आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश जैनांचे आस्ते कदम !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मरगळ आलेल्या जळगाव शहरातील शिवसेनेला चालना देण्यासाठी माजी आमदार सुरेश जैन यांना सोमवारी सक्रिय सदस्य करून घेत पक्षाने सदस्य नोंदणीला प्रारंभ केला आहे. सर्वच राजकीय पक्षांचा अनुभव गाठी असलेल्या सुरेश जैनांनी शिवसेना हे शेवटचेच स्टेशन असल्याचे यापूर्वीच म्हटले आहे. त्यामुळे ते शिवसेनेचीच मोट बांधतील यात शंका घेण्याचे काहीएक कारण नाही. तथापि, कोट्यवधी रुपयांच्या घरकुल घोटाळ्याच्या आरोपात साडेचार वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर जैन यांची जामिनावर सुटका झाली असली तरी, साडेचार वर्षे कोणत्याही राजकीय व्यक्तीसाठी फार मोठा कालावधी आहे. या साडेचार वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. जैन यांना जामिनावर सोडले असले तरी अजून खटल्याचा निकाल लागायचा राहिला आहे. निकाल काय लागतो, यावरही त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असणार आहे. मात्र, जळगाव शहर, जिल्ह्याचे बदललेले राजकीय हवामान पाहता जैन यांचे पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे विरोधक, खडसेंपासून नाराज झालेली, दुरावलेली मंडळीही जैन यांना जाऊन मिळाली आहे.

जैनांना जामीन मंजूर झाला आणि ते तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांच्या समर्थकांनी ‘इव्हेंट’ साजरा केला त्याला तोड नव्हती. कदाचित जैनांनाही वाटले नसेल आपले एवढे स्वागत होईल; पण तसे घडले आहे. जैन हे या स्वागताने हुरळले असते तर त्यांनी लगेच त्यांच्या स्वभावाप्रमाणे विरोधकांवर आसूड ओढत, कायद्याला न जुमानता सनसनाटी स्टेटमेंट केले असते. त्यांचे हे स्टेटमेंट प्रसारमाध्यमांची हेडलाइनही झाली असती. पण त्यांनी तसे काहीही केले नाही. माझे लक्ष खटल्याकडे असणार आहे, एवढेच ते बोलले. त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यास दुजोरा देत आम्ही त्यांना आराम करायला लावू म्हणून सांगितले. गेल्या साडेचार वर्षांत सुरेश जैनांचा स्वभावही खूप बदललेला दिसतो. परिस्थिती माणसाला खूप काही शिकवून जाते, असे म्हणतात. कदाचित तसेही असेल. घरकुल घोटाळा उघडकीस येण्यापूर्वी सुरेश जैन यांची राज्याच्या राजकारणात दादागिरी होती. त्यांनी जळगावकरांच्या विश्वासावर अनेक पक्ष बदलले, कार्यकर्ते, लोकही त्यांच्यासोबत पक्ष बदलत गेले.

जर त्यांना अपहाराच्या आरोपात तुरुंगात जावे लागले नसते तर शिवसेनेची सोबत घेऊन देवेंद्र फडणवीसांनी स्थापन केलेल्या सध्याच्या भाजप सरकारमध्ये ते शिवसेनेचे आघाडीचे मंत्री राहिले असते. अर्थात, हे जर तरचे गणित आहे. सत्य हे आहे की जामिनावर सुटल्यानंतर जैन आपल्या परिवारासह राजस्थानला जाऊन आले. तेथे त्यांनी कुलस्वामिनीचे दर्शन घेतले. तेथून ते मुंबई मुक्कामी राहिले. मुंबईत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुखांची भेटही घेतली असेल, त्यांची भेट झाल्याचे कोणतेही वृत्त मात्र आले नाही. पण त्यांची भेट झाली असावी हे म्हणण्यालाही अर्थ आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईहून आल्यानंतर त्यांनी जळगावात लगेच शिवसेनेच्या सक्रिय सदस्य नोंदणीला प्रारंभ स्वत:पासून केला. आग्रह कार्यकर्त्यांचा असला तरी नियोजन पक्षाचे असते. सेनेच्या सदस्य नोंदणीसोबत लवकरच जळगावात उद्धव ठाकरे येणार असल्याचेही वृत्त आहे. जळगाव जिल्हा सध्या खडसेंच्या सरकारविरोधी वक्तव्यांमुळे गाजतोय. अधूनमधून खडसेंना चिमटा काढणाऱ्या मंत्री गिरीश महाजनांच्या स्टेटमेंटचीही चर्चा होते.

खडसेंचे मंत्रिपद गेल्यामुळे जळगाव भाजपतील लोकप्रतिनिधी, नेते, कार्यकर्ते कुंपणावरच आहेत. सोयीचे आणि सावध बोलणे एवढेच त्यांच्या हातात आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषदेची निवडणूक आहे. पाठोपाठ आठ नगरपालिका, जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. संघटन मजबुतीकरिता कोणत्याही पक्षासाठी या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. भाजपत संभ्रमावस्था असल्यामुळे सेनेला जम बसवता येतो का, हे पाहण्यासाठी सुरेश जैनांना सक्रिय केले जात आहे. त्यासाठीच उद्धव ठाकरे हेही स्वत: जळगावात येऊन सभा घेण्याची तयारी करीत आहेत. खडसेंनी शिवसेनेशी युती तोडल्याचा उद्धवांना राग आहेच. यानिमित्ताने पुन्हा एकदा जैनांच्या उपस्थितीत त्यास उजाळा देता येईल, हेही त्यामागे एक राजकारण आहे. पण जैन यांना सक्रिय केले जात असले तरी समाज आणि राजकारणातली त्यांची रि-एंट्री जरा आस्तेच, हे मात्र तेवढेच खरे आहे.

त्र्यंबक कापडे
लेखक जळगाव (खान्देश) आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.
बातम्या आणखी आहेत...