आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतांचे राजकारण आणि गरजणा-या बंदुका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका माथेफिरूने अमेरिकी महिला खासदार गेब्रिएले गिफर्डससह 18 लोकांवर अंदाधुंद गोळ्या झाडल्याच्या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 2011 मध्ये म्हटले होते, ‘अशा हिंसक घटनांना आम्ही चोख उत्तर देऊ.’ या घटनेत सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. भविष्यात अशा हिंसक घटना रोखण्यासाठी आपल्या जुन्या धारणांना आव्हान देण्यास सज्ज राहावे लागेल, असे आवाहनही ओबामांनी नागरिकांना केले होते. ओबामांनी या वेळी प्रभावी भाषण केले; परंतु नंतर यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
उत्तर पूर्वेकडील विद्यापीठांमध्ये ‘गुन्हेशास्त्र आणि कायदा’ विषयाचे प्रोफेसर जेम्स एलन फॉक्स यांच्या मते, 1970 च्या दशकापासून सामूहिक गोळीबार, प्लेगप्रमाणे एखादी महामारी बनला आहे. शहरात दरवर्षी अशा प्रकारच्या सुमारे 20 घटना घडतात आणि दुसरीकडे मात्र राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मिट रोमनी यांच्यासह प्रसार माध्यमांनीही कोलोरॅडोतील चित्रपटगृहात जेम्स होम्सने केलेल्या कारनाम्यांवर गंभीर वादविवाद करण्यापासून अंग चोरले आहे.
होम्सने 20 जुलै रोजी 70 जणांवर गोळीबार केला होता. यात 12 जणांना आपले प्राण गमवावे लागले. होम्सने एका सेमी ऑटोमॅटिक असॉल्ट रायफलसह सहा हजार राउंड गोळ्या आणि शस्त्रांचा मोठा साठा जमा केला होता. असॉल्ट रायफल शूटर्सचे आवडते शस्त्र आहे. 1994 मध्ये असॉल्टच्या विक्रीवर फेडरल बंदीअंतर्गत बंधने लादली गेली होती. मेसाच्युसेट्सचे गर्व्हनर असलेल्या मिट रोमनी यांनीही या वेळी आपल्या राज्यात असॉल्टच्या विक्रीवर बंदी घातली होती. आता मात्र रोमनी यावर बोलण्यास तयार नाहीत. ते सध्या रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आहेत व रिपब्लिकन पक्ष बंदूक बाळगण्याच्या अधिकाराचे समर्थन करतो. डेमोक्रॅटिक पक्ष मात्र बंदुकींवर नियंत्रण ठेवण्याचे समर्थन करतो. डेमोक्रॅटिक राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी एसॉल्ट शस्त्रावर बंदी आणि हँड गन विकत घेणा-या व्यक्तीचे संपूर्ण रेकॉर्ड तपासण्याचा कायदाच लागू केला होता. 2004 मध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी हा कायदा रद्द होऊ दिला. गरीब आणि अल्पसंख्याकच या हिंसाचाराला बळी पडतात. हा वर्ग डेमोक्रॅटिक पक्षाचा समर्थक मानला जातो. तरीही आता पक्षाने गन कंट्रोल हा मुद्दाच सोडून दिला आहे. यामुळे गन कल्चरला प्रोत्साहन देणा-या नॅशनल रायफल असोसिएशन (एनआरए)ला मोकळे मैदान मिळाले आहे. शस्त्रास्त्र खरेदी करण्याचा अधिकार अमेरिकी घटनेनेच नागरिकांना दिला आहे.
