आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३००० धावा : मजा आली नाही!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
-खेळीमेळी - महान क्रिकेटपटू हार्वे म्हणतात, बॅटचा अाकार कमी करा!

करमणुकीस प्राधान्य देणारे जगभरचे संघटक, झटपट क्रिकेटसाठी पाटा खेळपट्ट्या मुद्दाम बनवून घेत आहेत. त्यातून फटकेबाजी चुरसहीन व नि:सत्त्व अन् क्रिकेट निरर्थक बनत आहे.

पाच झटपट सामन्यांच्या मालिकेत जवळपास पाचशे षटकांत तीन हजारांवर, म्हणजे ३१२९ धावांचा धबधबा, प्रत्येक सामन्यात तोच झंझावाती वर्षाव. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या तीनशे वा अधिक धावा आणि प्रतिपक्षाची लढत त्यांना भिडणारी व पार करणारी. संघटकांनी प्रेक्षकांना आणखी कोणता नजराणा पेश करावयाचा बाकी ठेवला?

जवळपास अडीचशे-अडीचशे षटकांच्या फलंदाजीत यजमान ऑस्ट्रेलियनांचे बावीस षटकार, तर भारतीयांनी खेचले सवाई २९ षटकार. कांगारूंनी ही उणीव भरून काढली. चौकारांच्या सरसतेत भारत १२७, तर कांगारूंचे त्यापेक्षा जादा चार चौके! भारताकडून रोहित शर्मा व विराट कोहली (२-२), शिखर धवन व मयूर पांडे यांची सहा शतके फलकावर, तर ऑस्ट्रेलियाचे स्मिथ, बेली, फिंच, वॉर्नर व मिच मार्श असे पाच वेगवेगळे शतकवीर. मुख्य म्हणजे पहिल्या चारही सामन्यांत यजमानांची फत्ते : प्रेक्षक त्यावर खुश का नसावेत, असा संघटकांचा समज…

खेळांना अधिकाधिक करमणूकप्रधान करावं, त्यामुळे प्रेक्षक आपल्याला जोडलेले राहतील अन् गल्ला काठोकाठ भरत राहील, हाच संघटकांचा हिशेब. त्यासाठी खटाटोप पाटा खेळपट्ट्यांचा. म्हणजे ज्यांवर चेंडू उसळणार नाही, फिरणार नाही, याची दक्षता योजनाबद्ध घेतलेली. क्रिकेट बघायला लोटणाऱ्या जनसमुदायांना काय हवं असतं? गोलंदाजी वा क्षेत्ररक्षण बघायला प्रेक्षक थोडेच येतात? त्यांना पोटभर बघायची असते फलंदाजी आणि हो, अर्थातच यजमान संघाची विजयमालिका. बस्स! मग प्रेक्षक नावाचा मोगॅम्बो खुश!

पण ‘मोगॅम्बो खुश हुआ’, असे घडलंय का? रसिकांना वाटतंय की हे सारं क्रिकेट अळणी होतं. भोजन-थाळी पंचपक्वान्नांनी भरगच्च, पण तरीही अळणी, अगदी बेचव. त्यात ना मिर्च-मसाला, ना फोडणी, ना खमंगपणा. चौकार-षटकार इतके स्वस्त केलेले की, त्यातला थरार काढून घेतलेला. मालिकेत रोहित शर्माच्या ४३४ चेंडूंत ४४१, सरासरी ११०. कोहली ३८३ चेंडूंत ३८१, सरासरी ७७. धवन ३८३ चेंडूंत २८७, सरासरी ५७. राहाणे १३८ चेंडूंत १४१, सरासरी ४७. धोनीच्या वाट्यास अवघे ७७ चेंडू, त्याच्या १७ सरासरीने ८६ धावा. पण या धावा स्टार्क, सिडल, कमिन्स व पहिली कसोटी वगळता हेझलवूड यांच्या गैरहजेरीत. अन् चेंडू उसळू न देणाऱ्या खेळपट्ट्यांवर. या साऱ्यांच्या धावांचा बँक-बॅलन्स फुगला, पण त्यांचं असली मोल काय? त्यापेक्षा नजर ठेवूया, डावरा स्रार व बुमरा या जलद जोडीच्या वाटचालीवर!

कोणत्याही खेळाडूचे वा संघाचे नाव न घेता, ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू नील हार्वे यांनी खेळपट्ट्यांवर टीकेची झोड उठवलीय. ‘बॅट व चेंडू यातील संघर्ष हा क्रिकेटचा आत्मा. पण इथे तर गोलंदाजांचा चेंदामेंदा केला गेला! हे क्रिकेट साफ निरर्थकच. सिडनी माझे गाव. पण आता सिडनीतील पाचव्या झटपट सामन्यावर मी बहिष्कार टाकणार आहे. माझ्याच्यानं असलं क्रिकेट बघवत नाही!’

