आहे. प्राणायाम करून कदाचित प्रकृती सुधारता येईल; पण देशाचे चारित्र्य सुधारता येणार नाही. साधू नि:संग असावा लागतो असे मानले जाते. पण या योग्याकडे अब्जावधी रुपयांची माया आहे, प्रचंड मोठा आर्थिक व्यवहार आहे, बिल्डर-कॉन्ट्रॅक्टर आणि धनदांडग्यांची या योग्याला साथ आहे आणि कोणताही विधिनिषेध नसलेल्या मीडियाची त्याला साथ आहे. अडवाणी म्हणतात त्याप्रमाणे परिस्थिती खरोखरच आणीबाणीसदृश आहे- पण पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आहेत, इंदिरा गांधी नाही. तेव्हाची आणीबाणी ट्रॅजिडी होती, आजची स्थिती फार्ससदृश आहे.Trending