आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे बदल रही है, पण...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वे विभागात अधिकार, मानसन्मान आणि महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या काही पदांमधील महाव्यवस्थापक हे एक पद आहे. दोन महिन्यांपूर्वीच अखिल अग्रवाल यांनी सेंट्रल रेल्वेचा पदभार स्वीकारला. या विभागात मुंबईसह, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूरचा समावेश होतो. या पाच विभागांचे प्रमुख असलेल्या अग्रवाल यांनी सोमवारी भुसावळ विभागाची पाहणी करून आढावा घेतला, सूचना केल्या आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून काही चांगले बदल होत असल्याचे सूतोवाच केले. मध्य रेल्वेचा चेहरामोहराच बदलण्याचा विचार रेल्वे मंत्रालय करीत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होते. महत्त्वपूर्ण अधिकारी असल्यामुळे खासदार ए.टी. पाटील, रक्षा खडसे यांनीही अग्रवाल यांची भेट घेऊन काही प्रस्ताव दिले. तसेच या विभागातील सेवा, सुविधा आणि उणिवांची जाणीव करून दिली.

भुसावळ विभागाचे नाशिक ते बडनेरा आणि भुसावळ ते खांडवा असे ९२२ किलोमीटरचे कार्यक्षेत्र आहे. या संपूर्ण विभागात अप आणि डाऊन अशा दोनच लाइन असल्यामुळे दररोजच्या प्रवासी गाड्या, मालगाड्या आणि सीझनमध्ये मागणीनुसार सुरू करावयाच्या नवीन गाड्या, यांच्या वेळा सांभाळताना रेल्वे प्रशासनाची दमछाक होते. या कारणाने बहुतांशी गाड्या ह्या लेटच होतात. तात्पुरता उपाय म्हणून आॅटो सिग्नल यंत्रणा सुरू केली आहे. या यंत्रणेमुळे भुसावळ ते भादली या मार्गात केवळ एकच गाडी सोडली जाते. त्यामुळे वेळेची बचत होत असल्याचे सांगितले जाते. पण वाढत्या वाहतुकीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून भुसावळ विभागात तिसरी लाइन मंजूर करण्यात आली आहे. ही पुढे गुजरातला (सुरत) जोडली जाणार आहे. या लाइनचे कामही वेगाने सुरू आहे. भविष्यात वाढणारी वाहतूक पाहता भुसावळ ते जळगाव येथे चौथी लाइन आणि जळगाव ते मनमाड, भुसावळ ते अकोला या दोन मार्गांवर तिसरी लाइन मंजूर करण्यात आली आहे. प्रत्येक अर्थसंकल्पात नवीन गाड्या सुरू केल्या जातात, पण या गाड्या आहे त्याच मार्गावर चालवणार कशा? याचा विचार करून रेल्वेने टप्प्याटप्प्याने मार्ग वाढवण्याचा निर्णय घेतला, यात भुसावळ विभागातील कामांना अधिक गती दिल्याचे दिसते.
तिसऱ्या आणि चौथ्या लाइनची कामे पूर्णत्वास आल्यास दळणवळणाचा मार्ग अधिक सुकर होईल, हे काम म्हणजे विभागातील विकासाचे मोठे पाऊल समजले जात आहे. नवीन गाड्या, नवे मार्ग होत असतानाच भुसावळ स्थानकावर आयलँड प्लॅटफॉर्म केला जात आहे. त्याचबरोबर नोव्हेंबरमध्ये लिफ्टही सुरू होणार आहे. अपंग, दुर्धर व्याधिग्रस्त, वयोवृद्ध प्रवाशांसाठी या लिफ्टचा खूप उपयोग होणार आहे. प्रवासातील खटखट.. खटखट बंद व्हावी म्हणून रूळ जोडण्याच्या नट-बोल्टची सिस्टिम जाऊन काही किलोमीटरचे रूळ देशभर टाकले जात आहेत. ज्या, ज्या स्थानकावरील उत्पन्न अधिक आहे, त्या ठिकाणांवरील स्थानकांवर खर्च करून त्यांना कॉर्पोरेट लूक देण्याचे कामही सुरू झाले आहे. लवकरच अशा स्थानकांवर देशभरातील मोठ्या स्थानकांप्रमाणे वायफायही सुरू केले जाणार आहे. भुसावळ विभागात सध्या नाशिक रोड हे सर्वाधिक उत्पन्न देणारे स्थानक समजले जाते, त्यामुळे त्याचा दर्जा ‘ए’ प्लस आहे. तेथे प्रवाशांसाठी अधिक सुविधा पुरवल्या जात आहेत. काही प्रस्तावित आहेत. त्याखालोखाल या मार्गावर मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला आणि खांडवा या ‘ए’ दर्जाच्या स्थानकांचेही रूप बदलवण्याचे काम सुरू आहे.
रेल्वेत आॅटो ब्रेक सिस्टिम आली, वायफाय आले, सीसीटीव्ही आले, रुळावर काही धोका असल्यास ड्रायव्हरला सेन्सरद्वारे सिग्नल दाखवणारी अपघातरहित यंत्रणाही कार्यरत झाली आहे, पण प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू, दागिने यांच्या चोऱ्या होण्याचे प्रमाण काही बंद झाले नाही. बंद तर सोडाच, कमीही झाल्याचे दिसत नाही. पूर्वी केवळ सर्वसाधारण बोगीपर्यंत असलेला हा विषय आता वातानुुकूलित बोगींपर्यंत पोहाेचला आहे. एकीकडे रेल्वे बदल रही है, हे वास्तव चित्र असताना लूटमार, चोऱ्यांच्या घटना कमी होत नसल्यामुळे सुरक्षित प्रवासातील धोकेही वाढले आहेत. हे कमी करण्यासाठी आरपीएफची संख्या वाढवली पाहिजे. स्थानकांवर संरक्षक भिती बांधल्या पाहिजेत. एका प्रवाशाला सोडायला येणाऱ्यांसोबतची संख्या कमी केली पाहिजे. एअरपोर्टसारखी यंत्रणा मोठ्या स्थानकांवर कार्यरत केली पाहिजे, असे केले तरच रेल्वे प्रवासातील धोके कमी होतील. कारण मौल्यवान वस्तूंसोबतच जीवही अनमोल आहे, याचे भान प्रशासनाने राखले पाहिजे.
( लेखक जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक आहेत)
बातम्या आणखी आहेत...