आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागराजे रचिला पाया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या शतकाच्या साठीनंतरचा काळ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची (त्या वेळच्या मराठवाडा विद्यापीठाची) स्थापना 1958 मध्ये झाली. प्रथम अर्थशास्त्र आणि मराठी असे दोनच विभाग निर्माण झाले. 1959 च्या डिसेंबर महिन्यात मराठी विभागात विख्यात समीक्षक प्रा. वा. ल. कुलकर्णी प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून आणि मी अधिव्याख्याता म्हणून रुजू झालो. त्या वेळचे औरंगाबाद कसे असेल? पैठण गेटपासून क्रांती चौकापर्यंत व बाबा पेट्रोलपंपापासून रेल्वेस्टेशनपर्यंत तुरळक व विरळ वस्ती होती. सायंकाळपासून शुकशुकाट. मग रेल्वेस्टेशनपासून पैठणकडे जाणारा रस्ता कसा असेल, याची कल्पना करा. आज रेल्वे लाइनवर असलेला उड्डाणपूल त्या वेळी नव्हता. मीटर गेज असल्याने रेल्वेची वर्दळही मर्यादितच होती. पैठण रोडवर केवळ एकाकी सिल्कमिल कॉलनी होती. तिथं निर्माण होणा-या सिल्क साड्यांची कीर्ती मात्र दिल्लीपर्यंत पसरलेली. परदेशी पर्यटक हिमरू-बिदरी शाली औरंगाबादची आठवण म्हणून घेऊन जायचे...पण सायंकाळनंतर रेल्वे पटरी ओलांडून जाण्याची हिंमत कोणी करत नसे. हे सांगूनही कोणाला खरं वाटणार नाही.
अशा स्थितीत महंत नागराजबाबांनी (मोठ्या बाबांनी) सिल्क मिलजवळ महानुभाव आश्रम स्थापन केला. सिल्कमिलच्या मालकांची ही जागा होती. त्यांनी ही जागा मला दिली, असं नागराजबाबांनी मला सांगितल्याचे आठवते. याचे आश्चर्य वाटण्याचे कारण म्हणजे सिल्क मिलचे मालक मुस्लिम आहेत, पण नागराजबाबा ज्या खान्देशातून ज्या गावातून येथे आले, तिथल्या अन्य समाजाप्रमाणे मुस्लिम समाजाशीही त्यांचे निकटचे संबंध होते. आश्रम हा खरं तर गावापासून दूरच असायला हवा, शेवलीकरबाबांचा बदनापूरचा किंवा बोरीचा वा सातारचा महानुभाव महंतांचा आश्रम गावापासून दूरच आहे. मराठवाड्यातला श्री चक्रधर स्वामींचा संचार लक्षात घेता नि इजळी, वाडी यांच्यासारखी गावेच्या गावे महानुभाव पंथीयांचीच आहेत. हा विचार करून औरंगाबादची बाबांची निवड अत्यंत दूरदृष्टीचीच होती असं म्हणायला हवं. फार थोडी माणसं वगळता औरंगाबादेत बाबांच्या परिचयाचं असं कोण होतं? पण त्यांनी किती वेगवेगळ्या जाती-धर्म-पंथांच्या व विविध स्तरांतील लोकांशी किती घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले. त्यात डॉ. खेडकर होते. चिकलठाण्याचे भीमराव पाटील, डॉ. पेंडकर, जगन्नाथ महाराज पवार, रावसाहेब शेळके, दादा गणोरकर, आणखी किती तरी माणसं होती. ते औरंगाबादेत आल्यापासून त्यांचे नि माझे स्नेहसंबंध जुळले. त्यामुळे आश्रमाच्या उभारणीचा यच्चयावत इतिहास माझ्या डोळ्यासमोर आजही जसाच्या तसा उभा आहे. आज पैठण रोडवरील महानुभाव आश्रम श्रीकृष्ण मंदिर कुणाला परिचित नाही? एवढेच नव्हे, तर बीड बायपास रोड हा तेथूनच जातो. पण ज्या वेळी श्रीकृष्ण मंदिर नव्हतं त्या वेळची महानुभाव आश्रमाची कल्पना तरी तुम्ही करू शकाल का? बाबांचा संबंध व संपर्क हैदराबादच्या कृष्णदास महानुभावांच्या गीता आश्रमापासून उत्तरेकडे पंजाब-काश्मीरपर्यंत व पूर्वेकडे कोलकात्यापर्यंत होता.
