आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणीबी यावं, टपली मारुनी जावं!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खेळीमेळी - प्रफुल्ल पटेलांच्या काळात फुटबॉलमध्ये भारत १७२ वा.
ब्राझील, अर्जेंटिना, जर्मनी, इटली नव्हे तर ग्वाम, तुर्कमेनिस्तान, ओमान असेही देश विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या प्राथमिक टप्प्यात भारताला खडे चारून जातात. ‘कुणीबी यावं, टपली मारुनी जावं’ अशा दुर्दशेतून जातोय प्रफुल्ल पटेल यांच्या कारकीर्दीतील भारतीय फुटबॉल.
जिथे दस्तुरखुद्द बराक ओबामा यांची सत्ता चालते अन्
जागतिक महासत्तेचे मालक असलेले बराक ओबामा जिथे राष्ट्राध्यक्षांच्या सिंहासनावर विराजमान होतात अशा भूप्रदेशाला भारतानं हरवलंय, चक्क हरवलंय! केवढे अभिमानाचे क्षण! ‘अच्छे दिन’ आल्याची अनुभूती ‘याचि देही याचि डोळा’ देणारे जल्लोषाचे क्षण! चला, ठेवणीतील शॅम्पेनच्या बाटल्या खोला. ‘इंडिया शायनिंग’चे प्रमोद महाजनांनी दाखवलेले स्वप्न साकार झालेय. दोन्ही हात उंचावत सहकाऱ्याच्या पाच बोटांवर आपल्या पाच बोटांच्या टाळ्या द्या!

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील अगदी प्राथमिक स्वरूपाच्या साखळी स्पर्धेत भारताने ज्या भूप्रदेशाला हरवलंय त्याचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाच जरूर आहेत. पण या भूखंडाचं क्षेत्रफळ आहे सुमारे २१० चौरस मैल. त्यात वस्तीला आहेत १,६१,७८५ अनामिक. या भूप्रदेशाचं नाव आहे ग्वाम. कधी कोणी एेकलेलं नसणार असं हे नाव. ग्वाम! पश्चिम पॅसिफिकमध्ये एक छोटासा ठिपका, असं हे चिमुकलं बेट. बराक ओबामा यांची महासत्ता यूएसए ऊर्फ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या छत्राखालचा भूभाग. ज्याचा दर्जा अधिकृत शब्दांत सांगायचा तर ‘अनइनकॉर्पोरेटेड टेरिटोरी ऑफ यूएसए.’

आशावादी जग ज्याला उगवती महासत्ता मानतं असा भारत व ग्वाम या फुटबॉलमधील प्रतिस्पर्ध्यांची तुलना करणे हास्यास्पदच. पण तशी वेळच आपल्यावर (याचि देही याचि डोळा) आलीय म्हणून करूया. लोकसंख्या भारताची १३० कोटी, तर ग्वामची १,६१,७५५. म्हणजेच भारतातील वस्ती ग्वामच्या आठ हजार पट! भारताचं क्षेत्रफळ तेहतीस लाख चौरस किलोमीटर्सचं, तर ग्वामचं ५४१. एकंदर राष्ट्रीय उत्पन्न, जीडीपी भारताचा १.८७७ ट्रिलियन डॉलर्स असताना ग्वामचा संसार ४.६ बिलियन डॉलर्सचा. पण असं हे ग्वाम महाकाय भारतीय फुटबॉल संघाच्या तोंडाला फेस आणत होतं! मायदेशीच्या सामन्यात २ विरुद्ध १ गोलने हादरवत होतं अन्् परतीच्या लढतीत बंगळुरूत ०-१ अशा किमान फरकानंच नतमस्तक होत होतं!
फुटबॉलमधील जाणकारांना ही मानहानी फारशी अनपेक्षित होती का? फिफा या जागतिक फुटबॉल संघटनेच्या रँकिंगमध्ये ग्वामने १९२ या तळाच्या क्रमांकावरून १५५ पर्यंत आगेकूच केलीय. याउलट १९९२-९६ दरम्यान १०० ते १०६ क्रमांकांत असणाऱ्या भारताची घसरगुंडी १७२ पर्यंत झालीय! आणि अतिसामान्य प्रतिस्पर्ध्याला हरवण्यासाठी आणि संपूर्ण वस्त्रहरणाचे संकट टाळण्यासाठी भारताला जिवाचा केवढा आटापिटा करावा लागला होता. ग्वामच्या भूमीवरील पराजयाची पुनरावृत्ती देशबांधवांसमोर होऊ नये यासाठी कर्णधार सुनील छेत्रीला भावनात्मक आवाहन करावं लागलं होतं. ‘आम्हाला पाठिंबा व प्रेरणा देण्यासाठी बंगळुरूतील कंटीरवा स्टेडियममध्ये हजारोंच्या संख्येनं या!’ छेत्रीला हुरूप द्यायला वीस हजारांवर प्रेक्षकांची गर्दी लोटली. भारतीय विजयास हातभार लावणारी एक बाब मात्र विचित्रच! सामन्याच्या आदल्या दिवशी त्यांच्या हॉटेलात पार्टीचा धुमाकूळ मध्यरात्रीनंतर चालूच राहिला. ग्वाम फुटबॉलपटूंच्या थकल्या-भागलेल्या शरीरांनाही झोप लागता लागेना. “नाइट क्लबमध्ये झोपू पाहण्यासारखा तो त्रासदायक अनुभव होता. हॉटेल व्यवस्थापनाला आम्ही विनवत राहिलो. पण पहाटे अडीचपर्यंत धिंगाणा चालूच होता. हॉटेलात बुकिंग करताना त्या पार्टीची कल्पना त्यांनाही नव्हती. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना सलग आठ-दहा तास झोप, सामन्याआधीच्या रात्री नाकारणे, हा कुठला पाहुणचार!

