आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन भंगले, एक जुळेचिना। (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असे म्हणायची पद्धत आहे की रंग अभंग असतो. मग तो रक्ताचा असो वा झेंड्याचा, धर्माचा वा अस्मितेचा! लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी आणि मंत्रालयावर महायुती भगवा फडकवणार, असा दुर्दम्य आत्मविश्वास भाजप आणि शिवसेनेला आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेची मनधरणी करायला गेले होते. मनसेने त्यांचा नव-तिरंगा गुंडाळून पुन्हा भगव्या आघाडीत सामील व्हावे, असा आजच्या (नाना!) फडणवीसांचा आग्रह होता.

नवनरेंद्रांचीही तशी तीव्र इच्छा होती. गुजरातमधील ‘नमोत्सवा’त राज आवर्जून उपस्थित राहत असत. मोदीसुद्धा मनसेच्या या ‘युव’राजांचे स्वागत आलिंगन देऊन करीत असत. त्या आलिंगनाने फक्त राज यांचेच नव्हे तर तमाम मनसेनेचे ऊर भरून येत असे. राज व त्यांचे कॅबिनेट कलिग्ज गुजरातला जाऊन आल्यावर आपण हजयात्रा (सॉरी, राजयात्रा!) करून आल्यासारखे उत्फुल्ल स्थितीत असत. मनसेची मुस्लिमांसारखी, संघासारखी वा गांधीवाद्यांसारखी ‘कॅप’ नाही. त्यामुळे मोदींना राज यांच्याशी मित्रसंबंध जोडण्यासाठी कोणतीही टोपी घालण्याचे नैतिक बंधनही नव्हते. परंतु तेव्हा असे मानले जात असे की, राज ठाकरे यांनी चुलतभावाला - उद्धवला टोपी घातली आणि युतीच्या डोक्यावर बसून मोदींचे मांडलिकत्व पत्करले. तेव्हापासून शिवसेनेत अस्वस्थता पसरली आणि त्यांनी मोदींना ‘मोडीत’ काढायचे ठरवले. बाळासाहेब ठाकरेंनी मोदींना पूर्वीच ‘मोडीत’ काढले होते. एकाच व्यासपीठावर दोन हिंदुहृदयसम्राट कसे असू शकतील? एकाच म्यानात दोन तलवारी कशा राहतील? मोदींचे नाव पंतप्रधानपदासाठी अधिकृतपणे जाहीर व्हायच्या अगोदरच बाळासाहेबांनी त्यांच्या बलूनला दाभण लावून त्यातील हवा काढून घ्यायला सुरुवात केली. बाळासाहेबांनी सुषमा स्वराज याच पंतप्रधानपदासाठी योग्य आहेत, असे म्हणून त्यांना तसा आशीर्वादही दिला. लालकृष्ण अडवाणी हेच भाजपचे ज्येष्ठ नेते असल्याचे सांगून त्यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतरच पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला जावा, असेही शिवसेनाप्रमुख म्हणाले. दुर्दैवाने बाळासाहेबांच्या निधनानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला. अडवाणींच्या मोदीविरोधाची बाळासाहेबांना कल्पना असावी, म्हणूनच त्यांनी त्यांना मोडीत काढले असावे.

