आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडसेंच्या मनात काय?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या राज्याच्या राजकारणात पारंपरिक गोष्टींना शह देण्याचे प्रकार उघडपणे केले जात आहेत. यापूर्वी सरकारमध्ये सहभागी असलेले घटकपक्ष हे सरकारविरोधात बोलताना सावधानता बाळगत असत. मनात असले तरी ते ओठावर आणत नव्हते.
 
अलीकडे हे संकेत शिवसेनेने साफ मोडीत काढले आहेत. राज्यात आणि देशात सत्तेत सहभागी असूनही शिवसेना सातत्याने काहीना काही मुद्दे उपस्थित करून आपली वेगळी भूमिका मांडत आला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मुद्यावरही शिवसेनेची भूमिका ही सरकारपेक्षा वेगळी आहे. सभागृहात आमदार, मंत्र्यांचे आणि बाहेर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यावर ठाम मत आहे.

अशीच एक परंपरा मोडीत काढली ती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंनी. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर त्यांनी निवडणुकीतील पराभवानंतर वारंवार टीका केली. त्यामुळे राणे भाजपच्या वाटेवर असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे पक्षात राहून श्रेष्ठींवर थेट उघडपणे टीका न करण्याची परंपरा राणेंनी मोडीत काढली. याच पद्धतीची परंपरा माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मोडीत काढली आहे. खडसे यांना मंत्रिपद गमवावे लागल्यानंतर ते काहीसे अस्वस्थ आहेत. त्यांच्याविरोधात रान पेटवणाऱ्यांत पक्षातील ज्येष्ठ, श्रेष्ठ मंडळींचा मोठा हात असल्याचा त्यांचा पक्का समज आहे. सरकार आणि मुख्यमंत्री पाठीशी राहिले असते तर भूखंड खरेदीचे प्रकरण त्यांच्या अंगलट आलेच नसते आणि मंत्रिपद गमावण्याची त्यांच्यावर वेळही आली नसती, असे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे.  
 
मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्यासह काही मंत्र्यांनी खडसेंची तीन महिन्यांत चौकशी पूर्ण होईल आणि ते यातून सहीसलामत सुटतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, खडसेंचे मंत्रिपद जाऊन आता जवळपास ११ महिने उलटले आहेत. चौकशीचा निकाल लागणे दूरच, ते अधिक अडचणीत कसे येतील याची काळजी विरोधकांकडून घेतली जात आहे. त्यामुळे खडसेंनी परंपरा मोडीत काढणे सुरू केल्याचे दिसते. विधिमंडळाच्या अधिवेशनात थेट मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. सरकारचे दुर्लक्ष आणि आपले मंत्रिपद गेल्यामुळे जळगाव जिल्ह्यात येऊ घातलेले सर्वच प्रकल्प थांबून गेले आहेत. यात जनतेचे नुकसान होत असल्याचे मत ते व्यक्त करत असतात. दोन दिवसांपूर्वी तर त्यांनी सरकार विरोधात निघालेल्या ‘संघर्ष यात्रे’च्या नेत्यांचे आपल्या मुक्ताईनगरातील फार्म हाऊसवर गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

त्यांच्या नाष्टा, पाण्याची सोय केली. काँग्रेसचे नेते विखे पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील यांनी खडसेंशी काही मिनिटे चर्चाही केली. त्यानंतर या नेत्यांनी मुक्ताईनगरातील जाहीर सभेत भाजप सरकारवर सडकून टीका केली. याच सरकारमधील भाजपचे नेते खडसेंना शेतकऱ्यांविषयी कसा कळवळा आहे, हे सांगायलाही काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते विसरले नाहीत. खडसेंच्या या भूमिकेविषयी लोकांनी आपापल्या पद्धतीने काय अर्थ लावायचा तो लावला आहे. खडसेही आपले संबंध राजकारणापलीकडचे आहेत हे सांगायला विसरले नाहीत. काँग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांचा फोन आला म्हणून मी स्वागत केले, असे ते सांगत असले तरी खडसे आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनात निश्चितच येणाऱ्या २०१९ च्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत.  
 
खडसेंची नाराजी भाजप दूर करू शकले नाही व त्यांची पावले राष्ट्रवादीच्या वाटेवर पडली तर फारसे आश्चर्य वाटून घेण्यासारखे असणार नाही. खडसे आज पक्षात राहूनच संघर्ष करतील. एक घरातल्या खासदार, ते स्वत: आणि काही समर्थक आमदार, अशी तरी खान्देशात त्यांची ताकद आहे. त्यामुळे खडसेंना कोणताही राजकीय पक्ष सहज पायघड्या टाकू शकतो, याची खात्री त्यांनाही आहे. त्यामुळे ते आज असं काहीही उघडपणे बोलणार नाही. पण सरकारवर अप्रत्यक्ष दबाव टाकण्याची त्यांच्या कृतीतून येणाऱ्या निवडणुकीत काहीही निर्णय घेऊ शकतात, याचे संकेत मिळत आहेत. ज्येष्ठ नेते नारायण राणे हे कॉंग्रेस पक्षातून भाजपकडे जाऊ इच्छित अाहेत. भाजपही त्यांचे स्वागत करेल. भाजपला त्यांच्या माध्यमातून काेकणात वर्चस्व मिळवण्याच्या अपेक्षा अाहेत. तशाच अपेक्षा खान्देशात राष्ट्रवादीला अाहेत. खडसेंसारखा बडा नेता या पक्षाच्या हाती लागल्यास निश्चितच राष्ट्रवादीचे संख्याबळ वाढू शकते. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव अाणि खान्देशात तर राष्ट्रवादीला बळ हवेच अाहे. २०१९च्या निवडणुकीत कांॅग्रेस अाणि राष्ट्रवादी हे पक्ष नाराज बड्या नेत्यांना पक्षात घेऊन मानाचे स्थान देऊ शकतात. म्हणूनच खडसेदेखील राजकारणापलीकडचे संबंध जाेपासू लागले अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...