Home »Editorial »Agralekh» Transaction In Readers Digest

‘रीडर्स डायजेस्ट’चे स्थित्यंतर...(अग्रलेख )

दिव्य मराठी नेटवर्क | Feb 23, 2013, 07:12 AM IST

  • ‘रीडर्स डायजेस्ट’चे स्थित्यंतर...(अग्रलेख )


जगाची इत्थंभूत माहिती सगळेच देत असतात. विकिपीडियासारख्या माहितीप्रचुर साइटवर तर ख-या - खोट्या, पूर्ण-अपूर्ण आणि योग्य-अयोग्य माहितीचा सदासर्वकाळ महापूरच असतो. परंतु केवळ पदरी माहिती आहे म्हणून एखाद्याची जशी जगाकडे बघण्याची दृष्टी विस्तारत नसते, तसेच जीवनाला दिशा देणारा व्यापक असा दृष्टिकोनही तयार होत नसतो. किंबहुना, त्यासाठी निव्वळ एकमितीय माहितीपेक्षा बहुस्तरीय मूल्यवर्धित ज्ञानाची आणि जगाकडे आत्मीयतेने बघायला लावणा-या करुणेची नितांत आवश्यकता असते. माणसामधल्या माणूसपणाला आकार देण्यासाठी आवश्यक अशा ज्ञान आणि मानवतावादी मूल्यांचा प्रसार गेली 91 वर्षे ‘रीडर्स डायजेस्ट’सारखे मासिक करत आले आहे. 21 भाषांतील तब्बल 49 आवृत्त्यांत प्रकाशित होणा-या या मासिकात रुक्ष माहितीपलीकडच्या बहुआयामी जगाची सैर घडवून आणण्याची विलक्षण क्षमता आहे. हीच क्षमता या मासिकाचे वेगळेपणही आहे आणि खासियतही. परंतु गेल्या आठवड्यात ‘रीडर्स डायजेस्ट’च्या अमेरिकास्थित प्रकाशकाने कर्जाच्या वाढत्या बोज्यामुळे अधिकृतपणे दिवाळखोरी जाहीर करून जगभरातील वाचकांना धक्का दिला. ही घोषणा करताना दिवाळखोरीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत छापील स्वरूपातले रीडर्स डायजेस्ट विनाविघ्न प्रकाशित होणार, असा दिलासा कंपनीचे अध्यक्ष आणि सीईओ रॉबर्ट ई. गुथ यांनी दिला. पण तरीही या मासिकाचे नित्य वाचन करणा-या नव्या-जुन्या पिढीतल्या जगभरच्या कोट्यवधी वाचकांच्या हृदयाचा ठोका चुकायचा तो चुकलाच.

नऊ दशके अखंडपणे छापील स्वरूपात वाचकांच्या भेटीला येणा-या या मासिकाच्या अनिश्चित भविष्याचे जाहीर संकेतच या घटनेमुळे मिळाले. अर्थात बदलत्या अर्थस्थिती आणि समाजस्थितीमुळे ‘रीडर्स डायजेस्ट’च्या अस्तित्वावर कधीतरी गदा येणार, याचा अंदाज जाणकारांना 2009 मध्ये जेव्हा पहिल्यांदा प्रकाशकाने दिवाळखोरीसाठी अर्ज केला, तेव्हाच आला होता. परंतु दरम्यानच्या काळात प्रकाशकाने डोक्यावर असलेले जवळपास एक कोटी डॉलर्सचे कर्ज चुकवण्यासाठी नाना लटपटी खटपटी करून बघितल्या; परंतु वेगाने घटते जाहिरात उत्पन्न, घटती वर्गणीदार आणि वाचक संख्या यांच्या एकत्रित परिणामामुळे मासिकाच्या उत्पन्नात अपेक्षेएवढी वाढ झालीच नाही. परिणामी दिवाळखोरीचा निर्णय जाहीर करण्यावाचून व्यवस्थापनाला गत्यंतर उरले नाही.

विकिपीडिया अथवा ‘गुगल सर्च’मधून समोर येणारी माहिती हीच यशाची गुरुकिल्ली असा समज करून घेतलेल्या नव्या पिढीला छापील स्वरूपातील ‘रीडर्स डायजेस्ट’ इतिहासजमा होत असल्याच्या या घटनेचा तितकासा अर्थ लागणार नाही, परंतु ज्यांनी या मासिकांचा मनोभावे संग्रह केला आहे, पारायणे केली आहेत, त्यांच्यासाठी हा निश्चितच निराश करणारा क्षण आहे. तसे पाहता पहिले महायुद्ध संपल्यानंतरच्या चारच वर्षांत म्हणजेच, 1922 मध्ये मासिकाच्या प्रकाशनास प्रारंभ झाला होता. त्या वेळी महायुद्धाची दाहकता अनुभवलेल्या अमेरिकी मध्यमवर्गास शांततेची आस होती. सामाजिक नीतिमूल्यांची जपणूक करून त्याला स्वत:ला सावरायचे होते. उन्नत व्हायचे होते. याचेच प्रतिबिंब मासिकात प्रकर्षाने उमटत होते. सामान्यज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, आरोग्य, साहस, पर्यावरण, विनोद या जोडीने जीवनानुभव कथन करणा-या दीर्घकथा, लघु कादंब-या आणि दीर्घ लेखही, अशा जगण्याच्या विविध अंगांना भिडणा-या विषयांचा त्यात समावेश होता. मानवतावादी विचारसरणी हा या मासिकाचा पाया होता. भूतदयावादी ख्रिश्चॅनिटीचा या विचारसरणीवर मोठा प्रभाव होता. त्या अर्थाने जगभरातल्या विविध भाषक वाचकांसाठी (आणि भारतातल्या इंग्रजीत स्वत:ला अभिव्यक्त करू पाहण्यास इच्छुक नवशिक्षितांसाठीही) ‘रीडर्स डायजेस्ट’ हे नैतिक, सांस्कृतिक अधिष्ठान असलेले; ज्ञानाचा आत्मविश्वास देणारे एक समांतर विद्यापीठच बनले होते.

