आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविस्मरणीय महफिल-ए-रफी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसन्न सकाळ. अंगणातल्या पारिजातकाखाली फुलांचा सडा पडलेला. केशरी दांड्याची पांढरीशुभ्र फुले. मन प्रफुल्लित करणारी, आपल्या मंद सुगंधाने चित्त उल्हासित करणारी. हा अनुभव तुम्ही घेतलाय का? महंमद रफीचे गाणे असाच अनुभव देते. मुलायम, निरागस आवाजाची देणगी हे रफी यांचे वैशिष्ट्य. राग-लोभ, प्रेम-विरह, भक्ती असो की राष्ट्रप्रेम, कोणताही भाव रफी यांच्या आवाजाने सोनेरी होतो. मानवी मनाचा भावपसारा रफी यांनी आपल्या गायकीने अजरामर केला आहे.


‘बहारों फूल बरसाओ...’ (सूरज) मध्ये तिच्या स्वागतातली आतुरता, आपलेपणाची भावना ज्या तीव्रतेने येते त्याला तोडच नाही. तिचे असे फुलांच्या पायघड्यांनी स्वागत करण्यापूर्वी, ‘मैं कहीं कवी ना बन जाऊं...’ (प्यार ही प्यार) मधून तिला दिलेला इशारा मधाइतका मधुर होताच की! ‘ये रेशमी जुल्फें...’(दो रास्ते) मधून तरुणाईचे जगण्याचे कारण रफी यांच्या गायकीने अधिकच ठसले. ‘आने से उसके आए बहार... ’(जीने की राह) ही तुमच्या-आमच्या मनातील भावना रफीच्या आवाजाने जास्त वास्तव केली. ‘चौदवी की चाँद हो...’ (चौदवी का चाँद) मधल्या तिच्या सौंदर्याला रफीच्या आवाजाने चार चाँद लागले. ‘ऐ फूलों की रानी...’ (आरजू) मधून तिच्या हास्याचे चांदणे रफीच्या आवाजाने अधिकच फुलले. ‘देखा है तेरी आँखों में...’ (प्यार ही प्यार) मधून तिला प्रेमाची जाणीव करून देण्यात रफीच्या आवाजाने सच्चाई आली. ‘मैने पूछा चाँद से...’ (अब्दुल्लाह) मधून तिच्या सौंदर्याची त्रिखंडात ग्वाही देताना रफीचा आवाज जी उंची गाठतो, ती अक्षरश: अवाक् करणारी आहे! ‘रुख से जरा नकाब...’ (मेरे हुजूर) मधले आर्जव तर निव्वळ अविस्मरणीय!


महंमद रफी यांच्या मुलायम आवाजाने प्रेमाचा बहर जसा खुलतो, तसा विरहाचा विलाप काळीज पिळवटून टाकतो. ‘दोनों ने किया था प्यार मगर...’ (महुआ) मधून तिच्या बेवफाईचा केलेला पर्दाफाश चीड आणणारा आहे. ‘पत्थर के सनम तुझे हमने...’ (पत्थर के सनम) मधून झालेला पश्चात्ताप अस्वस्थ करतो. ‘आज पुरानी राहों से...’ (आदमी) मधले एकटेपण अक्षरश: सुन्न करणारे, ‘अकेले हैं चले आओ...’ (राज) मधले आशावादी आर्जव चकित करणारे आहे, ‘आपकी पहलू में आकर रो...’ (मेरा साया) मधली निरागसता मन हेलावून टाकणारी आहे. ‘गम उठाने के लिए ...’(मेरे हुजूर), ‘मिले ना फूल...’ (अनोखी रात) आणि ‘हम इंतजार करेंगे तेरा कयामत तक...’ (बहू-बेगम) मधला दुर्दम्य आत्मविश्वास थक्क करणारा, ‘कभी खुद पे कभी हालात पे...’ (हम दोनों) मधला भाव काहीच सुचू न देणारा आहे. ‘खिलौना जानकर तुम तो...’ (खिलौना) मधले वास्तव विचार करायला लावणारे आहे. ‘क्या से क्या हो गया...’ (गाइड)मधला विषण्ण स्वर रफीच्या आवाजाने अधिकच गहिरा होतो, मनात साठून राहतो. ‘मेरे दुश्मन तू मेरी...’ (आए दिन बहार के) किंवा ‘तेरी गलियों में ना...’ (हवस) आणि ‘सौ बार जनम लेंगे...’ (उस्तादों के उस्ताद) मधला निर्धार रफीच्या आवाजाने जास्त ठसतो. ‘क्या हुआ तेरा वादा...’ (हम किसीसे कम नहीं) मधला प्रश्न सतत मनात रेंगाळत राहतो. ‘रंग और नूर की बारात किसे पेश करू ...’(गजल) मधली उद्ध्वस्त भावना मन पोखरते. ‘ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं...’ (हीररांझा) मधून टोकाचा निर्णय रफीच्या आवाजाने वास्तव वाटतो. बरे, एवढे सर्व घडूनही, ‘मेरे मितवा...’ (गीत) तसेच ‘सुहानी रात ढल चुकी...’ (दुलारी) मधून व्यक्त केलेला आशावाद केवळ रफीच्या आवाजातच शोभतो. ओन्ली ही कॅन डू इट !


प्रेमाची गाणी गात असतानाच रफी यांनी गझल, भजन, कव्वाली अशी अनेक मूडची गाणी तेवढ्याच ताकदीने पेश केली. देशभक्तिपर तसेच रागदारीवर आधारित गाण्यांचे रफी यांनी सोने केले. ‘ओ दुनिया के रखवाले...’, ‘मन तडपत हरि दर्शन को...’ (बैजू बावरा) ते ‘परदा है परदा...’ (अमर अकबर अ‍ॅँथनी) असा वेगवेगळ्या टोकाचा प्रवास हीच तर महंमद रफी यांच्या गायकीची खासियत. त्यामुळेच महंमद रफी यांच्या अवीट गोडीच्या गाण्यांची मैफल कधीच संपू नये, असे वाटते. त्यांनी उगाच नाही म्हटलं- ‘तुम मुझे यूँ भूला ना पाओगे...’आणि हे शंभर टक्के खरे आहे.