आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्यानात दुसरी तलवार नको!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वर्षभरात विराट-कुंबळे यांच्या संघांनी न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश व ऑस्ट्रेलिया यांना भारतात अन् विंडीजला विंडीजमध्ये कसोटी मालिकांत लीलया हरवलं. चॅम्पियन्स करंडकात भारत विजेता नव्हे, तरी उपविजेता ठरला. तरीही विराटला कुंबळे नकोसाच होता. हा मामला आहे तरी काय?
 
सारं सारं कसं अंदाजानुसार घडत गेलं. प्रभावशाली कप्तान विराट कोहलीला आपण नको आणि यशस्वी संघनायकाच्या तालावर नाचण्यातच आपलं हित आहे, हे जाणणारे व्यवहार-चतुर शिलेदार, सैनिक व सपोर्ट स्टाफ यांनाही आपण नकोसे झालोय. अशा परिस्थितीत आपली हकालपट्टी होण्याआधीच प्रशिक्षकपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा मार्ग गुरू अनिल कुंबळेनी सुज्ञपणे स्वीकारला आणि ज्यांची जागा आपण वर्षभरापुरती (आणि वर्षभरापुरतीच!) घेतली, त्या रवी शास्त्रींसाठी त्यांची जुनी खुर्ची खाली करून दिली. 
 
सारं सारं कसं, अंदाजानुसार घडत गेलं. त्रिसदस्य क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य सचिन तेंडुलकरने रवी शास्त्रींनाच प्रशिक्षकपदावर कायम ठेवण्याचा आग्रह धरला होता. आताही त्याचं मत रवी शास्त्रींनाच होतं. पण शास्त्रींना काढून कुंबळेंना आणण्यात दादा उर्फ सौरभ गांगुलीचा पुढाकार होता. व्ही. व्ही. एस. लक्ष्मणची साथ त्यात मिळवली. आता कुंबळे ‘आपणहून’ शर्यतीबाहेर गेलेले अन् दादाला शास्त्रींसाठी नवा यशस्वी पर्याय शोधूनही सापडत नव्हता. लक्ष्मण आता शास्त्रींकडे झुकलेला. म्हणून दादा अपेक्षित खेळी खेळला, ती वेळकाढूपणाची! विराट सध्या अमेरिकेच्या सहलीवर आहे. या महत्त्वपूर्ण विषयावर निर्णय घेण्याआधी त्याची प्रत्यक्ष भेटगाठ होणं आवश्यक आहे, असं सांगत त्यानं हा निर्णय (बेमुदत) पुढे ढकलण्याची घोषणा मुंबईतील पत्रकार परिषदेत केली. ही गोष्ट सोमवार, १० जुलैच्या संध्याकाळची. 
 
पण त्याच पत्रकार परिषदेत दादाला मनातली खास बात मनात ठेवता आली नाही! तो बोलून गेला, ‘आम्ही म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची त्रिसदस्यीय समिती, विराटला समजावून सांगू की : प्रशिक्षकांना विशिष्ट पद्धतीनं वागावं लागतं! आम्ही याची खात्री करून घेऊ की, सारे जण (म्हणजे मुख्यत: कर्णधार व प्रशिक्षक) यांचे विचार व दिशा एकच एक आहे!’
या सुभाषिताचा मथितार्थ विराटला समजला नसेल, असं दादाला वाटलं असेल, तर आश्चर्यच म्हणावं लागेल. विराटची प्रतिक्रियाही अंदाजानुसार झाली. आक्रमणाला प्रति आक्रमण, हा कोहलीचा स्वभाव. कोणी खोडी काढली, तर लगेच प्रति-खोडी काढण्याचा खट्याळपणा त्याच्यात भरपूर, बहुधा त्यानं न्याय मागितला दादाच्या बॉसकडे, विनोद राय यांच्याकडे. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीचे प्रमुख आधारस्तंभ विनोद राय यांच्याकडे. तीही गोष्ट कशी अपेक्षेनुसार, अंदाजानुसारच. मग राय यांनी मंडळाला स्पष्ट समज दिली की, ‘भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर निघण्याच्या तयारीत आहे. संघाच्या प्रशिक्षकाची निवड पुढे ढकलू नका, मंगळवारी सायंकाळपर्यंत जाहीर करा!’ 
 
