आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटता जन्मदर, वाढती गुणवत्ता!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा यावर्षी पाच दिवस उशिरा सुरू झाली. यात सुरुवातीला कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार घातला होता. त्यामुळे निकाल लागायला जरा वेळच लागला. गतवर्षापेक्षा सहा दिवस उशिराने निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल लागण्याआधी तारखांबाबत सोशल मीडियावरून दररोज उत्सुकता वाढवली जात होती. अखेर महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने राज्यातील सर्व नऊ मंडळांचा निकाल केवळ एक दिवस आधी सूचना देऊन जाहीर केला. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना आश्चर्याचा धक्काच बसला. राज्यभरात बारावीच्या परीक्षेला १५ लाख ५ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यात सर्वाधिक ९३.५  टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. याचाच अर्थ एकूण परीक्षेला बसणाऱ्या मुलींमध्ये केवळ साडेपाच ते सहा टक्के मुली नापास झाल्या आहेत. त्यांचीही परीक्षेला न बसण्याची किंवा नापास होण्याची काही वेगळी कारणे असू शकतात. मुलींमधील गुणवत्ता सिद्ध करणारा निकाल केवळ यावर्षीच लागला आहे असे नाही. राज्यात मुलींनी बाजी मारण्याचे हे सलग २५ वे म्हणजेच रौप्यमहोत्सवी वर्ष ठरले आहे. 

१९९२ मध्ये पहिल्यांदाच कला, विज्ञान व वाणिज्य या तिन्ही शाखांमध्ये राज्यात मुली प्रथम आल्या होत्या. त्यानंतर २०१७ पर्यंत म्हणजेच गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने मुलींचा टक्का वाढत आहे.  देश आणि राज्यपातळीवर झालेल्या वेगवेगळ्या परीक्षांचे उदाहरण द्यायचे झाल्यास आयआयटी, एनआयटी अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षेतही नाशिकच्या वृंदा राठी या विद्यार्थिनीने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. तिने ३६०  पैेकी ३६० गुण मिळवण्याचा विक्रम केला आहे. त्यानंतर बारावीच्या सीबीएसई परीक्षेतही मुलींचाच टक्का वाढला आहे. आयसीएसईच्या दहावी परीक्षेतही यावर्षी पुण्याची मुस्कान पठाण ही  देशात पहिली आली आहे. तिच्या या यशाने महाराष्ट्र राज्याला देशात बहुमान मिळाला अाहे. 

परीक्षांच्या निकालांमध्ये मुलगी आणि मुलगा असा लिंगभेद करण्याची अजिबात इच्छा नाही. पण महिनाभरापूर्वी मुलींचा जन्मदर घटत असल्याचा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी- अधिक प्रमाणात मुलींचा जन्मदर घटत असल्याचे लक्षात आले आहे. मुलींचा घटता जन्मदर ही समाज आणि शासनासाठी चिंता वाढवणारी गोष्ट आहे. दुसरीकडे प्रशासकीय नोकरीसाठी घेण्यात येणारी देश, राज्यपातळीवरची परीक्षा असो अथवा दहावी, बारावीची परीक्षा, यात मुलीच टॉपर ठरतात. याचाच अर्थ मुलींमध्ये शिक्षण घेण्याची, साक्षर होण्याची, उच्च पदांवर जाण्याची जिद्द आहे. मुली प्रामाणिकपणे कोणतेही आव्हान स्वीकारण्याची तयारी दाखवत आहेत. 

मुलींमधील ही वाढती गुणवत्ता समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारीच आहे, हे आता कोणीही  नाकारू शकत नाही.  समाज आज वंशाला दिवा पाहिजे या हट्टापायी समतोल बिघडवण्याचे जे काम करत आहे, ते फार चुकीचेच आहे. ‘दिव्य मराठी’ने काही दिवसांपूर्वी सुरत येथे स्त्री भ्रूणहत्या करणारी टोळी कशी कार्यरत आहे, हे उघड करण्याचा प्रयत्न केला हाेता. महाराष्ट्रात काय आणि देशात काय, सर्वत्रच हा प्रकार मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. शासनातर्फे मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी शासनपातळीवर भरपूर प्रयत्न आणि कठोर कायदे केले जात आहेत. पण जोपर्यंत समाज आपली मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत ही चिंता कमी होणार  नाही, असे वाटते. वंशाला दिवाच हवा, असा आग्रह धरणाऱ्यांना  मुली आज जे देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवत आहेत, गुणवत्ता सिद्ध करत आहेत ते एक त्यांच्यासाठी आव्हानच आहे, असे म्हणायला हरकत नाही. दहावी, बारावीच्या परीक्षेत देश आणि राज्यातील ज्या मुलींनी गुणवत्ता सिद्ध केली आहे, त्यांनी स्वत:सोबत आपल्या आई-वडिलांचे नाव उंचावले आहे. खरंच आपण एका मुलीचे पालक आहोत, असा अभिमान त्यांना निश्चितच असणार आहे. प्रत्येक वर्षी स्पर्धा परीक्षा असो की दहावी, बारावीची परीक्षा, मुलींनी असेच टॉपर राहून आपल्या देशाचे, राज्याचे आणि आई-वडिलांचे नाव उंचावावे. आपल्या इच्छा आणि अाकांक्षांची पूर्ती करावी, याच त्यांना शुभेच्छा. अर्थात, बारावीच्या परीक्षेतील मुला- मुलींसह सर्वच गुणवंतांचे अभिनंदन  आणि भावी वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा! 

- निवासी संपादक, जळगाव
बातम्या आणखी आहेत...