आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"फार्मासिस्ट : आपल्या आरोग्याचा सोबती' हेच ब्रीद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

२५ सप्टेंबर फार्मासिस्ट डे : चुकीची औषधे दिल्याने रुग्णांना अपाय होऊ नये म्हणून सजग राहून कृती करणे फार्मासिस्टने कर्तव्य समजले पाहिजे. रुग्णांची लूट करणाऱ्यांना एक्सपोज करून नियम डावलून औषध विक्री/वितरण करणाऱ्यांची तक्रार शासनाकडे करणे हीसुद्धा रुग्णसेवाच ठरते.
आ जघडीला फार्मासिस्ट हे जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या आरोग्य व्यावसायिक गटाचे प्रतिनिधित्व करतात. भारतात जवळपास दहा लाखांपेक्षा अधिक फार्मासिस्ट विविध पदांवर कार्यरत असून आपले एकमेवाद्वितीय ज्ञान आणि कौशल्य याद्वारे राष्ट्राचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी ते योगदान देत आहेत. लोकांना याची जाणीव व्हावी म्हणून २५ सप्टेंबर - जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या निमित्ताने दरवर्षी एक नवीन थीम घेऊन जगभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून केले जाते. वर्ष २०१५ साठी ‘फार्मासिस्ट : आपल्या आरोग्याचा सोबती’ या घोषवाक्यानुसार विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
औषध संशोधन, निर्मिती यामध्ये काम करणाऱ्या फार्मासिस्टशी लोकांचा तसा प्रत्यक्ष संबंध येत नसला तरी त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शासकीय सेवेत (दवाखान्यात) कार्यरत, औषध विक्री दुकानातील फार्मासिस्टकडून जनतेला थेट सेवा दिली जाते. त्यामुळे त्यांचा अधिक परिचय. आज अशी परिस्थिती आहे की, शासकीय दवाखान्यातील फार्मासिस्टना त्यांच्या नियमित कामाव्यतिरिक्त इतरही कामे करावी लागतात. ग्रामीण भागात फार्मासिस्ट हाच डॉक्टरची कामे पार पाडत असल्याचे चित्र पाहायला मिळेल. हे गैर असले तरी शासकीय सेवेतील डॉक्टरांच्या गैहजेरीत रुग्णांना दिलासा देण्यासाठी हे सर्व करण्याशिवाय फार्मासिस्टकडे पर्याय असतो. अनेक प्रसंगी रुग्णांच्या नातेवाइकांच्या रोषास तोच बळी पडतो. हे प्रकार बंद होणे आवश्यक आहे. एकीकडे असे असताना दुसरीकडे विविध शासकीय स्तरांवर फार्मासिस्टच्या अनुपस्थितीत अप्रशिक्षित व्यक्तींकडून औषध वितरण केले जाते. परिणामतः रुग्णांच्या आरोग्यास बाधा झाल्याच्या घटना सतत घडत असतात. अंगणवाडी, शाळा, इतर शासकीय/सार्वजनिक ठिकाणी अप्रशिक्षित व्यक्तींकडून चुकीची औषधे दिल्याने विषबाधा होण्याचे अनेक प्रकार मागील काही वर्षांत घडलेले आहेत. मुदत संपलेली औषधी देणे, खोकल्याची बाटली समजून फिनाइल, टॉनिक म्हणून जखमेचे औषध, आयर्न समजून अॅसिडसुद्धा लहान मुलांना पाजण्यात आले आहे. सूज उतरण्यासाठी रेबीजचे इंजेक्शनही दिले गेले आहे. दीड वर्षाच्या मुलीस जंताचे पातळ औषध देण्याऐवजी खाण्यास दिलेली गोळी घशात अडकून मृत्यू झाल्याची भयंकर घटनाही घडली आहे. शासकीय योजनांमधील असे जीवघेणे प्रकार केव्हा बंद होणार?
आजघडीला महाराष्ट्र स्टेट फार्मसी काैन्सिलकडे सुमारे पावणेदोन लाख फार्मासिस्टची नोंद आहे. साधारणतः चारशे महाविद्यालयांतून दरवर्षी बाहेर पडणाऱ्या फार्मासिस्टमुळे या संख्येत वाढच होणार आहे. त्यामुळे आरोग्यसेवेचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या फार्मासिस्टचा रुग्णांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने पुरेपूर उपयोग होणे गरजेचे आहे. कारण फार्मासिस्टला औषधांच्या परिणाम-दुष्परिणामाचे ज्ञान असते. शिवाय नैतिकतेसोबत नियमांच्या पालनाचेही भान असते. औषधांचे डोस कधी व कसे घेतले पाहिजेत याची माहिती तो रुग्णांना देऊ शकतो. औषधांची साठवणूक व वितरण याचाही त्यास अभ्यास असतो. म्हणूनच जनआरोग्य अबाधित राखण्यासाठी खाजगी ठिकाणी असो की, सार्वजनिक अथवा सरकारी ठिकाणी, औषध वितरण/विक्री हे केवळ फार्मासिस्टकडूनच होणे गरजेचे आहे.