विश्वचषक स्पर्धेत एखाद्या देशातर्फे वा भूप्रदेशातर्फे खेळण्याबाबतचे फिफाचे नियम ग्वामच्या पथ्यावर पडले हे खरंच आहे. ज्यांचे आई-वडील वा आजी-आजोबा ग्वाममध्ये जन्मलेले आहेत अशा परदेशी जन्मलेल्यांना ग्वामतर्फे खेळता आले. (जसे त्यांना भारतातर्फेही खेळता आले असते!) ‘अमेरिकेतील ‘मेजर सॉकर लीग’मध्ये खेळणारे ७-८ फुटबॉलपटू ग्वामने खेळवले, असं भारताच्या पराभवानंतर सांगितलं गेलं. भारतानं आपली लाज राखण्यासाठी तसा खोटा प्रचार केला. ‘मेजर सॉकर लीग’ खेळणारा ग्वामचा एकमेव फुटबॉलपटू म्हणजे बचावपटू अल डेलागारझा. त्याची व त्याच्या एजंटची ग्वामने दोन वर्षे मनधरणी केली.

भारत, ग्वाम, तुर्कमेनिस्तान, ओमान व इराण या पाच देशांत, मायदेशी-परदेशी असे चार-चार, म्हणजे एकूण आठ-आठ सामने. यापैकी पहिल्या पाच सामन्यांत भारताची सलग पाचदा हार. याउलट ग्वामचे दोन जय, दोन हार व एक बरोबरी. पण त्यांना समस्या आर्थिक हलाखीची, हवाई प्रवासाची, पंचतारांकित हॉटेलची. अखेर ग्वाम सरकार त्यांच्या मदतीस धावून आलं.
पर्यटनासाठी ठेवलेल्या निधीतून चार लाख डॉलर्स (सुमारे पावणेतीन कोटी रु.) फुटबॉल संघाकडे वळवले गेले. फुटबॉलमुळे ग्वामला जगाच्या नकाशात स्थान मिळालंय असा त्यांचा गौरवही केला.

क्रिकेटच्या क्षेत्रात कसोटीत चौथं व झटपट कसोटीत दुसरं असं भारतीय रँकिंग दुसरे-चौथे रँकिंग हे ऐकायला बरं वाटतं, निदान बोचत नाही. पण इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व छोट्या धाव शर्यतीत जमैका सोडल्यास क्रीडा क्षेत्रातील प्रगत देश क्रिकेट खेळतच नाहीत. फुटबॉलमध्ये दोनशे देशांत भारताचं स्थान १०० ते १७२ मध्ये अडकलेलं. सरासरीतही भारताचा क्रमांक लागतो १३२ वा. कारण जगातील सारे प्रगत देश फुटबॉल खेळतात, एवढंच नव्हे तर आवर्जून खेळतात. अशी भलावण फुटबॉलमधील भारतीय दुर्दशेची करता येईल का?

विश्वचषक फुटबॉल प्राथमिक साखळीतील भारताच्या प्रतिस्पर्धी देशांची तुलना काय सांगते? लोकसंख्या : ग्वाम - दीड-पावणेदोन लाख, ओमान -३३ लाख, तुर्कमेनिस्तान - ५२ लाख, इराण - निदान आठ कोटी, भारत - १३० कोटी. पण दरडोई उत्पन्नात भारत मागे आहे. दरडोई उत्पन्न : भारत - १५०० डॉलर्स, ग्वाम - ३०५०, तुर्कमेनिस्तान - १४१७४, इराण - १६४६३ व ओमान चक्क ४४०६२. फुटबॉल रँकिंग : भारत - १७२, ग्वाम - १५५, तुर्कमेनिस्तान - १२१ ते १३२, ओमान - ८७ ते ९२, इराण - ४३ ते ४७. या पाच देशांत इराणच तगडा. या दुबळ्या गटातही भारत पाच देशांत पाचवा! ग्वाम, तुर्कमेनिस्तान, ओमान अशा कुणीबी यावं, टपली मारुनी जावं! भारत पोहोचलाय रसातळाला. प्रफुल्ल पटेल यांच्या भारतीय फुटबॉल संघटनेकडून अपेक्षा काय धरायची?