शास्त्री प्रशिक्षक नेमले गेल्याच्या बातम्या दुपारीच देण्यात, टीव्ही चॅनल्समध्ये चढाओढ लागली. मंडळाचे प्रभारी चिटणीस अमिताभ चौधरींचा त्यावर खुलासा : ‘सल्लागार समितीत त्याबाबत एकमत झालेलं नाहीय. अंतिम निर्णय अजून झालेला नाही.’ 
 
दादा गांगुलींचे पत्रकारांकडे मत प्रदर्शन : ‘विनोद राय आहेत आदरणीय. आम्हाला आदेश देण्याचा अधिकार त्यांना जरूर आहे. आम्ही त्यांच्याशी बोलू. विराट अमेरिकेच्या सहलीवर असताना, त्याला आज ‘डिस्टर्ब’ करणं मला योग्य वाटत नव्हतं. म्हणून आम्हाला त्याची वाट बघावी लागतेय!’ 
 
अधिक चर्चेची गरज आहे, असा दावा गांगुली रात्री ९ पर्यंत कोलकात्यात करत राहिला. पण त्यानंतर जेमतेम तासाभरातच मंडळाचे प्रभारी अध्यक्ष, दिल्लीचे खन्ना यांनी चर्चेवर पडदा टाकला. ‘चर्चा प्रक्रिया पूर्ण झालीय. रवी शास्त्री दोन वर्षांसाठी प्रशिक्षक असतील.’ मग सांगितलं गेलं की झहीर खान असेल गोलंदाजीसाठी खास गुरू आणि परदेशी दौऱ्यांपुरते फलंदाजीकरिता विशेष सल्लागार असतील राहुल द्रविड. 
सारं सारं अंदाजानुसार, रवी शास्त्रीचे प्रशिक्षकपदी पुनरागमन, एका म्यानात विराट व कुंबळे अशा दोन तलवारी नसणार. रवी शास्त्रींबाबत दादा गांगुलींचा निर्णय जास्तीत जास्त लांबवण्याची, शास्त्रीला सर्वसंमत (म्हणजे निदान व्ही. व्ही. एस. लक्ष्मणची साथ मिळवून) पर्याय शोधण्याची खटपट-धडपड, ही अंदाजानुसार. 
 
त्यामुळेच प्रश्न निर्माण होतो : विराटला शास्त्री व शास्त्रीच का हवाय? आणि गांगुलीला नेमका शास्त्री व शास्त्रीच का नकोय? 
कप्तान विराटचं व प्रशिक्षक कुंबळेचं जमत नव्हतं - ते नेमकं कशावरून? 
क्रिकेटच्या दुनियेस वाद नवे नाहीत. पण बऱ्याच वादांची, तंटे-बखेड्यांची कारणं स्पष्ट होती. आपल्याविषयीचं मत, संघनायक गांगुलीने गुरू ग्रेग चॅपलकडे मागून घेतलं. तेव्हा चॅपल स्पष्ट म्हणाले, ‘तू फिट नाहीस. तू कर्णधार आहेस म्हणून संघात आहेस.’ पन्नास षटकांच्या खेळात सचिन सलामीला जाण्यास उत्सुक, पण चॅपल म्हणाले, ‘युयुत्सू सचिनच्या बॅटमधला थरार आज तुझ्यात राहिलेला नाही. तुझा आता चौथा क्रमांक.’ मागाहून चॅपलना वाटलं की, सचिनबाबत त्यांचं चुकलं, पण दरम्यान सौरभ-सचिन यांनी त्यांच्याविरुद्ध आघाडी उघडलेली. २००७च्या विश्वचषकातील मानहानीनंतर त्यांनाच जावं लागलं! 
मायकल क्लार्कच्या कांगारूंचा मार्गदर्शक मिकी आर्थर. भारताच्या फसलेल्या २०१२च्या दौऱ्यात तो खेळाडूंना होमवर्क द्यायचा. आपण कुठे कमी पडतोय व त्यावर उपाय काय, ते लिहायला लावायचा. त्याला नकार देणाऱ्या चौघांना सस्पेंड केलं गेलं, त्यात शेन वॉटसनसारखा स्फोटक अष्टपैलू होता, ते आठवतं? तेव्हा लगेच नव्हे, पण सहा महिन्यांनी अॅशेस मालिक गमावल्यावर आर्थरची उचलबांगडी झाली. 
 
