आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चूक मेसीपेक्षा भक्तगणांची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमुच्या देवाला चक्क सतरा कोटी रुपयांचा दंड होऊ शकतोच कसा? त्यावर कडी म्हणजे, अमुच्या दैवताला एकवीस महिने तुरुंगवासाची शिक्षा दिली जाऊ शकतेच कशी? त्यासह आमच्या भगवानाच्या जन्मदात्या जॉर्ज मेसी यांनाही एकवीस महिने जेलची हवा अन् बारा कोटी रुपयांचा दंड लावला जाऊ शकतोच कसा? असे प्रश्न लिओ मेसीचे असंख्य भाबडे भक्त एकमेकांस विचारत आहेत.

असामान्य यशानंतर जिवावर वर्मी घाव घालणारं अपयश, अन् महालौकिकापाठोपाठ बदनामी यांच्या फेऱ्यांच्या चक्रातून जावे लागलेच मेसीला. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पाचव्यांदा बहुमान, पण त्यानंतर `कोपा’ अमेरिकेच्या अंतिम फेरीत पेनल्टी वाया दवडण्याची महाचूक व विजेतेपद हुकल्याचा वर्मी घाव अन् आता २००७-९ या दोन वर्षांत आपल्या छबीच्या जाहिरातीतून कमावलेल्या ३१ कोटी रुपयांवरील कर बुडवल्याबद्दल मेसीला सतरा कोटींचा व वडिलांना १२ कोटींचा दंड व दोघांनाही २१ महिने जेलची कोठडी अशी शिक्षा.
आपले आर्थिक व्यवहार माझे वडील बघत आले आहेत. फुटबॉल खेळण्यावर मुलाने, लिओ मेसीने सारे लक्ष केंद्रित करावे, यासाठी पिता-पुत्रांची ही आखणी. स्पेनच्या न्यायालयाने मेसीचा हा बचाव फेटाळून लावला. शासनाचे वकील मारीओ माझा यांनी तर त्यांची खिल्ली उडवली. ‘अज्ञानाचा मेसीचा दावा निराधार आहे. खोटारडा (फ्रॉड) आहे. त्याला कर भरायची इच्छा नव्हती. तपशिलाची माहिती करूनच घ्यायची नव्हती. महाराज, हा प्रकार गुन्ह्यासारखाच आहे.’ या वकिलाशी सहमत होणाऱ्या न्यायमूर्तींनी सुनावलं. ‘आपली छबी (‘इमेज राइटस्’) कशी विकली जात आहे, ते समजून घेण्याची भरपूर संधी मेसीला उपलब्ध होती, पण त्याबाबत अज्ञानात राहणं त्यानं (जाणूनबुजून) पसंत केलं.’
इथं हेही लक्षात घेतलं पाहिजे की, करचुकवेगिरीबद्दल शिक्षा भोगणारा मेसी ना पहिला, ना शेवटचा खेळाडू. त्याचा सहकारी व अर्जेंटिनाचा माजी कप्तान झेविअर मॅसचेरानो याने २०११ व १२ मध्ये असाच गुन्हा केल्याबद्दल वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षा ओढवून घेतली होती. स्पॅनिश कायद्यानुसार वर्तन गुन्हेगारी स्वरूपाचे नसल्यास आणि गुन्हा पहिलाच असल्यास अन् शिक्षा दोन वर्षांपेक्षा कमी कारावासाची असल्यास तिची अंमलबजावणी होत नाही. ‘निलंबित’ (सस्पेंडेड) अवस्थेत शिक्षा असते. ब्राझीलचा कर्णधार व बार्सिलोना क्लबचाच सितारा नेमार याच्या ट्रान्सफर फीची चौकशी चालूच आहे. तसेच आद्रिआनोचे ही व्यवहार तपासले जात आहेत.
