आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीएतील सत्तेच्या दोन केंद्रांचे रहस्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात दोन सत्ताकेंद्रे आहेत, या सत्यपरिस्थितीवर काँग्रेसच्या दोन महासचिवांनीच शिक्कामोर्तब केले आहे. दुसर्‍या सचिवांनी पहिल्याच्या म्हणण्यावर टिप्पणी केली आहे, पण त्यांनीसुद्धा दोन सत्ताकेंद्रे असणे योग्य असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस अध्यक्ष आणि पंतप्रधानांत सत्तेचे विभाजन झाले असल्याचे पहिल्या सचिव सांगतात. हे द्विकेंद्रीय मॉडेल अयशस्वी ठरले आहे. पंतप्रधान कोणी का असेना, त्याला काम करण्यास स्वातंत्र्य असावे, असे पहिल्याचे म्हणणे आहे. दुसर्‍या सचिवाचे म्हणणे असे की, काँग्रेस अध्यक्ष आणि पंतप्रधानातील संबंधांच्या कार्यपद्धतीचे हे मॉडेल आदर्श आहे. शिवाय भविष्यातही कदाचित योग्य ठरेल.

एका ठोस चर्चेस तोंड फोडल्याबद्दल दोन्ही महासचिव दिग्विजयसिंह आणि जनार्दन द्विवेदी यांचे मी अभिनंदन करतो. भारतातच नव्हे तर अन्य लोकशाही देशांसाठी ही चर्चा उपयुक्त आहे. ज्या ज्या सरकारमध्ये अशी समानांतर सत्ताकेंद्रे आहेत ती का आहेत, ती योग्य वाटतात का, त्याचे कोणते फायदे किंवा तोटे आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे या चर्चेतून मिळू शकतात. जेथे सत्तेची दोन केंद्रे्र असतात तेथे जबरदस्त गळेकापू स्पर्धा असते. शिवाय सतत सत्तापालट होण्याची शक्यता असते. भारतात काही अजब घडते आहे असे वाटते. येथे सत्तापालटाची शक्यताही नाही किंवा स्पर्धाही नाही. मग ही खेळी कशासाठी ?

सत्तेची दोनपेक्षा अधिक केद्रे असलेला भारत हाच एकमेव देश नाही. पाकिस्तानात आसिफ अली झरदारी आणि बिलावल, नेपाळमध्ये प्रचंड आणि भट्टराय, अफगाणिस्तानात जहीर शहा आणि सरदार दाऊद, उत्तर प्रदेशात मुलायमसिंह आणि अखिलेश इ. विविध प्रकारची बहुकेंद्री उदाहरणे आपणास उपलब्ध आहेत. भारतातला प्रकार तर खरोखरच ‘अद्वितीय’ आहे. येथे तर अडीच सत्ताकेंद्रे आहेत. ही सत्ता आता आई, मुलगा आणि पंतप्रधानात विभागली गेली आहे. हे सत्ताकेंद्र आदर्श असल्याचे द्विवेदी म्हणतात ते योग्यच आहे. या अडीच केंद्रांत आजवर कोणतीही मतभिन्नता किंवा विवाद दिसलेला नाही. प्रत्येक केंद्र आपल्या मर्यादेनुसार राहिले. कोणीही आपल्याला आखून दिलेली लक्ष्मणरेषा ओलांडण्याचा प्रयत्न केलेला नाही. भारत-अमेरिका अणुकरार, मनरेगा आणि अनेक राज्यांतील छोट्या-मोठ्या मुद्द्यांवर मतभेद झाले, पण मनभेद कधी झालेले नाहीत. ‘ढाई आखर प्रेम का, पढे सो पंडित होय!’ अडीच सत्ताकेंद्रांच्या या सहज सत्तेचे रहस्य काय असावे ? जगातील या आठव्या आश्चर्याच्या मागे कोणते समीकरण काम करते आहे ?