इंग्लंडचा शैलीदार नेता केविन पीटरसन व प्रशिक्षक पीटर मूर्स यांच्यात बेबनावही असाच जगजाहीर. ‘एक तर मला घ्या किंवा त्याला’ अशी टोकाची भाषा पीटरसनने वापरली. आठवडाभरातच मूर्सची हकालपट्टी झाली, पण पीटरसनलाही नेतृत्व सोडावं लागलं होतं!  
असे हे सारे आगलावे वाद : ज्यात ग्रेग चॅपल, मिकी आर्थर व पीटर मूर्स या प्रशिक्षकांसह संघनायक पीटरसनचीही आहुती दिली गेली. पण या साऱ्या प्रकरणात वादाचे, मतभेदांचे विषय स्पष्ट होते. पण विराट-कुंबळे वादाची कारणं कुठे बाहेर आली आहेत? पण मामला आहे तरी काय? 
 
भारतीय मंडळाचे माजी चिटणीस, पुण्याचे अजय शिर्के याबाबत थोडा प्रकाश टाकतात. ‘शास्त्रीऐवजी कुंबळेची प्रशिक्षकपदी निवड करण्यास विराटचा सुरुवातीपासून विरोध होता. म्हणूनच कुंबळेला एक वर्षापुरतं करारबद्ध केलं गेलं. कोहलीला त्याबाबत समजावलं गेलं. वर्षभरानंतर (ही जोडी कशी, कितपत जमतेय याचा आढावा घेऊन), कराराचा नव्यानं विचार करता येईल. असंच एक वर्षाच्या कराराचं खरं कारण असावं.’ आश्चर्य म्हणजे त्यानंतरच्या गेल्या वर्षात, एकाही व्यवस्थापकीय अहवालात या वादाची दखल घेतली गेली नाही. 
 
याचाच खरा अर्थ असा की : कोहलीला मान्य असलेला, हा एका व एकाच वर्षापुरता तह होता. ते वर्ष संपेपर्यंत आपल्या म्यानात दुसरी तलवार ठेवण्यास विराट राजी होता. 
या वर्षभरात विराट-कुंबळे यांच्या संघांनी न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश व ऑस्ट्रेलिया यांना भारतात अन् विंडीजला विंडीजमध्ये कसोटी मालिकांत लीलया हरवलं. चॅम्पियन्स करंडकात भारत विजेता नव्हे, तरी उपविजेता ठरला. तरीही विराटला कुंबळे नकोसाच होता. हा मामला आहे तरी काय? 
विराट-शास्त्री जोडी जरूर जमावी. पण विराट-कुंबळे जोडी नेमकी कशामुळे जमली नाही, तेही स्पष्ट व्हावं. मतभेदात अहंगंड किती, डावपेचांचे व हितसंबंधांचे मुद्दे किती हे स्पष्ट व्हायलाच हवं, त्यातच भारतीय क्रिकेटचं हित आहे.
बातम्या आणखी आहेत...