प्रमुख फुटबॉलपटू करचुकवेगिरीकडे का वळतात, ते आता पाहू या. युरोपमधील बऱ्याच देशांत व्यावसायिक पातळीवर साखळी (लीग) स्पर्धा होत असतात. अशा व्यावसायिक स्पर्धांत खेळणाऱ्या फुटबॉलपटूंना आपल्या (भरघोस) उत्पन्नावर किती टक्के कर भरावा लागतो?
मँचेस्टर युनायटेड, अार्सेनल, चेल्सी आदी बड्या क्लबची इंग्लिश प्रीमियर लीग (पीएल ऊर्फ ) आणि झिनेदीन झिदानच्या फ्रान्समधील लीग यात उत्पन्नातील पंचेचाळीस टक्के रक्कम कर म्हणून कापली जाते! इटलीत सेहेचाळीस टक्के, जर्मनीत अठ्ठेचाळीस टक्के तर बार्सिलोना-रियाल माद्रिद-अॅटलेटिको यांच्या स्पेनमध्ये तर बावन्न टक्के! लिओ मेसीने फुटबॉलमधील लाजबाब कौशल्यावर अफाट कमाई जरूर केली. जगातील अतिश्रीमंत दहा खेळाडूंत त्याची गणना होते. २०१६ च्या पूर्वार्धातील त्याची कमाई किती असावी? बार्सिलोना क्लबच्या पगारातून दोन कोटी डॉलर्स, जाहिरातीतून २.१ कोटी डॉलर्स. एकूण ४.१३ कोटी डॉलर्स, म्हणजेच सुमारे पावणे तीनशे कोटी रुपये. कोट्यवधी लोकांना भुरळ घालणाऱ्या व खेळाचा निरागस आनंद दिल्याचे फलित काय? तर त्यातील निम्म्यापेक्षा अधिक रक्कम सरकारी तिजोरीच्या हवाली करायची?
अशा कर-आकारणीचे समर्थन काही अर्थशास्त्र तज्ज्ञ करतात. थॉमस पिके टी हे फ्रेंच पंडित भांडवलशाहीचे पुरस्कर्ते, पण जागतिकीकरणातून आर्थिक विषमता वाढत जातेय, आणि भांडवलशाहीने स्वसंरक्षणार्थ ही विषमता कमी करावी असं त्यांना वाटतं. एरवीही युरोपमध्ये लोकशाही समाजवादाची चळवळ नेहमीच प्रबळ राहिलेली आहे. त्या दबावातून ही कर आकारणीची ही आखणी झाली असणार. कर आकारणीचा उंचावणारा तक्ता, सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून समजला जाऊ शकतो, पण मेसी आणि त्याच्या खालोखाल नेमार व मॅसचेरानो यांना आपल्या कमाईला लागलेली बावन्न टक्के कात्री टाळण्याचा मोह झाला, तर तेही समजू शकतो. सामान्य माणूसही आपल्या छोट्याशा उत्पन्नात, करमुक्त बाबींचा बोध सर्वप्रथम घेत नाही का?
मेसीने त्याच्या वडिलांनी चूकच नव्हे तर घोडचूक केली आहे. मैदानात लोकांपुढे आदर्श ठेवणारा मेसी, मैदानाबाहेरील व्यवहारात आदर्शवत राहण्यात कमी पडला आहे. तरीही मेसीच्या चुकीपेक्षा त्याच्या भक्तगणांची चूक मोठी आहे. क्रीडा, नाटक, सिनेमा, शिक्षण, संशोधन, बहादुरी इ. कोणत्याही एका क्षेत्रातील महानतेला सलाम करूया, पण त्या हीरोच्या सबंध व्यक्तिमत्त्वावर ते मोठेपण चिकटवू नका. माणसालाच काय, पण देवालाही देव्हाऱ्यात बसवू नका, असं कवी केशवसुत सांगतात. ‘देव-दानवा नरे निर्मिले हे मत लोकां कळवू द्या!
बातम्या आणखी आहेत...