आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका-चीन सहकार्यातून निवळेल तणाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादा नवशक्तिशाली देश प्रस्थापित शक्तीला आव्हान देतो तेव्हा मोठी चूक घडते. नवशक्तिशाली देशाला आपण काहीही करू शकतो, असा आत्मविश्वास वाटू लागतो. हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक ग्रॅहम एलिसन हे एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे व त्यांच्या लेखनावर बौद्धिक मंडळींमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होते. त्यांनी ५०० वर्षांच्या इतिहासातील १६ अशा घटनांचा अभ्यास केला आहे की ज्यापैकी १२ घटनांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती व त्याचे परिणाम जगाला भोगावे लागले.  
  
चीन व अमेरिका एकमेकांचे प्रतिस्पर्धी असल्याने चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग व जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्या दृष्टिकोनात फरक आहे. चीनने दक्षिण चिनी महासागरात आपले लष्करी वर्चस्व वाढवल्याबद्दल अमेरिकेसह अनेक देशांनी वारंवार चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या घडामोडींकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. त्यांना चीनचा आक्रमकवाद पटत नसावा. उत्तर कोरिया व अमेरिकेदरम्यान तणाव निर्माण झाल्यानंतर अमेरिका व चीनने आपल्यातील सहकार्य जगापुढे आणण्याची गरज आहे. दोघांचे स्वत:चे वेगवेगळे हित आहे, पण दोघांचे सामायिक हित व्यापारवृद्धीत आहे. पण उत्तर कोरियाने परिस्थिती बिघडवली आहे. सध्या चीनमध्ये ज्या परदेशी कंपन्या व्यवसाय करत आहेत त्यांना निराशेने ग्रासले आहे. त्यात उत्तर कोरियाने निर्माण केलेल्या परिस्थितीची भर पडली आहे. उत्तर कोरियाचा स्वत:चा अण्वस्त्र कार्यक्रम अमेरिका व चीनला नको आहे. अमेरिकेच्या दबावामुळे संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून उ. कोरियावर बरेच आर्थिक निर्बंध घालण्यात आले आहेत. चीन व उ. कोरियामध्ये व्यापार सहकार्य अाहेत. पण त्याच चीनला उ. कोरियाच्या आक्रमक अण्वस्त्र कार्यक्रमामुळे अडचणीत आणले आहे. अशा परिस्थितीत चीनने एक जबाबदार देश म्हणून अमेरिकेला सहकार्य देण्याची गरज आहे. द. कोरियाने त्यांच्या देशातील क्षेपणास्त्रांचा मारा करणारी ठिकाणे अमेरिकेला देऊ केली आहेत व तेथे अमेरिकेने शस्त्रसज्जताही केली आहे. त्यामुळे अमेरिका केवळ उ. कोरियाच नव्हे, तर चीनच्या आतील प्रदेशांवरही लक्ष ठेवू शकतो.  
 
अमेरिका व चीनमध्ये तसे शत्रुत्वाचे संबंध नाहीत. काही दिवसांपूर्वीच चीनचे अध्यक्ष जिनपिंग यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली होती. ही चर्चा सकारात्मक मानली जाते. सध्या चीनची अमेरिकेला सुमारे ३८२.५ अब्ज डॉलरची निर्यात, तर अमेरिकेची चीनला ११५.८ अब्ज डॉलरची निर्यात होते. अमेरिकेत सुमारे तीन लाख चिनी विद्यार्थी विविध शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत, तर अमेरिकेचे २२ हजार विद्यार्थी चीनमध्ये शिक्षण घेत आहेत. दरवर्षी सुमारे २६ लाख चिनी पर्यटक अमेरिकेत जातात, तर अमेरिकेचे २१ लाख पर्यटक चीनमध्ये पर्यटनासाठी जातात. या आकड्यांवरून लक्षात येते की दोन्ही देशांमध्ये संबंध अधिक दृढ आहेत. त्यांच्यामध्ये व्यापाराव्यतिरिक्त अन्य क्षेत्रांमध्येही आदानप्रदान होत आहे. अमेरिकेत मालमत्ता खरेदी करण्यांपैकी अर्धेअधिक चिनी आहेत. अमेरिकेत काही जण आपली भूमी चीनच्या नागरिकांना का खुली केली जात आहे, याबद्दल प्रश्न उपस्थित करतात. चीन जर जबाबदारीची भूमिका वठवण्यास तयार असेल तर तशी भूमिका अमेरिकेनेही घेतली पाहिजे. चीनला हे लक्षात आले पाहिजे की, आशिया खंडातील अनेक देशांना अमेरिकेचे पाय रोवलेले हवे आहेत. अशा वेळी अमेरिका व चीनने त्यांच्यामध्ये सहकार्याची भावना निर्माण केल्यास उ. कोरियाने तयार केलेला तणाव निवळण्यास मदत होऊ शकते.
 
 
 
बातम्या आणखी आहेत...