1990 मध्ये हिंसक घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर क्लिंटन यांनी क्राइम बिल 1994 सादर केले होते. यात असॉल्ट शस्त्रांवरील बंदीचाही समावेश होता. इंडियानातील डेमोक्रॅट सिनेटर अँड्र्यू जेकब्स यांनी आपले मत बदलल्यानंतर विधेयक 216-214 अशा अत्यल्प फरकाने मंजूर झाले. 1994 मध्ये संसदेच्या (कॉँग्रेस) निवडणुकांमध्ये जेकब्स एनआरएच्या निशाण्यावर होते; परंतु ते स्वत:ची जागा वाचवण्यात यशस्वी झाले. या निवडणुकांमध्ये 54 डेमोक्रॅट पराभूत झाले होते. एनआरए विरोधी मोहिमेनेच आपला पराभव झाल्याचा आरोप या वेळी 20 डेमोक्रॅट उमेदवारांनी केला. मागील 30 वर्षांच्या कालावधीत एनआरएची शक्ती वाढल्याने ‘गन कंट्रोल’ करणे कठीण झाले आहे. 1982 मध्ये संघटनेचे 24 लाख सदस्य होते. आता त्यांची संख्या 43 लाखांवर गेली आहे. हिंसक गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याने आणि रिपब्लिकन पक्षातर्फे बंदुकांना अमेरिकी स्वातंत्र्याचे प्रतीक म्हटल्याने परिस्थिती बदलली आहे.
एसॉल्टवर बंदी लादूनही याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रतिबंधाच्या 10 वर्षांमध्येही सामूहिक गोळीबाराच्या घटनांमध्ये किरकोळ घसरण झाली आहे. यंदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. आपल्या क्षेत्रातील 20 टक्के मतदार जर गन कंट्रोलच्या विरोधात असतील तर हे धोकादायक असल्याचे माजी सिनेटर ट्रेड कॉफ यांचे म्हणणे आहे.
ओहियो, पेन्सिलवानिया, व्हर्जिनिया यांसारख्या राज्यांमध्ये प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. या राज्यात बंदूक बाळगणा-यांची सर्वाधिक संख्या आहे. ओबामांनाही बंदूक समर्थकांची मते मिळणार नाहीत; परंतु तरीही ते गप्प आहेत. अमेरिकी नागरिकांमध्ये गन कंट्रोलविरोधक वाढत असतानाच होम्सने ऑरोरा, कोलोरॅडोत गोळीबार केला आहे.
दारूगोळ्याचा वाढता व्यवसाय - नाटे रोलिग्स
कोलोरॅडोतील चित्रपटगृहात अंदाधुंद गोळीबार करणा-या जेम्स होम्सने गोळीबारापूर्वी केलेली तयारी सा-यांना अवाक् करणारी आहे. त्याने आपल्या एसॉल्ट रायफल, पिस्तूल आणि शॉटगनसाठी सहा हजार राउंड गोळ्या विकत घेतल्या होत्या. अमेरिकेत बंदूक, पिस्तूलच्या गोळ्यांचा व्यवसाय तेजीत आहे. मे 2012 मध्ये गोळ्या, स्फोटकांचे (अ‍ॅम्युनिशन) 1996 लायसन्स असलेले अधिकृत विक्रेते होते. जानेवारी 2010 मध्ये ही संख्या 1567 होती.
दारूगोळ्याचे मूल्य त्याच्या बॅँ्रडवर अवलंबून असते. हॅँडगनचे तीन हजार राउंड 35124 ते 58678 रुपये, एसॉल्ट रायफलच्या .233-कॅलिबरच्या गोळ्यांचे तीन हजार राउंड 61332 ते 75278 रुपये आणि शॉटगनच्या 350 राउंडची किंमत 16727 पेक्षा अधिक आहे. होम्सने घेतलेल्या अ‍ॅम्युनिशनचे मूल्य 113166 ते 190699 दरम्यान असेल. दारूगोळा इंटरनेटच्या माध्यमातूनही खरेदी करता येतो. कंपन्या ग्राहकांना यूपीएस किंवा फेडएक्समार्फत रस्ता किंवा समुद्रामार्गे राउंड पाठवतात.
