आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीत परीक्षा मंडळ नापास!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
पेपरफुटी प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाईचा कायदा केल्यानंतर गेल्या काही वर्षांत दहावी, बारावीच्या परीक्षेतील पेपरफुटीला मोठ्या प्रमाणात आळा बसला होता. मात्र, यंदा सोशल मीडियाने माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळापुढे पेपरफुटीचे मोठे आव्हान उभे केले आहे. परीक्षेला सुरुवात होण्याच्या अर्धा तास आधीच सोशल मीडियावरून पेपर व्हायरल झाल्याची घटना एकदा नव्हे तर चारदा घडली. बारावीच्या इंग्रजी, मराठीसह कॉमर्सचा एस.पी. (सेक्रेटरियल प्रॅक्टिस) आणि गणिताचा पेपर परीक्षा सुरू होण्याच्या बरोबर अर्धा तास आधी बाहेर आला. या घटनेला पेपरफुटी म्हणावे की नाही, यावर वाद सुरू आहे. मात्र, पेपर अर्धा तास आधी बाहेर आल्यानंतर काही पालकांनी या पेपरमधील प्रश्नांची उत्तरे शोधून ती आपल्या पाल्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पेपर बाहेर आल्यानंतर कॉपी पुरवणाऱ्यांनाही चांगलेच पेव फुटले. 
कॉपीबहाद्दर विद्यार्थी आणि कॉपी पुरवणाऱ्या पालकांची ही कृती हुशार, अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी मात्र डोकेदुखी ठरत आहे. मुळात अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या प्रश्नपत्रिकेचे पाकीट परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास आधीच केंद्र प्रमुखांकडे सोपवले जाते. केंद्र प्रमुख ते पाकीट दोन साक्षीदार विद्यार्थ्यांसमोर फोडतात आणि वर्गनिहाय त्याचे सुपरवायझरला वाटप करतात. त्यानंतर सुपरवायझर परीक्षा सुरू होण्याच्या १० मिनिटे आधी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वितरित करतात. प्रत्यक्ष पेपर लिहायला बरोबर ११ वाजता म्हणजे वेळेवर सुरुवात होते. एवढे व्यवस्थित नियोजन असताना पेपर सोशल मीडियावरून अर्धा तास आधीच व्हायरल कसा होताे,  या प्रश्नाने परीक्षा मंडळदेखील चक्रावले आहे. 

अर्धा तास आधी पेपर बाहेर येण्याला परीक्षा केंद्रावरील ढिसाळ व्यवस्थाच जबाबदार असल्याचे यातून स्पष्ट होते. प्रश्नपत्रिकांचे पाकीट फोडल्यानंतर तत्काळ त्याचे फोटो काढून ते व्हॉट्सअ‍ॅपवर टाकण्याची व्यवस्था काही परीक्षा केंद्रांवर होत असेल किंवा वर्गात पेपरचे वेळेआधी जाणीवपूर्वक वाटप केले जाणे शक्य आहे. हा प्रकार सर्वच केंद्रांवर घडत असेल असे नाही, पण इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मीडियाने क्रांती केली आहे. कोणतीही माहिती क्षणार्धात जगात पोहचते, मग कॉपीबहाद्दर यापासून तरी कसे ोदूर राहतील. एका केंद्रातून जरी पेपर बाहेर आला तरी तो लाखो लोकांपर्यंत अवघ्या काही मिनिटांत पोहाेचतो. मग पालक त्या पेपरमधील उत्तरे शोधून पाल्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. बाहेर आलेल्या पेपरमधील उत्तरांच्या कॉप्या परीक्षा केंद्र आणि वर्गात पोहोचल्यानंतर विद्यार्थी उत्तरपत्रिका सोडवतात. याचाच अर्थ ज्या वर्गात आणि परीक्षा केंद्रांवर सर्रास कॉपी करू दिली जाते, त्याच केंद्रांवरून पेपरही अर्धा तास आधी बाहेर येऊ शकतो. ज्या केंद्रांवर कॉपी पुरवताही येत नाही आणि  विद्यार्थ्यांना करूही दिली जात नाही, तेथे अशा पेपरफुटीला काहीही अर्थ नाही. त्यामुळे परीक्षा मंडळाने प्रश्नपत्रिका फोडणाऱ्यांवर जसा कडक कारवाईचा कायदा केला आहे, त्यापेक्षा अधिकचा कडक कायदा परीक्षा केंद्रांवर कॉपी करू देणाऱ्यांसाठी केला पाहिजे. सर्रास कॉपी होऊ देणाऱ्या केंद्रांची परवानगी कायमस्वरूपी तर बंदच केली पाहिजे, पण त्या केंद्रांवर मदत करणाऱ्या शिक्षकांनाही कायमचे घरी बसवले पाहिजे. भरारी पथकांमध्ये बाहेरच्या जिल्ह्यांचे अधिकारी असले पाहिजेत. जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त करून काहीच फायदा नसतो. 
बऱ्याच वेळेला या पथकातील अधिकारी आणि ज्या केंद्रांवर कॉपी चालते त्या केंद्रावरील संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याशी संगनमत असते. नसेल तर भ्रष्टाचार, गैरप्रकाराला वाव असतो. गैरप्रकार आढळून आल्यानंतर होणारी कारवाईदेखील जुजबी असते. त्यामुळे पथकाची माहिती गोपनीय ठेऊन ते बाहेरचेच असणे कॉपीमुक्त अभियानासाठी कधीही चांगले आहे. परीक्षा केंद्रात आणि वर्गात विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांनाही मोबाइल आत नेण्यास परवानगी नाकारली पाहिजे. परीक्षा केंद्राबाहेर पालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. कशासाठी पालक एवढी गर्दी करतात आणि रस्ते अडवतात? पालकांची ही मानसिकतादेखील न समजण्यासारखीच आहे. परीक्षा काळात विद्यार्थ्यांवर कोणताही दबाव येणार नाही, त्याला परीक्षा सोपी वाटावी, असे वातावरण ठेवण्याऐवजी अधिक काळजी घेऊन पालकच विद्यार्थ्यांना परीक्षेचे जास्तीचे टेंशन देण्याचे काम करतात. परीक्षा केंद्रांबाहेर काही किलोमीटरच्या आत दिसणाऱ्या पालकांवरही कारवाई केली पाहिजे. १५ लाखांपेक्षा अधिक असणाऱ्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पद्धतीत मंडळाने सुधारणा केल्या तर पेपरफुटीचे प्रकार रोखण्यात आणि नियोजनाच्या परीक्षेत प्रत्येक वर्षी मंडळावर नापास होण्याची वेळ येणार नाही.   
 - निवासी संपादक, जळगाव
बातम्या आणखी आहेत...