आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मेक इन इंडिया’ला वेग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया हा उपक्रम सुरू केला आहे. या संंकल्पनेची घोषणा करताना त्यांनी म्हटले होते की, उत्पादन क्षेत्रात भारत महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. उत्पादनासोबतच उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मेक इन इंडिया ही संकल्पना चार स्तंभांवर आधारित असेल. हे चार स्तंभ म्हणजे देशात उद्योगांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणारी नवीन कार्यपद्धती तयार केली जाईल, उद्योगांचा विकास होईल यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, नवनवीन क्षेत्रांची निवड करून त्यात पदार्पण करण्यासाठी जगताला प्रोत्साहित केले जाईल आणि चौथा स्तंभ म्हणजे सरकार नियंत्रकाची नव्हे तर उद्योजकांचा सहायक म्हणून भूमिका निभावेल. मोदींनी ही संकल्पना स्पष्ट केल्यानंतर लगेचच देशभरात स्मार्ट सिटी निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्मार्ट सिटी तयार झाल्यानंतर अतिवेगवान दळणवळणाचा वापर उद्योजकतेला प्रोत्साहन देणारा ठरेल. दूरदृष्टी ठेवून मोदींनी साकार केलेल्या संकल्पनेला आता मूर्त स्वरूप येऊ लागले आहे. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे देशातील टाटा आणि अमेरिकेतील लॉकहीड मार्टिन या कंपनीत झालेल्या ऐतिहासिक कराराचे देता येईल. या करारामुळे आता भारताच्या हवाई दलात वापरात येणारी लढाऊ विमाने ही देशातच बनणार आहेत. 

देशाच्या हवाई दलात लढाऊ विमानांची संख्या कमी होत चालली आहे. भारताला नजीकच्या काळात मध्यम आकाराच्या लढाऊ विमानांची गरज भासणार आहे. ही विमाने खरेदी करण्याचा भारताच्या संरक्षण विभागाचा विचार सुरू होता. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शस्त्रसामग्री विदेशातून खरेदी करण्याऐवजी त्यांची स्वदेशातच निर्मिती करण्यावर भर दिला आहे. पाकिस्तानसह जगभरातील २६ देशांमध्ये वापरले जाणारे अत्याधुनिक एफ-१६ हे विमान विदेशातून खरेदी करण्याऐवजी ते बनवण्याचा कारखाना भारतातच सुरू करण्याचा विचार मोदींनी बोलून दाखवला होता. त्यानंतर पॅरिस येथे भरलेल्या एअर शोवेळी भारत आणि अमेरिकेतील कंपनीत होणाऱ्या कराराची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता टाटा समूहाची टाटा अॅडव्हान्स सिस्टिम्स लिमिटेड ही कंपनी आणि अमेरिकेतील लॉकहीड मार्टिन कंपनी यांच्यात हा ऐतिहासिक करार करण्यात आला. मोदी हे २६ जून रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. त्याआधीच हा करार पूर्ण करण्यात आल्यामुळे मेक इन इंडियाचे एक पाऊल पुढे पडले आहे. देशात एफ-१६ हे लढाऊ विमान अत्याधुनिक पद्धतीने बनवून ते ब्लॉक ७० या मालिकेतले असणार आहे. भारतात आता हे लढाऊ विमान बनवण्याचा कारखाना सुरू होणार असल्यामुळे कौशल्यपूर्ण रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. मोदींच्या मेक इन इंडियासारखेच डोनाल्ड ट्रम्प यांचेही अमेरिकेतील नोकऱ्या बाहेर जाऊ न देण्याचे धोरण आहे. तथापि, हा करार करताना अमेरिकेतील नोकऱ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील फोर्ट वर्थ येथील प्रकल्प लॉकहीड मार्टिन कंपनी लवकरच भारतात हलवणार आहे. 

भारतातर्फे भागीदार म्हणून टाटा समूहाची निवड करण्याचे कारण म्हणजे ही कंपनी सध्या अमेरिकेच्या सी १३० या लष्करी वाहतूक विमानांचा सांगाडा भारतात बनवत आहे. तसेच अमेरिकेतील सिकोर्स्की या कंपनीच्या एस ९२ या हेलिकॉप्टरची केबिन टाटाच्या हैदराबाद येथील कारखान्यात बनवण्यात येते. टाटा अँड सन्सचे  अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनीही या कराराबद्दल बोलताना म्हटले आहे की, भारताला आता अत्याधुनिक आणि सर्वात नवीन प्रकारातल्या विमानाचे उत्पादन, संचालनाबरोबर निर्यात करण्याची संधी मिळणार आहे. आणखी काही नवीन उत्पादनेही यानिमित्ताने भारतात सुरू होऊ शकतात.  अमेरिकेतून कंपनी थेट भारतात हलवली जाणे हे मेक इन इंडियाचे मोठे यश मानले जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी मेक इन इंडियाची घोषणा केल्यानंतर तीन वर्षांत काय प्रगती झाली, यावर अनेक घटकांतून नाराजीही व्यक्त करण्यात येत  होती. मात्र, या ऐतिहासिक करारानंतर जेव्हा प्रत्यक्षात भारतात लढाऊ विमानांचे उत्पादन सुरू होईल आणि निर्यातही केली जाईल, तेव्हा मेक इन इंडियाला खऱ्या अर्थाने गती मिळाली, असे म्हणता येईल.   

- निवासी संपादक, जळगाव
बातम्या आणखी आहेत...