हे समीकरण ब्रह्मज्ञानाचे आहे! जेथे ब्रह्मज्ञान असते तेथे समीकरण संपते. सोनिया आणि मनमोहनसिंग दोघेही ब्रह्मज्ञानी आहेत. त्यांंच्या हातात जी सत्ता आहे ती मायावी आहे. शिवाय ती त्यांच्यामुळे आलेली नसून अन्य कारणांमुळे योगायोगाने आलेली आहे याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. कावळा बसायला अन् फांदी तुटायला एकच वेळ साधली, तशातला हा प्रकार आहे. या योगायोगाला जे सत्य मानतात ती मंडळी सत्तेच्या नशेत चूर होतात. प्रत्यक्ष सत्तेवर नसले तरी सत्तेच्या परिघात असल्याने उलटसुलट करत असतात. जर ते सत्तेच्या निकट किंवा केंद्रस्थानी आले तर नेहमी सत्तापालटाच्या चक्करमध्ये असतात. येथे तर सिंहासनच नाही, त्यावर कोणी बसलेलेही नाही, तर तुम्ही उलथवणार काय ? ज्यांना तुम्ही नेते म्हणवता ते ‘अ’ नेत्याची भूमिका निभावत आहेत. ज्याप्रमाणे साहित्यात ‘अ’ कविता असते त्याप्रमाणेच भारताने राजकारणात ‘अ’ नेते दिले आहेत. ते आपल्या क्षमतेनुसार जे काही सर्वोत्कृष्ट करता येईल ते करत आहेत. जर ते खरोखरच नेते असले असते तर कोर्टाने काही बोलायच्या आधीच भ्रष्ट मंत्र्यांना खडसावले असते. आपल्या अधिकाराचा वापर के ला असता. निर्भयावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात संतप्त झालेल्या लोकांचे योग्य वेळी सांत्वन केले असते. रामलीला मैदानावर जमलेल्या नि:शस्त्र आंदोलकावर बेछूट लाठीहल्ला केला नसता. दहशतवाद्यांचे अड्डे समूळ नष्ट केले असते. पण आमचे नेते ब्रह्मज्ञानी-अनासक्त आहेत. अलिप्त-निश्चल आहेत. उदासीन असले तरी सिंहासनाच्या ‘वर’ आसनस्थ आहेत. सत्ता आली काय अन् गेली काय? याची त्यांना काही पर्वा नाही. ती तर मायावी आहे. सत्ता तर जहर आहे, हे ब्रह्मज्ञान तर त्यांना आधीच मिळालेले आहे. सत्तेचे असे मॉडेल दुनियेत कोठे दिसते का? यामुळेच जनार्दन द्विवेदी जे म्हणतात ते खरेच आहे.

मग दिग्विजय जे म्हणतात ते चुकीचे आहे काय ? तसे नाही, तेही खरे आहे. पण त्यांचा दोष इतकाच आहे की, त्यांनी काँग्रेसच्या दुखत्या नसेवर बोट ठेवले आहे. सत्ताविन्मुखतेची प्रतिमा दिवसेंदिवस विरळ होत चालली आहे. प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यास ही गोष्ट चांगल्या प्रकारे समजत आहे. पण तो बोलणार कोणाजवळ आणि रडणार कोठे जाऊन ? सत्तेचे केंद्र म्हणून ओळखले जाणारे आपल्या लक्ष्मणरेषा ओलांडण्यास तयार नाहीत. पण ही रेषा तेव्हाच ओलांडली असती, जर त्यांना चालता-फिरता आले असते तर? ते तर लठ्ठ झाले आहेत, लकवाग्रस्त आहेत. सत्तेची विभागणी होण्याचा अर्थ सत्त्वहीन होणे असे नव्हे! यासाठीच पंतप्रधानांना पूर्ण अधिकार पाहिजेत, अशी मागणी दिग्गीराजा करत आहेत. म्हणजे पंतप्रधान सत्ताविहीन का आहेत? मग ते काँग्रेस अध्यक्षांना सत्ताविरहित करण्याची भाषा बोलण्याचे धाडस कसे करत आहेत ? त्यांनी तर काँग्रेस अध्यक्षांच्या मर्यादाप्रियतेची प्रशंसाच केली आहे.

आम्ही प्रस्तुत लेखात म्हटल्याप्रमाणे, ज्यांना सत्ता राबवायची आहे त्यांना कोणी थांबवत नाही, तरीही ते सत्ता राबवत नाहीत ? मग पक्ष आणि सरकारचे नेतेपद एकाकडे असल्यास सत्ता प्रभावीपणे राबवली जाऊ शकते का ? काँग्रेसचा अध्यक्ष जर वेगळा असला तरी तो देवकांत बरूआप्रमाणे ‘इंदिरा इज इंडिया’ म्हणणारा असावा. ती काँग्रेसची परंपराच आहे. दिग्विजयसिंह राहुलला या रूपात पाहू इच्छित असतील तर ते भविष्यातले बोल बोलत आहेत, असे मानावे लागेल. पण काँग्रेसचे भविष्य किती उज्ज्वल आहे? भविष्यातील नेत्यांच्या मते सत्ता म्हणजे जहर आहे. काँग्रेस तिसर्‍यांदा सत्तेवर आली तर हे जहर वाटून प्यावे लागेल. तेव्हा ते कोणाक ोणात वाटले जाईल सांगता येणार नाही. आता नेहरू-इंदिरा-राजीव-नरसिंह राव यांचे दिवस तर परत येणार नाहीत ? वर्षभरानंतर काँग्रेसमध्ये सत्ताकेंद्राची नव्हे, तर तिच्या अस्तित्वावर आलेल्या संकटांवर चर्चा होऊ शकते.