Home | Editorial | Columns | tryambak kapde writes about grampanchayat election

थेट सरपंच खेळीतही यश !

त्र्यंबक कापडे, निवासी संपादक,जळगाव | Update - Oct 11, 2017, 12:53 AM IST

थेट नगराध्यक्ष निवडणुकीनंतर फडणवीस सरकारने सरपंचही जनतेतून निवडून आणण्याचा निर्णय घेतला

  • tryambak kapde writes about grampanchayat election
    थेट नगराध्यक्ष निवडणुकीनंतर फडणवीस सरकारने सरपंचही जनतेतून निवडून आणण्याचा निर्णय घेतला आणि त्याची पहिली निवडणूक यंदा पार पडली. या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. नगराध्यक्ष, नगरसेवकांप्रमाणे सर्वाधिक जागांवर आपलाच झेंडा फडकल्याचा दावा करीत दिवाळी आधीच भाजपाने फटाक्यांची आतषबाजी केली. अर्थात, त्यात नाकारण्यासारखेही काहीच नाही. राज्यात भाजपाचे आमदार, खासदारांचे बळ चांगले आहे. त्यामुळे त्यांनी एक हजार पेक्षा अधिक जागांवर केलेला दावा काँग्रेससाठी धडकी भरवणारा आहे. भाजपापाठोपाठ राज्यात शिवसेनेनेही चांगली मुसंडी मारली आहे. पण काँग्रेस, राष्ट्रवादीसाठी आता गावेही परकी झाली आहेत. ग्रामपंचायत असो की विविध कार्यकारी सोसायटी, दूध संघ असो की साखर कारखाना प्रत्येक ठिकाणी काँग्रेसचे वर्चस्व होते.

    देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र राज असले तरी गावपातळीवर काँग्रेसचीच पाळेमुळे गडलेली होती. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत नाही केंद्रात आलो तरी चालेल, पण राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात हीच छोटी, छोटी संस्थाने आपल्या कामी येतील, असा काँग्रेसचा समज होता. काँग्रेसची सत्तेतील राजनीती भाजपा नेत्यांनीही जवळून पाहिली आहे. त्यामुळे दिल्लीपासून सुरू झालेली काँग्रेस मुक्तीची घोडदौड भाजपाने गावपातळीवरही सुरू ठेवण्याचा निर्धार केला आणि एक वर्ष आधीच थेट सरपंच निवडणुकीचा निर्णय घेतला. राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे काँग्रेसची छोटी, छोटी संस्थानेही ताब्यात घेण्याची खेळी होती. थेट नगराध्यक्ष निवडणुकीतील यशामुळे त्यांचा विश्वास अधिक दुणावला होता. त्यामुळे सरपंचही जनतेतूनच निवडण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला. या निर्णयामागे गावांचा किती विकास होईल हे सांगणे आज कठीण असले तरी सत्तेचा पुरेपूर उपयोग करून गावे ताब्यात घेण्याची भाजपाची खेळी यशस्वी झाली, असे म्हणायला काहीच हरकत नाही. गावागावांत असलेला सरपंच आणि शहरांमध्ये असलेल्या नगराध्यक्षांच्या जोरावर भाजपा आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती करेल.
    कारण राज्यात भाजपाची सत्ता असली तरी शिवसेनेने सत्तेत राहून त्यांची मुस्कटदाबी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्यामुळे शिवसेनेसोबत राहिलेली जेमतेम दोन वर्ष संसार करून काडीमोड करण्याचा निर्णय भाजपाने आधीच घेतलेला आहे. हे दोन वर्षही नाही निभावले तरी मध्यावधीला सामोरे जाण्याचीही तयारी असली पाहिजे म्हणून भाजपाने ग्रामपंचायत निवडणूकही गांभिर्याने घेतली होती. आगामी निवडणुकीनंतर केंद्रासारखेच राज्यातही स्वबळावर सरकार स्थापण्याचे भाजपाचे स्वप्न आहे. या स्वप्नाला बळ देणारा निकाल ग्रामपंचायतीतही लागल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयी उमेदवारांसह भाजपाच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांचेही मनापासून अभिनंदन केले आहे. केवळ दिल्लीत सरकार आले म्हणजे देश काँग्रेसमुक्त झाला असे म्हणता येणार नाही, हे नरेंद्र असो की देवेंद्र या दोघा नेत्यांना चांगलेच ठाऊक आहे. कारण तेही संघाच्या मुशीत तयार झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसमुक्तीसाठी गावेच ‘टार्गेट ’ केली पाहिजे हे त्यांनी ठरवले होते. विशेष म्हणजे या निवडणुकांमध्ये सरपंचपदाची उमेदवारी चाळिशीच्या आतल्या तरुणांनाच प्राधान्याने दिली गेली. तरुण तडफदार उमेदवार निवडून आला तर तो गाव विकासासाठी धावेल आणि पक्षाची धुराही तेवढ्याच ताकदीने वाहून नेईल, हा त्यामागील उद्देश. भाजपा आज सर्वोच्च स्थानी असला तरी त्यांनी कोणतीही निवडणूक सहज घेतलेली नाही.

    प्रत्येक पाऊल ते अत्यंत सावधगिरीने आणि पुढची रणनीती लक्षात ठेऊन टाकत आहेत, हे गावपातळीवरच्या निवडणुकीतून दिसले. प्रचंड अनुभव असताना देखील काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाने ग्रामपंचायत निवडणूक तेवढ्या गांभिर्याने घेतल्याचे दिसत नाही. विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका हरल्यानंतर गावपातळीवरच्या निवडणुकीसाठी रस्त्यावर उतरण्याची मानसिकता हे नेते हरवून बसले आहेत. जेथे, जेथे म्हणून काँग्रेसचे आमदार किंवा अधिकचे संख्याबळ आहे, त्या धुळे जिल्ह्यासारख्या ठिकाणीच काँग्रेसने अनेक गावांवर विजयाचा दावा केला आहे. अन्य सर्वच ठिकाणी काँग्रेस नेत्यांनी जनतेचा कौल मान्य असल्याच्याच प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. याचाच अर्थ, नोटबंदी आणि जीएसटीमुळे सामान्य माणूस आणि व्यापारीवर्ग त्रस्त झाला असल्याच्या बातम्या असल्या तरी त्या मुद्यांवरून भाजपाची लोकप्रियता कुठेही कमी झालेली नाही, हेही या निकालावरून म्हणता येईल. भाजपाने दिल्लीपासून सुरू केलेली काँग्रेसमुक्तीची वाटचाल आता गल्लीपर्यंत येऊन पोहचली आहे. येत्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला समूळ नष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, त्यात त्यांना यश मिळते किंवा कसे एवढेच आता बघायचे आहे.

Trending