खासगी व्यवसायात फार्मासिस्टच्या अनुपस्थितीत, प्रिस्क्रिप्शन व बिलाशिवाय होणाऱ्या औषधविक्रीवर आघाडी सरकारने बऱ्यापैकी पायबंद घातला होता. त्यामुळे औषध विक्रेत्यांच्या काही संघटनांनी अवाजवी मागण्यांसाठी रुग्णांना वेठीस धरण्याचा अनेकदा प्रयत्न केला. त्यांच्या बंद/संपमध्ये सहभागी होण्याचा प्रचंड दबाव असतानाही बहुतांश फार्मासिस्टनी रुग्णांसाठी औषधसेवा सुरळीत ठेवत आपले कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला. यामुळे फार्मासिस्टबाबत समाजात सकारात्मक संदेश गेला आणि त्याचे अस्तित्वही जनतेला ठळकपणे जाणवले. मात्र, आता पुन्हा एकदा फार्मासिस्टच्या गैरहजेरीत, प्रिस्क्रिप्शन व बिलाशिवाय औषध विक्रीचे प्रमाण वाढले असून अन्न व औषध प्रशासनाकडून कारवायांची तीव्रताही कमी झाली आहे. असे असले तरी औषधी दुकानांत नियुक्त फार्मासिस्टनी आपले वैशिष्ट्य ओळखून समाजाला अधिक चांगल्या प्रकारे सेवा दिली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक औषधी दुकानात नियुक्त असलेल्या फार्मासिस्टने प्रत्यक्षात तिथे उपस्थित राहणे आवश्यक आहेच आणि त्याच्या उपस्थितीची जाणीवही रुग्णांना करून द्यायला हवी. केवळ कारवाईच्या भीतीपोटी कागदावरचा फार्मासिस्ट दुकानात तात्पुरता दिसतो असे होऊ नये. फार्मासिस्टने स्वतःला सतत अपग्रेड करत आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा रुग्णांना द्यायला हवा. रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांना फार्मासिस्ट-नॉनफार्मासिस्ट यांतील फरक जाणवू लागला की, तेही अभ्यासू, अपडेटेड फार्मासिस्टकडूनच औषध खरेदी करण्यास प्राधान्य देतील.
चुकीची औषधे दिल्याने रुग्णांना अपाय होऊ नये म्हणून सजग राहून कृती करणे फार्मासिस्टने स्वतःचे कर्तव्य समजले पाहिजे. रुग्णांची लूट करणाऱ्यांना सतत एक्सपोज करून नियम डावलून औषध विक्री/वितरण करणाऱ्यांची तक्रार शासन-प्रशासनाकडे करणे हीसुद्धा रुग्णसेवाच ठरते. रुग्णांनीही फार्मासिस्ट असलेल्याच औषधी दुकानातून औषधे घ्यावीत. अप्रशिक्षित/नॉनफार्मासिस्टकडून चुकीची औषधे व चुकीची माहिती मिळण्याची शक्यता असते. औषधांचा चुकीच्या पद्धतीने वापर करणे किंवा चुकीची औषधे घेणे यामुळेही व्यक्ती दगावण्याचे प्रमाण खूप आहे. याबाबतीत प्रतिबंधात्मक पावले उचलणे आवश्यक आहे. असे झाले नाही तर जीवनदान देणारी औषधेच टॉप टेन किलर्सच्या यादीत जाऊन बसतील अशी भीती जाणकार व्यक्त करतात.
सरकारकडून फार्मासिस्टची भरती न केली जाणे, फार्मसी शिक्षणाशी संबंध नसलेल्यांकडून औषधांची मार्केटिंग करून घेणे, परवडत नाही म्हणून दुकानात फार्मासिस्टची गरज नाही, असे म्हणणे जनतेच्या आरोग्यासाठी घातक आहे. करोडो लोकांचे आरोग्य व लाखो फार्मासिस्टचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०, नियम १९४५, फार्मसी कायदा १९४८ यांच्यासह आरोग्याशी निगडित कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी झाली तरच रुग्ण व डॉक्टर यांच्यातील दुवा असलेल्या फार्मासिस्टला समाजाप्रतीच्या कर्तव्याचे खऱ्या अर्थाने निर्वहन करता येईल.