आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशातील निवडणुका आणि प्रियांका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुल गांधी यांची इच्छा असल्यास आपण निवडणुकीच्या प्रचारात मदत करण्यास तयार आहोत, या प्रियांका वडरा यांनी अमेठीत पत्रकारांशी बोलताना उच्चारलेल्या वाक्याबाबत अनेकांना ते बोलण्याच्या ओघात अथवा आकस्मिकरीत्या उच्चारले गेले आहे असे वाटेल. पण ते अजिबात आकस्मिक नाही. प्रियांका यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, त्यांनी स्वत:ला रायबरेली व अमेठीपुरतेच सीमित ठेवले होते. उत्तर प्रदेशात प्रचार करण्याची इच्छा त्यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या बोलून दाखवली आहे. उत्तर प्रदेशासाठी काँग्रेसने आखलेल्या रणनीतीचा भाग म्हणून हे वाक्य त्या बोलल्या असाव्यात. जर राहुल गांधींनी त्यांची ऑफर नाकारली असती, तर विरोधकांनी भाऊ-बहिणीत दुफळी निर्माण झाल्याचा प्रचार केला असता. त्यामुळे प्रियांका यांच्या वक्तव्याचे केंद्रीय दळणवळण मंत्री अंबिका सोनी यांनी समर्थनच केले. जर तसे नसते, तर सोनिया गांधी यांनीदेखील समर्थन केले नसते. प्रियांका यांनी ज्या शब्दांमध्ये आपली ऑफर मांडली होती, त्यातून त्यांना सक्रिय राजकारणात शिरकाव करायचा नाही, तर केवळ आपल्या भावाला प्रचारात मदत करायची असल्याचे ध्वनित होते. प्रियांका हे पक्षासाठी ब्रह्मास्त्र आहे, ज्याचा प्रयोग काँग्रेसला 2014च्या निवडणुकीत करायचा आहे. परंतु आता उत्तर प्रदेशाची निवडणूक स्वत:च्या राजकीय कारकिर्दीसाठी प्रतिष्ठेची करणा-या राहुल यांच्या मदतीसाठी त्या पुढे सरसावल्या आहेत. उत्तर प्रदेशातील निवडणुकीला 2014च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून रंग दिला जात आहे. दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जात असल्यामुळे प्रियांका यांनी प्रचारात उडी घेतल्यास येथील निवडणुकीच्या वातावरणात जोश येऊ शकतो. राहुलसोबत त्यांनी राज्यामध्ये किमान अर्ध्या डझन रॅलींमध्ये जरी भाग घेतला, तरी राहुल यांनी मागील काही आठवड्यांत मतदारसंघांमध्ये झंझावाती दौरे करून, दलित घरांमध्ये राहून, भट्टा परसौलच्या शेतक-यांची बाजू घेऊन आणि पूर्व उत्तर प्रदेशातील विणकरांना आर्थिक पॅकेजचे आश्वासन देऊन निर्माण केलेल्या हवेत आणखी रंग भरू शकतो.
उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या पाठीमागे सध्या कुठलीही जमात नाही. प्रत्येक मतदारसंघात सुमारे 15 टक्के जटाव मतदारांच्या आधाराने मायावतींची सुरुवात होते. जटाव मायावतींशी इमान राखून आहेत. मायावतींच्या आसनाला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन या वेळी तर ते त्यांना भरभरून मतदान करण्याची शक्यता आहे. त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी मुलायमसिंग यादव आणि त्यांचे पुत्र अखिलेश यांच्यासोबत यादव समाज आहे. अखिलेश यांच्या सभा आणि यात्रांना मोठीच गर्दी होत आहे. 2007मध्ये बहुजन समाज पक्षासोबत जाणा-या ब्राह्मण समाजाने मायावतींना निखळ बहुमत मिळवून दिले होते. हा समाज मायावतींबाबत खुश नाही. पण समाजवादी पक्षाच्या मागील वेळच्या ‘गुंडाराज’पेक्षा मायावती परवडल्या, असे त्यांचे मत आहे. भाजपच्या रूपाने त्यांना एक पर्याय असू शकतो. परंतु बाबूसिंग कुशवाहांसारख्या नेत्याला भाजपने पक्षात स्थान देऊन आपल्या भ्रष्टाचाराविरोधातील भूमिकेवर पाणीच ओतले आहे. ज्याप्रमाणे 2009च्या लोकसभा निवडणुकीत ब्राह्मण समाज काँग्रेसमागे उभा राहिला व पक्षाला 22 जागांवर विजय मिळवून दिला, त्याची पुनरावृत्ती राहुल आणि प्रियांका निवडणुकीसाठी एकत्र आल्यास होईल का? जर तसे घडले, तर मुस्लिमसुद्धा काँग्रेसकडे वळू शकतील. काँग्रेसला ब-यापैकी जागा मिळू शकतील. तसेच प्रियांका-राहुल यांना या निवडणुकीसाठी एकत्र आलेले पाहून काही समुदायदेखील काँग्रेसच्या पाठीमागे उभे राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात होणा-या काँग्रेसच्या या पुनरुज्जीवनाचे देशपातळीवरदेखील परिणाम जाणवतील. केंद्रीय राजकारणातील राहुलची मोठी भूमिका, संयुक्त पुरोगामी आघाडीची प्रतिमा आणि स्थैर्य, पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अपेक्षित असलेल्या आर्थिक सुधारणांचे भवितव्य आणि राष्ट्रपती भवनाचा पुढील वारसदार ठरवणे, या सर्व गोष्टींवर त्याचा परिणाम होईल.
‘रायबरेलीतून निवडून येण्यासाठी माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसणा-याला तुम्ही इथे येण्याची परवानगी कशी काय दिलीत,’ हा सवाल करत 1999मध्ये प्रियांका यांनी रायबरेलीतील प्रचारादरम्यान प्रबळ समजल्या जाणा-या अरुण नेहरूंना दिलेला धक्का सर्वांच्याच लक्षात आहे. या निवडणुकीत सतीश शर्मा 75 हजार मतांनी निवडून आले होते. हातात हार घेऊन ‘बहारो फूल बरसाओ, मेरा मेहबूब आया है’च्या सुरावटींसोबत प्रियांका यांची वाट पाहत रस्त्यावर उभ्या राहिलेल्या दलित दांपत्याचा कुणाला विसर पडेल? भर गर्दीतून पुढे येऊन प्रियांकाने या जोडप्याच्या पाया पडून आशीर्वाद घेतले होते. त्यांची ही प्रतिमादेखील तेथील कुणाच्या नजरेतून अजून पुसट झाली नसेल. प्रियांका वडरा यांच्यात अशी नैसर्गिक ‘बॉर्न टू रुल केमिस्ट्री’ आहे. परिस्थिती कशी वळणे घेईल, याचे आताच भाकीत करणे फार घाईचे ठरेल. कारण पक्षबांधणीसाठी खचितच वेळ लागतो. पण प्रचारात सामील होण्याबाबत प्रियांका यांनी दिलेल्या ऑफरने उत्तर प्रदेशात नवे वारे वाहू लागण्याची शक्यता आहे. कदाचित त्यात येथील राजकारणाचा डावही बदलू शकतो.

प्रियांका हे पक्षासाठी ब्रह्मास्त्र आहे, ज्याचा प्रयोग काँग्रेसला 2014 च्या निवडणुकीत करायचा आहे. परंतु आता उत्तर प्रदेशाची निवडणूक स्वत:च्या राजकीय कारकिर्दीसाठी प्रतिष्ठेची करणा-या राहुल यांच्या मदतीसाठी त्या पुढे सरसावल्या आहेत.