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती हे सारं नुसतं बघत राहणार आहे का? नील हार्वे यांनी कडक उपाय सुचवलाय. बॅटचा आकारच कमी केला पाहिजे!

यावर आजची पिढी स्वाभाविकपणे विचारेल. हे नील हर्वे कोण? हा प्रश्न विचारण्यात त्यांचा कोणताच दोष नाही. नील हार्वे आज आहेत ८७ वर्षांचे. त्यांचा कालखंड १९४७-६३. पंधरा वर्षांत कसोटीत सहा हजारांवर धावा काढताना त्यांनी एकवीस शतकं झळकवली होती. डॉन ब्रॅडमन यांच्या १९४८ मधील अपराजित संघातील, आज हयात असलेले ते एकमेव खेळाडू. मॉरिस, बार्न्स, हॅसेट, मिलर, लिंडवॉल, जॉनस्टन, टॅलन आदी महान खेळाडूंचे सहकारी.

भारत-ऑस्ट्रेलिया झटपट मालिकेतील क्रिकेट ज्यांना ‘निरर्थक व संघर्षहीन आणि क्रिकेटचा आत्मा गमावणारा’ वाटले, त्या नील हार्वे यांची जडणघडण कशी झाली ती समजावून घेऊया.
१९४८च्या इंग्लंड दौऱ्यातील सुरुवातीच्या काही सामन्यात, १९ वर्षीय नील हार्वेच्या फारशा धावा होत नव्हत्या. त्याने ब्रॅडमनचा सल्ला घेतला. ‘हे बघ, चेंडू जमिनीलगत खेळ, उंचावरून मारू नकोस’, त्याला व्यावहारिक शिकवण मिळाली. ‘क्रिकेटमध्ये सर्वाधिक खेळाडू ना त्रिफळाचीत होतात, ना पायचीत, ते होत असतात झेलबाद. म्हणून झेल द्यायचं टाळ!’

त्या दौऱ्यात त्याला संधी दिली गेली चौथ्या कसोटीत. इंग्लंडच्या सुमारे पाचशे धावा. पण ऑस्ट्रेलियाचे ब्रॅडमन, हॅसेट व मॉरिस ६७ धावांत बाद. अशा परिस्थितीत कोवळ्या हार्वेला सांभाळण्यास पुढे आला, त्याचा ज्येष्ठ जोडीदार किथ मिलर. पहिली चार-पाच षटकं बहुतांशी स्वत: खेळून काढली. मग नीलच्या बॅटचा पट्टा सुरू झाला. त्याची झेप संस्मरणीय ११२ वर!
क्रिकेट खेळ आहे सांघिक व संघर्षपूर्ण. ब्रॅडमन-मिलर आदी ज्येष्ठ व महान सहकाऱ्यांनी आपल्याला सांभाळून घेतलं, ते संस्कार नीलवर खोल रुजले होते. रिची बेनॉसारख्या उगवत्या व प्रतिभावान व्यक्तिमत्त्वासाठी त्याने योग्य वेळी मदतीचे हात पुढे केले.

ही गोष्ट १९५८-५९ ची. कांगारू कर्णधार इयन क्रेग, हेपटायटिसच्या त्रासाने संघाबाहेर फेकला गेलेला. नेतृत्वाची स्पर्धा हार्वे-रिची बेनॉ यांच्यात. पाहुण्या इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीआधीच्या सामन्यात नेतृत्व दिलं गेलं हार्वेकडे. गोलंदाजीच्या ओघात सिडनीच्या खेळपट्टीवर फ्रेडी ट्रूमनचे बुटांचे ठसे उमटत गेले! त्यामुळे खराब झालेल्या खेळपट्टीवर टोनी लॉकने, नील हार्वेच्या संघाला दोन्हीही डावांत गुंडाळले. साहजिकच ऑस्ट्रेलियन निवड समितीने कसोटी मालिकेसाठी हार्वेस बाजूस सारून बेनॉला निवडलं. पण बेनॉचे सर्वप्रथम अभिनंदन करण्यास सरसावला हार्वे. बेनॉला त्यानं सतत सहकार्य व मार्गदर्शन दिले. आयुष्यभर क्रिकेटची मूल्यं जोपासणारे, वयोवृद्ध नील हार्वे जगभरच्या क्रिकेट संघटकांना सावध करत आहेत. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याच्या गल्लाभरू नशेत फलंदाजी नि:सत्त्व करू नका. संघर्षमय क्रिकेट चुरसहीन करू नका!