बाय एअर दारूगोळा पाठवण्यास परवानगी मिळत नाही. काही कंपन्या गोळ्यांची नव्याने निर्मिती करतात, तर काही रिसायकल करून गोळ्या तयार करतात. असे अ‍ॅम्युनिशन 50 टक्के स्वस्त असते.
या व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी 125470 रुपयांमध्ये लायसन्स मिळते. 27876 ते 55759 रुपयांमध्ये रिलोडिंग मशीन मिळते. वापरलेल्या गोळ्या सरकारी एजन्सीज, रायफल क्लबकडून जमा केल्या जाऊ शकतात.
माथेफिरू हल्लेखोरांना रोखणार कसे? - जॉन क्लाऊड
जेम्स होम्सने अत्यंत सावधपणे आणि कुशलतेने नरसंहार करण्याची योजना आखली होती. त्याने वेगवेगळ्या गन स्टोअर्समधून खरेदी केल्या होत्या. आपल्या ऑनलाइन खरेदीलाही त्याने सहकारी आणि शेजा-यांपासून लपवून ठेवले होते. त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. एसॉल्ट रायफल खरेदी करण्याचा त्याने पक्का निश्चय केला होता. यामुळे होम्स प्रकरणात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, सामूहिक हत्या करणा-यांना अशा प्रकारच्या घटना करण्यापूर्वीच रोखण्याचा कोणता मार्ग आहे का? अमेरिकी सिक्रेट सर्व्हिस आणि एफबीआयने घटना घडण्यापूर्वी सामूहिक हत्या करणा-या गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी एका प्रोजेक्टवर काम केले होते. या अध्ययनात 37 शाळांमध्ये हत्याकांड करणा-या 41 हल्लेखोरांवर प्रकाश टाकला गेला. अशा प्रकारच्या हत्या या भावनाविवश होऊन किंवा शत्रूंना धमकावण्यासाठी केल्या जात नाहीत. कॅलिफोर्निया विद्यापीठातील सॅन डिएगो येथील प्रोफेसर रीड मेलॉय यांच्या नेतृत्वाखाली मानसोपचारतज्ज्ञांच्या एका पथकाने सामूहिक हिंसेशी निगडित आणि व्यवहाराशी संबंधित कारणांवर संशोधन केले. यात काही कारणांवर प्रकाश टाकला गेला. गुन्हेगारी प्रवृत्ती- ज्यांचा इतिहास हिंसक आहे, तेच अशा प्रकारचा गुन्हा करतात. होम्सचा असा कोणताही इतिहास नाही.
अपमानित केल्याची भावना
* शाळेत गोळीबार करणा-या अधिकाधिक मुलांच्या मते त्यांना त्रास दिला जात होता. प्रौढ हल्लेखोरांच्या मते त्यांनाही प्रेयसीने धोका दिला किंवा नातेवाइकांनी लाथाडले होते किंवा त्यांना कामाच्या ठिकाणी अपमानित केले गेले.
* काही अन्य कारणेही समोर आली आहेत. जसे, हल्लेखोरांना काल्पनिक बाबींमध्ये रुची होती. होम्स व्हिडिओ गेम्स ‘एड लिबिटम’ खेळत असे.
* सामूहिक हत्या करणा-या इतर हल्लेखोरांच्या मानाने होम्सचे प्रोफाइल वेगळे आहे. अधिकाधिक हल्लेखोरांनी दिवसा गोळीबार केला होता. होम्सने आत्महत्या केली नाही. पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. याउलट दोनतृतीयांश हल्लेखोरांनी आत्महत्या केली किंवा त्यांना पोलिसांनी ठार केले. होम्सने यापूर्वी कधीही शस्त्रास्त्र खरेदी केले नव्हते. होम्स इतर हल्लेखोरांच्या तुलनेत अधिक धोकादायक होता, हे सांगण्याचे दाखले कमीच आहेत. त्यामुळे विकृत हल्लेखोरांना कोणतीही घटना करण्यापूर्वी रोखणे कठीण आहे.