आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टक्केवारीचा फुगवटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी परीक्षेचा निकाल अखेर सोमवारी जाहीर झाला आणि सोशल मीडियावरील अफवांना पूर्णविराम मिळाला. राज्याचा एकूण निकाल ८८.७४ टक्के लागला. गतवर्षाप्रमाणे यावर्षीही निकालाची वैशिष्ट्ये तीच आहेत. मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली असून एकूण निकालात उत्तीर्ण होणाऱ्या मुलींची टक्केवारी ही ९१.४१ टक्के आहे. गतवर्षापेक्षा त्यात आणखी ४ टक्क्यांनी भर पडली हे विशेष. दहावी, बारावीची परीक्षा ही आयुष्यातील टर्निंग पॉइंट मानली जाते.  त्यामुळे पाल्य दहावी, बारावीला प्रवेशित झाल्यानंतर त्याच्यासोबत पालकांचेही एकाअर्थी ‘अॅकॅडमिक करिअर’ सुरू होते. पालकांची ही मानसिकता बघून शाळा, महाविद्यालये आणि खासगी पातळीवर सुरू असलेल्या क्लासेस चालकांमध्येही पालक आणि विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याची स्पर्धा लागली आहे. अनुदानित, विनाअनुदानित संस्थादेखील दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये बनवेगिरी करून आपल्या शाळांचा निकाल उंचावण्याचा प्रयत्न करतात. ज्या शाळांचा निकाल नववीत ७० ते ८० टक्के नसतो, त्या शाळांचा दहावीचा निकाल एकदम नव्वदीपार लागतो. काही शाळांचा तर १०० टक्के निकाल लागतो. दहावीच्या निकालाची ही टक्केवारी पाहिली तर संशयाला मोठी जागा आहे.
 
गुणवत्तेचा स्तर उंचावून निकालाचा टक्का वाढत असेल तर त्यात आनंदच आहे. पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास करायचे नाही, या धोरणामुळे शाळा गुणवत्ता नसलेल्या मुलांना ९ वीत नापास करतात.  विद्यार्थी नववीमध्ये आल्यानंतर संस्था विद्यार्थ्यांना नापास करतात, याचाच अर्थ नववीपर्यंत त्याची गुणवत्ता उंचावण्यासाठी काहीच प्रयत्न झालेले दिसत नाहीत. नववीत जर मुलांना नापास करण्याची किंवा त्यांना संस्थेतून काढण्याची वेळ येत असेल तर पाचवीपासूनच मुलांना नापास करण्याचे धोरण योग्य होते, असे म्हणण्याला वाव आहे. मुलगा पाचवीत नापास झाला तर त्याची गुणवत्ता वाढवण्याची जबाबदारी ही अध्यापकांची असते आणि हे काम ते तेव्हा इमाने इतबारे करीत होते. आता उत्तीर्णच करायचे आहे मग नववीपर्यंत कुणीच लक्ष देत नाही. दहावीच्या निकालाचा टक्का वाढवायचा असतो म्हणून संस्था नववीत विद्यार्थ्यांना नापास करतात पण त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत. त्यामुळे दहावीच्या निकालाचा टक्का वाढला असला तरी त्यात किती तथ्य आहे, हेही तपासले गेले पाहिजे. शाळेचा निकाल १०० टक्के लागावा म्हणून कसे प्रयत्न होतात, हे परीक्षा काळातील कॉपीप्रकरणी झालेल्या कारवाईचा आकडा पाहिला तर लक्षात येईलच. त्यामुळे निकालाचा टक्का गुणवत्तेने वाढला पाहिजे, निव्वळ वाढलेला आकडा हा विद्यार्थी, पालक आणि पर्यायाने देशाची दिशाभूल करणारा ठरू शकतो. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वांनाच सरकारी नोकरी मिळतेच असे नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांचा आकडा दरवर्षी वाढत असतो. हा आकडा वाढण्याची कारणे म्हणजे पारंपरिक शिक्षण पद्धती.
 
सरकारीपेक्षा सध्या खासगी क्षेत्रात रोजगाराच्या अधिक संधी आहेत. बदललेले तंत्रज्ञान आणि लोकांच्या आवडी, निवडी, गरजा या सर्वच पार्श्वभूमीवर रोजगार उपलब्ध होत आहेत. याची आकडेवारी दृश्य स्वरूपात येत नसली तरी ते खरे आहे. हे इथे स्पष्ट करण्याचे कारण म्हणजे दहावीत मुलांना मिळालेली टक्केवारी पाहून आपण सारेच भारावतो, पण पुढे जाऊन या सर्व गुणवंतांचे काय होते, याची माहिती घेतली तर वेगवेगळ्या कहाण्या ऐकायला मिळतात.
 
अनेक जण खूप पुढे जातात तर काहींच्या पदरी निराशा येते. त्यामुळे मुलांचा भविष्यकाळ घडवायचा असेल तर पाचवीपासूनच जागतिक पातळीवरील बदलत्या जीवनशैलीचा अापल्या दैनंदिन जीवनावर हाेत असलेल्या परिणामांचा विचार करून अभ्यासक्रमांत सातत्याने बदल तर केलाच पाहिजे, विशेषत: रोजगाराभिमुख शिक्षण दिले पाहिजे. अनेक उद्योजकांचे म्हणणे आहे की, त्यांना ज्या कौशल्यपूर्ण उमेदवारांची गरज आहे, ते उमेदवार आजही मिळत नाहीत. नोकरीत सामावल्यानंतर उमेदवारांना दोन, तीन वर्षे प्रशिक्षण द्यावे लागते. त्यामुळे शाळा, महाविद्यालये हे त्यांच्या दृष्टीने पदवीधर निर्माण करणारे कारखाने झाले आहेत. दहावी, बारावीच्या निकालाची गेल्या काही वर्षांपासूनची  आकडेवारी पाहिली तर त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे, असे वाटते. राज्याच्या शिक्षण विभागाने काळाची पाऊले ओळखून निकालाच्या वाढत्या टक्केवारीला कार्यकुशल गुणवत्तेची जोड देण्याची गरज आहे.  
 
बातम्या आणखी आहेत...