आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञात मुंबईचे दर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘संशोधनाचे लोकशाहीकरण व दस्तऐवजीकरणातून हस्तक्षेप’ हे तत्त्व नव्या जगाला बदलण्याचा मूलमंत्र असेल असे हे आताच्या घडीला केलेले विधान कदाचित धाडसाचे ठरेल. पण समाजाला अंतर्बाह्य बदलणारी, त्याचे अंतरंग जाणून घेणारी, त्यामध्ये क्रांतीची बीजे रोवणारी घुसळण समाजात सुरूच असते. या बदलाला वेधून घेणारे संशोधन ब-याचदा लोकांपर्यंत पोहोचत नसते. ‘सबार्ल्टन स्टडीज’ म्हणजे वंचितांच्या इतिहासाची मांडणी करणा-या अभ्यासात समाजाचे राजकीय-सामाजिक-आर्थिक बदल टिपले जातात.


‘सबार्ल्टन स्टडीज’ ही शाखा आपल्याकडे फारशी परिचित नाही. अगदी उदाहरण द्यायचे झाल्यास जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करत होते तेव्हा तत्कालीन समाजाची रचना कशी होती? त्या काळी सामाजिक व्यवहार कसे चालत होते ? या समाजाला कोणत्या आर्थिक-सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागत होते? अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांचा अभ्यास आपल्याकडे उपलब्ध नाही. सबार्ल्टन स्टडीज या शाखेमध्ये ‘हिस्ट्री फ्रॉम बिलो’ असा वेध घेतला जातो. जागतिक कीर्तीचे मानववंशशास्त्रज्ञ आणि शहरीकरणाचे अभ्यासक प्रा. अर्जुन अप्पादुराई यांची ‘पुकार’ ही संस्था मुंबईमध्ये राहणा-या वंचितांचा अभ्यास गेली कित्येक वर्षे करते आहे. या संस्थेचा ‘यूथ फेलोशिप’ हा उपक्रम केवळ माहितीचे संकलन करणे एवढ्यापुरता मर्यादित नसून शहर आणि शहरीकरण, लोक आणि लोकजीवन यांच्याबद्दल हा उपक्रम आपले निरीक्षण मांडतो. ‘इथे खरी मुंबई भेटते’ हे पुस्तक ‘समकालीन प्रकाशना’ने प्रसिद्ध केले आहे. या पुस्तकाचे संपादन युनिक फीचर्सने केले असून हे पुस्तक अभ्यासूंनी संग्रही ठेवण्यासारखे आहे.


‘पुकार’चा ‘यूथ फेलोशिप’ हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे एक प्रकट रूप आहे. म्हणजे आपले जगणे, आपली भाषा, आपल्या जेवणखाण्याच्या पद्धती, आजूबाजूचा निसर्ग आणि अगदी कचरादेखील आपल्या अभ्यासाचा विषय ठरू शकतो. या उपक्रमाच्या माध्यमातून तरुण मुले, जी मुंबईत राहणारी आहेत, ती आपल्या निरीक्षणातून बदलत्या मुंबईचे जीवन समजावून देतात. ही मुले-मुली म्हणजे कोणी शास्त्रज्ञ, संशोधक, उच्चशिक्षित नाहीत, तर ती धारावीसारख्या झोपडपट्टीत राहणारी आहेत, लोकलचा रोजचा प्रवास करणारी आहेत, रात्रशाळेत जाणारी आहेत, मुंब्रयासारख्या मुस्लिमबहुल भागात राहणारी आहेत, मुंबईत सुरू असलेल्या हजारो इमारतींमध्ये काम करणारे मजूर आहेत, गिरणगावमध्ये कोंदट चाळीत राहणारी आहेत, तसे गिरगावसारख्या सुसंस्कृत समजल्या जाणा-या भागातील आहेत. या तरुणांच्या अभ्यासाची दिशा एकच म्हणजे त्यांच्या आजूबाजूच्या परिसराची स्पंदने टिपणे, लोकव्यवहारांचे दस्तऐवजीकरण करणे. या उपक्रमात समाविष्ट केलेली काही संशोधने आपल्याला थक्क करायला लावतात. उदा. गिरणगावातील उत्सवांचे व्यापारीकरण, बाहेरच्या व्यक्तींना उमजलेली मुंबई, खासगी वाचनालयांचा अभ्यास, हॉटेलमध्ये काम करणा-या मुलांच्या जीवनकहाण्या, रेल्वे परिसरात काम करणारे अंध फेरीवाले, लोकलमध्ये साजरे होणारे सण, उत्सव, कल्याणमधील प्रेमविवाह, मुस्लिम समाजातील मुला-मुलींमधील लैंगिकता, नाका कामगार, मुंबईची जैवविविधता, मुंबईतील बोलीभाषा, मोबाइल फोन आणि युवक, तरुणाईतील दैववाद, मुलांचे करिअर प्लॅन, गिरणगावातील खाणावळी, मराठी नाटक व प्रेक्षक यांच्यातील नातेसंबंध, प्रवासात होणारी मुलींची छेडछाड असे शेकडो विषय या उपक्रमाच्या माध्यमातून अभ्यासले गेले आहेत.


संशोधनाचे लोकशाहीकरण हा आपली लोकशाही बळकट करण्याचा एक मार्ग असून संशोधन ही काही उच्चवर्णीयांची मक्तेदारी आहे या गृहितकालाही आव्हान देण्याचे महत्त्वाचे कार्य पुकारने केले आहे. या संस्थेने 2005 पासून दीडेकशे अभ्यास हाती घेतले आहेत आणि या अभ्यासाच्या निष्कर्षातून पुढे येणारी मुंबईची दुसरी बाजू वाचकाला मन सुन्न करते. या पुस्तकाचे लेखक या उपक्रमात सहभागी झालेलेच तरुण-तरुणी आहेत. त्यामुळे त्यांचे अनुभव, विचार, मते ही विचारप्रवर्तक आहेत. पण सध्याचा तरुण किती सर्जनशील आहे, तो देशाची एकता, अखंडता, धर्मनिरपेक्षता, बांधिलकी यांचा आदर करतो हेही लक्षात येते. आजच्या तरुणांनी समाजाकडे, घडामोडींकडे, बदलांकडे डोळसपणे पाहिले पाहिजे याचा वस्तुपाठ हे पुस्तक देते. समाजातल्या वंचित, उपेक्षितांचे जीवन जसे हलाखीचे असते तसे आर्थिकदृष्ट्या सधन असलेला समाजही अनेक सामाजिक-आर्थिक-मानसिक आवर्तनात सापडलेला आहे. एकंदरीत आपले समाजजीवन इतके व्यामिश्र आणि गुंतागुंतीचे झाले आहे की, या समाजाच्या प्रश्नांची उत्तरे शोधणे हे वरकरणी कठीण वाटते. पण हे पुस्तक मनात आशावाद निर्माण करते, समाज बदलण्यासाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास निर्माण करते. अधिक माहितीसाठी ‘समकालीन प्रकाशन’ यांच्या samakaleen@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.