बाळासाहेबांच्या निधनानंतर सेना-मनसे-भाजप-रिपाइं यांची महा-महायुती बनवण्याचा मार्ग मोकळा झाला, असे मोदींना व नागपूरच्या स्वयंभू चाणक्य मंडळाला वाटू लागले. त्यांच्या सल्ल्यानुसार आणि मोदीप्रणीत राष्ट्रव्यापी व्यूहनीतीनुसार फडणवीस त्यांची बारभाई मुत्सद्दी करायला राज यांच्या ‘गडावर’ येऊन थडकले होते. मग काही वर्तमानपत्रांनी आठ कॉलमी मथळे देऊन सेना-मनसे-भाजप एकत्र येण्याच्या बातम्यांना उत्तेजक स्वरूप दिले. सरसंघचालकांचा आदेश सरसंघसंपादक कसा अव्हेरणार? परंतु या सर्व स्यूडो-चाणक्य मंडळींची व्यूहनीती आता तोंडावर आपटली आहे. महायुतीत सामील होण्यासाठी मनसेची मनधरणी केली जाणार नाही, असे आता भाजपने जाहीर केले आहे. (अर्थातच निवडणूक निकालांनंतर वा निवडणुका तोंडावर आल्यावर नागपूरकर व त्यांचे स्वयंसेवक घूमजाव करून राज यांना ‘मोदी कॅप’ घालणारच नाहीत, असे नाही!) मोदींचे मांडलिकत्व कुणी घ्यायचे, इतकाच तर मुद्दा आहे! मुंबईतील हि-यांचे व्यापारी व गुजराती समाज यांनी आयोजित केलेल्या मोदींच्या सत्कार सोहळ्यात उद्धव ठाकरेंना नव्हे तर गोपीनाथ मुंडेंनाही त्यांची मराठी जागा दाखवून देण्यात आली होती. नशीब इतकेच की ‘मुंबई तुमची तर भांडी घासा आमची’ अशी घोषणा त्या नमोत्सवात दिली गेली नाही. त्या रत्नजडित नमोत्सवी रजततुलेनंतर तमाम मराठी माणसाला अपमानित झाल्याची भावना पसरली होती. पण मोदींच्या मीडिया मॅनियाची दहशत इतकी की कुणी फारसे जोरात बोलले नाही; पण कुजबुज चालूच राहिली.

भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांना गेल्या वर्षी राज ठाकरे यांनीच ‘दिव्य मराठी’च्या एका सोहळ्यात चार खडे ‘मराठी बोल’ सुनावले होते. ‘पुन्हा मराठी व्यासपीठावर याल तेव्हा तुमच्या हिंदीतले भाषण चालणार नाही. तोपर्यंत मराठी शिकून घ्या’, असा ‘ठाकरी’ इशारा राज यांनी जाहीरपणे त्यांना दिला होता. राजनाथसिंह तो इशारा विसरणे शक्यच नव्हते. जर यदाकदाचित भाजपला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या, पण मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आवश्यक इतक्या जागा मिळाल्या नाहीत तर आपणच पंतप्रधान होऊ शकू, अशी मनीषा आणि सुप्त महत्त्वाकांक्षा बाळगणा-यांना राज ठाकरे मित्रपक्षात नको होते. कारण उत्तर प्रदेश व बिहारमध्ये मिळून किमान 75 जागा जिंकल्याशिवाय भाजपला 180 चा आकडा (वाजपेयी मार्क!) पार करता येणार नाही. बिहार-उत्तर प्रदेशात राज ठाकरे यांच्या विरोधातील भावना तीव्र आहे. उद्धव ठाकरेंबद्दल तेवढी प्रतिकूल भावना नाही. राज यांना बरोबर घेऊन महायुतीने प्रचारमोहीम उघडली तर मुंबईतच नव्हे तर उत्तर भारतात त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटेल आणि भाजपला मनसेची मदत व्हायच्याऐवजी राज ठाकरेंची अडचणच होईल, हे ओळखून पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी मराठी मुत्सद्दी फडणवीस यांना आदेश दिला की, मनसेची मनधरणी थांबवा. त्यानुसार आता महा-महायुती शिंकाळ्यात टांगली गेली आहे.

अर्थातच मनसे बरोबर घेऊनही प्रचार सोपा गेलाच नसता. महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांपैकी मनसेला 16, शिवसेनेला 16 आणि भाजपला 16 जागा असाव्यात, अशी सनसनाटी मागणी करायचे ‘राजगडावर’ ठरत होते. मुंबईतही प्रत्येकी दोन जागा त्यांना हव्या होत्या. काही वृत्तपत्रांनी तर त्या जागांचे वाटपही घोषित केले होते. उद्धव आणि राज एकत्र आले तर राज्यातच नव्हे तर देशातच भगवा फडकेल. मग दिल्लीचे तख्त महाराष्ट्र सांभाळणार नाही तर त्या तख्तावरच बसेल, असे मांडेही खाणे शक्य होते. आता भाजपने मनसेची टोपी आपल्याला नको, असे जाहीर केल्यामुळे ते मनातले मांडे मनातच राहतील आणि मोदींचे अंकगणित चुकले तर त्यांचेही लाल किल्ल्यावरचे भाषण व्यासपीठावरील नेपथ्यापुरतेच म्हणजे ‘फार्सिकल ट्रॅजेडी’ म्हणून उरेल!