आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात प्रवेश करणार -तृप्ती देसाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वातंत्र्यानंतर ६५ वर्षे झाली तरी स्त्री-पुरुष समानतेसाठी मला झगडावे लागत आहे. माझी अश्लील पद्धतीने बदनामी करण्यापासून ते मला जिवे मारण्याचेही प्रयत्न झाले. पण समानतेच्या हक्कासाठी झगडणे हा गुन्हा झाला काय ? अशी विचारणा मंदिर प्रवेश आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे.

कोल्हापूरपासून जवळच असलेल्या कर्नाटकातील निपाणी येथील मूळच्या असलेल्या देसाई यांचे सासर कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील लिंगनूर येथील आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून त्या पुण्यात स्थायिक आहेत. २००३ पासून सामाजिक कार्याला सुरुवात केल्यानंतर पुण्यातील अजित बँक घोटाळा त्यांनी बाहेर काढला. ही बँक अजित पवार यांच्या नातेवाइकांची असल्याने माझ्यावर खूप दबाव आला. परंतु अखेरपर्यंत संघर्ष करत ३५ हजार ठेवीदारांपैकी ३० हजार ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळवून देण्यात मी यशस्वी झाल्याचे त्यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.

२०१० मध्ये भूमाता ब्रिगेडची स्थापना झाली. आम्ही झोपडपट्टीपासून अनेक क्षेत्रात उपक्रम राबवले. परंतु २९ नोव्हेंबरला एका तरुणीने शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतले. ही घटना समजल्यानंतर विश्वस्त आणि गावकऱ्यांनी तेथे अभिषेक करून ती जागा पवित्र केली, असे जाहीर केले. जर महिलेच्या स्पर्शाने जागा अपवित्र होत असेल तर हा महिलांवरील फार मोठा अन्याय आहे. म्हणूनच चिडून आपण शनिशिंगणापूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरांतील आंदोलने हातात घेतली, असेही त्यांनी सांगितले.

अतिरेक्यासारखी वागणूक
राज्य सरकार आणि पोलिस प्रशासन हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचे या तिन्ही शहरांतील आंदोलनादरम्यान दिसून आल्याचे सांगतानाच अतिरेक्यासारखी आम्हाला वागणूक दिली गेली. शिंगणापूरमधून बाहेर पडताना आता तुमचा अपघात होणार असल्याची मला भीतीही घालण्यात आली. परंतु मी डगमगले नाही, असे तृप्ती देसाई म्हणाल्या. अशी आंदोलने चालू असताना राज्य सरकार आणि पोलिस प्रशासनाने दुटप्पी भूमिका घेतली. तेव्हा आम्ही २० डिसेंबरला शनिशिंगणापूर मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केला. मी आणि अन्य तीन महिलांनी थेट चौथऱ्यावर चढण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने आम्हाला बळजबरीने बाहेर काढण्यात आले.

कोल्हापुरात मारहाण
कोल्हापुरातही तृप्ती देसाई यांना महालक्ष्मी मंदिरात प्रवेश करण्यासाठी बुधवार, १३ एप्रिल रोजी भाविकांच्या विरोधांचा सामना करावा लागला. "ड्रेस कोड' धुडकावून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतल्याने भाविकांनी त्यांना मारहाण केली. भाविकांच्या तावडीतून सोडवून त्यांना बाहेर आणताना पोलिसांची तारांबळ उडाली. बुधवारी रात्री त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तृप्ती यांनी साडी नेसून दर्शन घ्यावे, अशी स्थानिकांची मागणी होती. मात्र, त्यांनी पंजाबी ड्रेस घालून देवीचे दर्शन घेतले. या घटनेबाबत बोलताना तृप्ती देसाई यांनी सांगितले, कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांच्या क्रांतिकारक निर्णयामुळे देशात दलित आंदोलनाला दिशा मिळाली. कोल्हापूर शहर हे अनेक आंदोलनांसाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे. कोल्हापुरातही माझ्या या आंदोलनामुळे मला जिवे मारण्याचा कट रचण्यात आला होता. येथील प्रकार म्हणजे शाहू महाराजांच्या विचारांची हत्या करण्याचा प्रकार होता. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जो अधिकार महिलांना दिला आहे त्या हक्काच्या लढ्यासाठीच मी कोल्हापुरात आले. माझ्या सासरची मंडळी या आंदोलनात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत, असे त्यांनी सांगितले

तृप्ती देसाई यांचे शिक्षण पुण्यातील एसएनडीटी महाविद्यालयात झाले. तेव्हापासूनच त्यांनी सामाजिक कार्यास सुरुवात केली. कौटुंबिक अडचणीमुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही तरीसुद्धा त्यांना सामाजिक कार्याच्या बैठकांत आणि आंदोलनात भाग घेण्याची आवड होती. या काळातच त्यांनी २००९ मध्ये पुण्यातील अजित बँकेचा घोटाळा उघडकीस आणला. या बँकेने ३५ हजार खातेदारांना चुना लावला होता. ही बँक माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाइकांशी संबंधित असल्याने त्यांना धमक्या देण्यात येऊ लागल्या. परंतु आंदोलनाच्या रेट्यामुळे बँकेच्या २९ हजार ग्राहकांचे पैसे परत मिळाले. तेव्हा तर ब्रिगेडमध्ये केवळ तीनच महिला कार्यरत होत्या. एक सदस्या तर केवळ १६ वर्षांची होती. आता भूमाता ब्रिगेडचे ४ हजार सदस्य झाले आहेत. या ब्रिगेडच्या १६ शाखा झाल्या आहेत. यातील बहुतांश शाखा पश्चिम महाराष्ट्रात आहेत.

मुस्लिम महिलांचाही संपर्क : आमची लढाई समानतेच्या हक्काची असून मुंबईत हाजी अली दर्ग्यात प्रवेशासाठी भारतीय मुस्लिम महिलांनी आमच्याशी संपर्क साधला, असे तृप्ती देसाई यांनी सांगितले. आता आमच्यावर राजकीय हेतूने प्रेरित आरोप केले जात आहेत. परंतु या आरोपात तथ्य नाही. आम्हाला आमचे कार्य पक्षातीत करायचे आहे. पक्षांचा पाठिंबा घेऊन असे कार्य शक्य नाही. आता २१ वे शतक चालू आहे. आम्हाला बदलण्याची आवश्यकता आहे. महिला लढ्यासाठी स्वत:हून पुढे येत आहेत. आम्हाला मूठभर लोक थांबवू शकणार नाहीत.

भूमाता ब्रिगेडची आंदोलने
>शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर (नाशिक) व कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात प्रवेशासाठी आंदोलन
>पुण्यात कांदे आणि भाज्यांच्या किमतीवरून लढा.
>अजित सहकारी बँक घोटाळा
>कौटुंबिक हिंसाचार, हुंड्यासाठी छळ, छेडछाडीच्या विरोधात आंदोलने.

* मुलाखत : समीर देशपांडे/कोल्हापूर