‘एलिटिस्ट’ तोरा नसलेल्या या विद्यापीठातून लौकिकार्थाने कुणी पदवीधर होत नव्हते, परंतु एखाद्या पदवीधरापेक्षाही व्यापक ज्ञान देण्याची क्षमता त्यात होती. किंबहुना, वाचकांना जगाचे ज्ञान आणि भान देणे हाच या मासिकाचा मुख्य उद्देश होता. जगाचे भू-राजकीय नकाशे, प्रसिद्ध लेखकांच्या लघु कादंब-यांची छोटेखानी पुस्तके, आरोग्य, विज्ञानविषयक पुस्तिका प्रकाशित करणे हे मासिकाचे वेगळेपण होते. माहिती-ज्ञानाच्या प्रसारासोबतच वाचकांना आकृष्ट करण्यासाठी ग्रंथ साहित्यापासून नित्य वापराच्या वस्तू अंकासोबत मोफत देण्याचे मार्केटिंग तंत्र प्रकाशकाच्या वतीने वेळोवेळी राबवले गेले होते. इतकेच नव्हे, वाचकांचा पाठपुरावा करताना वाचकांशी पत्रव्यवहार करण्यात ‘रीडर्स डायजेस्ट’चा हात धरणारे कुणी नव्हते, मात्र 90 च्या दशकात डिजिटायझेशनच्या वाढत्या प्रभावाचा मासिकाला फटका बसत गेला. 1995 पासून ‘रीडर्स डायजेस्ट’ मासिकाच्या जगभरातल्या तब्बल 15 कोटी वाचकांपैकी दोन तृतीयांश वाचक टप्प्याटप्याने घटत गेले. वस्तुत: ज्या प्रकाशनाने मासिकाच्या प्रसार-प्रचारासाठी वेळोवेळी यशस्वीपणे मार्केटिंग तंत्र राबवले, त्यांचा स्पर्धेत निभाव न लागण्याचे काही कारण नव्हते. परंतु येथेसुद्धा ‘रीडर्स डायजेस्ट’ने स्वत:ची म्हणून काही मूल्ये जपली होती आणि व्यवहारात त्याचीच किंमत त्यांना वेळोवेळी चुकवावी लागली होती. त्यानुसार मासिकात सिगारेट आणि दारूच्या जाहिरातींना, उथळपणाकडे झुकणा-या छायाचित्र-मजकुराला मज्जाव होता. या ‘अव्यवहार्य’ कृतीचा अर्थातच मासिकाच्या उत्पन्नावर, पर्यायाने वाचकसंख्येवर विपरीत परिणाम होणे स्वाभाविक होते. यात लक्षवेधी बाब म्हणजे एका बाजूला रीडर्स डायजेस्टने ज्या मूल्यांची जपणूक करून आजवरची वाटचाल केली होती, त्या मूल्यांना मासिकाचा एकनिष्ठ वाचक असलेल्या नवमध्यमवर्गाने मात्र तिलांजली द्यायला प्रारंभ केला होता. त्याची अभिरुची झपाट्याने बदलत (की खालावत?) होती. या नवमध्यमवर्गाला ज्ञानापेक्षा सवंगपणाचे, दिखाऊगिरीचे आणि आकर्षक मांडणीचे अधिक आकर्षण वाटू लागले होते. काहीसे अनाकर्षक आणि ज्ञानाधिष्ठित रचना असलेले ‘रीडर्स डायजेस्ट’ त्यात कुठेही बसत नव्हते. म्हणजेच नवमध्यमवर्गाची सुटलेली साथ हेच खरे तर प्रकाशन संस्था दिवाळखोरीत निघण्याचे मूळ कारण ठरले आहे.

अर्थात, मूल्यांना तिलांजली देण्यापेक्षा दिवाळखोरी जाहीर करून येथेसुद्धा या मासिकाने स्वत:चे वेगळेपण जपले आहे. मुळात नीतिमूल्यांचा आग्रह धरणारा समाजच उरला नाही, तर ‘रीडर्स डायजेस्ट’सारखा ज्ञानयज्ञ तेवत राहावा तरी कसा, हा प्रश्नही येथे स्वाभाविक आहे. आता यापुढे डिजिटल एडिशनवर भर देत उत्तर अमेरिकेतील वाचकपेठेवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस रीडर्स डायजेस्टच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला, ही एकच दिलासा देणारी गोष्ट असली तरीही छापील मासिकाचा अक्षरस्पर्श यापुढे अनुभवता येणार नाही, ही ‘रीडर्स डायजेस्ट’च्या एकनिष्ठ वाचकांसाठी ख-या अर्थाने उदास करणारी गोष्ट आहे.

Next Article

Recommended