Home »Editorial »Columns» Trimbak Kapade Writes About Teacher Transfers

शिक्षक बदल्यांचे पांगळे धोरण

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदांच्या माध्यमातून आदिवासी, दुर्गम आणि गावपातळीवर १ लाख ९ हजार ९१२ शा

त्र्यंबक कापडे | Oct 04, 2017, 03:00 AM IST

  • शिक्षक बदल्यांचे पांगळे धोरण
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदांच्या माध्यमातून आदिवासी, दुर्गम आणि गावपातळीवर १ लाख ९ हजार ९१२ शाळा चालवल्या जातात. या शाळांमध्ये ७ लाख ६० हजार ८९७ शिक्षक कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षणाच्या आधुनिक प्रवाहात यावा म्हणून शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकांच्या हिताचाही शासन सातत्याने विचार करत असते. शिक्षकांना सुविधा, वेतनवाढ, प्रशिक्षण, त्यांच्या बदल्या या गोष्टींचाही प्राधान्याने विचार केला जातो. गेल्या वर्षापर्यंत शिक्षकांच्या बदल्यांबाबत प्रशासकीय आणि विनंती बदल्यांचे धोरण शासनस्तरावर निश्चित केल्यानंतर त्याची अंमलबजावणी ही जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत केली जात होती. मात्र, सीईओ आणि बीडीओ पातळीवर होणाऱ्या बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढत जाऊन अनेक पात्र शिक्षकांवर अन्याय होत आला. बदल्यांबाबतचा शिक्षकांवर होणारा अन्याय दूर करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने यावर्षी प्रथमच एकाच वेळेस आॅनलाइन बदल्यांचे धोरण जाहीर केले. हे धोरण जाहीर करताना अपंग, दुर्धर आजार, विधवा, परित्यक्ता, अवघड क्षेत्रात कार्यरत किंवा काम केलेले, पती- पत्नी एकत्रीकरण, ५३ वर्षे वयावरील ज्येष्ठ शिक्षक यांना गाव, शाळा निवडण्यासाठी सवलत देत अन्य सामान्य शिक्षकांची रिक्त जागांवर बदली करण्याचे धोरण जाहीर केले. शासनाचा हेतू पारदर्शी आणि कुणावरही अन्याय न करणारा असला तरी त्यात अनेक पळवाटा शोधण्यात शिक्षक यशस्वी झाले आहेत. राज्यभरात साडेसात लाख शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी पाच लाख शिक्षक बदलीस पात्र असतील तर त्यापैकी अडीच लाखांपेक्षा अधिक शिक्षकांकडे अपंग, दुर्धर आजार आणि बदली टाळण्यासाठीचे अन्य खोटे प्रमाणपत्र उपलब्ध आहेत. यापैकी ९० टक्के बोगस असल्याचे बोलले जात आहे. कारण कर्णबधिर असलेला शिक्षक तासन््तास मोबाइलवर बोलताना दिसतो. अपंग दररोज मोटारसायकलीवर फिरतो, नेत्रदोष असलेले डोळसाला लाजवतील, अशी वैयक्तिक कामे करताना दिसतात. ज्यांची निव्वळ अँजिअाेप्लास्टी, अँजिओग्राफी झाली आहे, त्यांना बायपास, हृदय शस्त्रक्रिया दाखवल्या आहेत. त्यामुळे सामान्य शिक्षकांमध्ये साहजिकच या शिक्षकांविषयी चीड निर्माण होते. काही शिक्षक अपंगांचा भत्ता, आयकरात सवलतींसह अन्य लाभही घेतात. नवीन बदली धोरणात अशा बोगस प्रमाणपत्रधारक शिक्षकांनी बदली टाळण्यातही यश मिळवले आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अन्याय दूर व्हावा म्हणून शासनपातळीवर दखल घेतली जात नाही. त्यामुळे काही शिक्षक न्यायालयातही गेले आहेत. दुसरीकडे शासनस्तरावरच बदली प्रक्रियेचा एक-एक टप्पा पूर्ण केला जात आहे. शासनाच्या बदली धोरणाला जसा खोट्या अपंगांनी हरताळ फासण्याचा प्रयत्न केला. तसेच एकंदरीत बदली धोरणाबाबतही सामान्य शिक्षकांमध्ये नाराजी आहे. पती-पत्नी एकत्रीकरणाचा नियम लावताना जिल्हा परिषदेतील शिक्षकांनाच हा लाभ का? अन्य सरकारी, निमसरकारी, खासगी क्षेत्रात ज्यांची पत्नी किंवा पती कार्यरत असेल तर त्यांनी कुठेही विभक्त राहून नोकरी करावी का? याउलट धोरण अपेक्षित होते. जिल्हा परिषदेत कार्यरत पती-पत्नी दोघांपैकी कुणीही एक बदलीस पात्र असेल तर त्यांच्या इच्छेनुसार दोघांची बदली अन्य तालुक्यात ३० किलोमीटरच्या आत करावी म्हणजे त्यांचीही सोय होईल आणि अन्य शिक्षकांवरही अन्याय होणार नाही. तसेही करायचे नसेल तर केवळ विधवा, परित्यक्त्या आणि ज्येष्ठ शिक्षकांना सवलत देऊन अन्य सर्वच शिक्षकांची नोकरीतील ज्येष्ठतेनुसार बदली केली पाहिजे. कारण ग्रामविकास विभागातील अधिकाऱ्यांनी केवळ काहींच्या सोयीचा विचार करून बदली धोरणाचे परिपत्रक काढल्यामुळे अन्यायग्रस्त एकत्रित आले आहेत. दुसरा नोंद घेण्यासारखा मुद्दा म्हणजे अवघड क्षेत्र किंवा अन्य पहिल्या संवर्गातील शिक्षकांनी एखाद्या सोयीच्या गावाला बदली मागितली असेल तर त्या गावातील शाळेवर दोन, चार, पाच वर्षांपूर्वी आलेल्या शिक्षकाला बदलीचा ‘खो’ देण्यात आला आहे. याचाच अर्थ एकाला न्याय देताना दुसऱ्यावर अन्याय करण्याचाच हा प्रकार आहे.

प्रत्यक्षात काही शाळांवर अनेक शिक्षक हे १० ते १५ वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांची शाळा कुणी मागितली नाही म्हणून त्यांना ‘खो’ नाही. या प्रकाराबाबतही शिक्षकांमध्ये नाराजी आहे. वास्तविक ज्येष्ठतेनुसार नियुक्त्या कराव्या लागणार असताना बदलीचा ‘खो’ही त्याच प्रमाणे द्यायला हवा होता. १० वर्षांपेक्षा अधिक वर्षे एकाच शाळेत कार्यरत शिक्षकांची यादी तयार करून त्यांनाच ‘खो’ देता येईल, असे धोरण हवे होते; पण खोट्या अपंगांप्रमाणेच शासनाचे धोरणही पांगळे असल्याची टीका हाेत आहे.
- त्र्यंबक कापडे, निवासी संपादक, जळगाव

Next Article

Recommended