आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गाचा इशारा ओळखा!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव ते कन्नडच्या घाट परिसरात सोमवारी अतिवृष्टी होऊन म्हसोबा मंदिराजवळील रस्ता खचला. या परिसरात जवळपास ७० मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. पावसाने घाटातल्या डोंगरावर असलेल्या दरडीही कोसळल्या. या नैसर्गिक घटनेमुळे घाटाची वाट बिकट बनली. रात्री उशिरापर्यंत वाहतूक खोळंबली होती. दोन्ही बाजूंनी रांगाच, रांगा लागल्या होत्या. या मार्गावरील वाहतूक वळवल्यानंतर उशिरा रस्ता मोकळा करण्यात आला. त्यानंतर आता हा रस्ता दुरुस्त करावा लागणार असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक दोन महिन्यांसाठी वळवण्यात आली आहे.  दुरुस्ती होईपर्यंत दोन महिने नागरिकांना २० ते २५ किलोमीटरचा फेरा मारून इच्छितस्थळी पोहोचावे लागणार आहे. धुळे ते औरंगाबाद हे १५० किलोमीटरचे अंतर आहे.
 
नैसर्गिक दुर्घटनेमुळे आता धुळे येथून जाताना चाळीसगावच्या आधी मेहुणबारेजवळ आणि औरंगाबादहून येताना वैजापूरजवळील बायपासने वळावे लागणार आहे. धुळे ते सोलापूर (क्रमांक २११)  हा तसा राष्ट्रीय महामार्ग आहे. या  महामार्गाला धुळे येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन आणि सहा तर सोलापूरजवळ नऊ आणि तेरा हे जोडले जातात. त्यामुळे या महामार्गावरून दररोज पाच ते सहा हजार वाहनांची वाहतूक होत असते. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि राजस्थान या पाच राज्यांना जोडणारा म्हणून या महामार्गाची ओळख आहे. चौपदरीकरणाचा प्रस्तावही मंजूर झाला आहे. यासाठीच्या जमीन संपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याचे प्रशासनातर्फे सांगितले जात आहे. धुळे ते सोलापूर हा महामार्ग सुकर व्हावा ही अन्य राज्यातील नागरिकांची जशी मागणी आहे. त्यापेक्षा अधिकची गरज ही खान्देश आणि मराठवाड्यातील जनतेची आहे.

औरंगाबाद येथे हायकोर्ट असल्यामुळे धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील जनतेला तेथे नेहमीच जावे लागते. त्यामुळे या मार्गाचे चौपदरीकरण व्हावे ही कित्येक वर्षांपासूनची मागणी आहे. या महामार्गावर कन्नड घाटात वर्षाला लहान, मोठे २० ते २५ अपघात होऊन नागरिकांचे बळी गेले आहेत. अजूनही परिस्थिती बदललेली नाही. या मार्गावरील हा घाट अत्यंत धोकादायक आहे. त्या ठिकाणचे कठडे, संरक्षक भिंतीही पाहिजे तेवढ्या मजबूत नसल्यामुळे अपघातग्रस्त वाहने ही थेट दरीत कोसळतात. कन्नडच्या घाटासारखीच स्थिती मुंबई- आग्रा महामार्गावर लळिंग, चांदवड घाटात होती. पण चौपदरीकरण झाल्यानंतर या घाटात मोठे अपघात झाल्याच्या घटना फार दुर्मिळ आहेत. हा महामार्ग अनेकांसाठी आता जीवनमार्ग झाला आहे. मुंबई- आग्रा महामार्गासोबतच धुळे- सोलापूरचे चौपदरीकरण व्हावे म्हणून नागरिकांची मागणी होती. पण राजकीय इच्छाशक्तीअभावी या मार्गाचे अनेकदा सर्वेक्षण झाले पण तो त्यापुढे सरकलाच नाही. शासन- प्रशासनातर्फे सांगितले जाते की, या डोंगर परिसरातील रॉक टनक असल्यामुळे चौपदरीकरणात भुयारी बोगदा करण्याचा प्रस्ताव आहे.
 
दरम्यानच्या काळात स्वित्झर्लंड येथील स्वीस एम्बर्ग प्रा. लि. या कंपनीला डीपीआर (प्रोजेक्ट रिपाेर्ट) तयार करण्याचे कामही दिले गेले होते. अजून काम मंजुरीसह ते सुरू होण्याला चार ते पाच वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे अजून चार वर्षे तरी टनेल तयार होणे शक्य नाही. त्यामुळे कन्नड घाट प्रकल्प कार्यालयाने वाहतुकीसाठी पर्याय उपलब्ध करून देत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. रस्ता दुरुस्तही होईल आणि दोन महिन्यांनंतर तो वाहतुकीसाठी खुलाही केला जाईल. पण शेवटी हा देखील तात्पुरताच उपाय असणार आहे. या मार्गाला तात्पुरता नाही तर कायमस्वरूपी उपायांची गरज आहे, असा इशारा निसर्गाने देऊन टाकला आहे. सोमवारी घाट परिसरात झालेला पाऊस मुसळधार नाही तर तो अतिवृष्टीचा होता.

या रस्त्यावर वाहने असती तर ती सरळ दरीत कोसळली असती. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही हे चांगलेच झाले. पण घटनेपासून धडा घेत धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी धुळे ते सोलापूर या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठीचा पाठपुरावा वेगाने सुरू करण्याची गरज आहे. या परिसरात टनेल करणे सोयीचे आहे किंवा नाही, याची तांत्रिक तपासणीही लवकरात लवकर करून घेतली गेली पाहिजे. तांत्रिकदृष्ट्या टनेल करणे सोयीचे नसेल तर लळिंग, चांदवड घाटासारखे चौपदरीकरण करून काम मार्गी लावणे गरजेचे आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी करणारी एक पिढी खपून गेली. दुसऱ्या पिढीचीही हयात चालली आहे. आता अतिवृष्टीच्या माध्यमातून निसर्गानेच इशारा दिला आहे. त्याला ओळखण्याची गरज आहे.    
 
 
बातम्या आणखी आहेत...