शेख अब्दुल्लाही आश्रमात येऊन गेलेले होते. बाबांनी आश्रमाचा नियोजनबद्ध विकास केला. प्रथम आश्रम प्रणालीची, आश्रमवासीयांची व्यवस्था, त्यानंतर संत-महंतांची आणि अभ्यागतांची व महानुभाव साहित्याच्या अभ्यासक-संशोधकांची, त्याचप्रमाणे येणा-या- जाणा-या पंथीयांची अशा क्रमाक्रमाने महानुभाव आश्रमाला रूप येऊ लागले. मी विद्यापीठात येताच मराठवाड्यातील हस्तलिखितांच्या संग्रहाचा प्रकल्प मराठी विभागात सुरू केला. भारतातल्या विद्यापीठाच्या कोणत्याही मराठी विभागात नसलेली महानुभाव पंडित ही जागा निर्माण केली. त्या जागी महंत कबलेबाबा यांची नियुक्ती करून दोन संशोधन सहायकही अन्य पंथीय हस्तलिखितं मिळवण्यासाठी होते. एकूण साडेचार-पाच हजार हस्तलिखितांत हजार-दीड हजार महानुभावीय हस्तलिखितांचा संग्रह तीन दशकांत झाला. यासाठी बाबांचे सहकार्यही महत्त्वाचे आहे. बाबांनीही आश्रमात हस्तलिखितांची ‘पोथीशाळा’ स्थापन केली. महंत नागराजबाबांच्या नेतृत्वाखाली राऊळ प्रकाशन हा एक महत्त्वाचा उपक्रम सुरू झाला. डॉ. भाऊसाहेब कोलते यांनी संपादिलेले ‘लीळाचरित्र’, ‘बत्तीस लक्षणी टीपग्रंथ’ तसेच डॉ. बापूजी संकपाळ, डॉ. ब्रह्मानंद देशपांडे यांच्याबरोबरच सांप्रदायिकांचे ग्रंथही राऊळ प्रकाशनाने प्रकाशित केले. यातील काही ग्रंथांना साहित्य-संस्कृती मंडळाचे अनुदानही मिळाले होते. आश्रमाच्या वतीने चालवण्यात येणा-या ‘महानुभाव’ मासिकातून काही अप्रकाशित संहिताही प्रकाशित झाल्या होत्या. अशा प्रकारे आश्रमाच्या रूपाने शून्यातून विश्व निर्माण झाले. ज्या वास्तूने बाबांनी निर्मिलेले सोनेरी दिवस पाहिले त्याच आश्रमाने बाबांच्या नसण्याची पोकळीही अनुभवली आहे; पण बाबांच्या प्रेरणेने आजही आश्रमवासीयांनी त्यांच्यानंतरही उभारी धरली आहे. महानुभाव पंथाचे अवतारस्वरूप व प्रवर्तक चक्रधरस्वामींनी म्हटले होते, ‘एथिंची वचने आठविजेती’ आणि असा आदेशही दिला होता, ‘तू उभा ठाकलासींचि पुरे’. औरंगाबादचा महानुभाव आश्रमही स्वामींच्या दोन वचनांचे पाथेय घेऊनच आजवरच्या अर्धशतकानंतरची वाटचाल निश्चितच करील, असा विश्वास वाटतो.