आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला, जग जिंकूया... विना विश्वचषक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘जग जिंकूया’ची गोष्टच सोडा, आजवर जगातील निवडक १२ वा, १६ वा, २४ वा ३२ संघांच्या कोणत्याही फिफा विश्वचषकात, वयोगट तसेच पुरुष-महिला अशा सहाही विश्वचषकांत भारत प्रवेशपात्र ठरलेला नाही. आता भारताला एका स्पर्धेचं यजमानपद बहाल केलं, तसेच स्पर्धेसाठी सुमारे ११० कोटी रुपयांची तरतूद केलीय फिफानं. फुटबॉलमधील असंघटित, अविकसित देशांपर्यंत खेळाचं लोण पोहोचवण्याची फिफाची वृत्तीही उमदी आहे.

‘चला, जग जिंकूया!’ ही घोषणा आठवते ना? प्रामुख्याने टीव्ही चॅनल्ससह सर्वच भारतीय-इंग्रजी प्रसारमाध्यमांचा हा आवडता नारा. अगदी परवलीचा शब्दच म्हणा! विश्वचषकाची किंवा ‘विश्व’चषकाची चाहूल लागली रे लागली की एक तुफानी हवा निर्माण केली जाते. त्यालाच आगाऊ जयघोष म्हणा किंवा हाइप म्हणा. साऱ्या देशाला चेतवलं जातं. ‘चला जग जिंकूया! ’ 
जणू काय जगज्जेतेपद अगदी चार बोटांवर आलेलं आहे! 

मग तो ‘विश्व’चषक कबड्डीचा असला तरी हरकत नाही. कबड्डीच्या त्या तथाकथित ‘विश्व’चषकात युरोप-अमेरिका-आफ्रिका-ओशनिया या चार खंडांतील संघ नसले तरी बिघडत नाही. आशिया खंडाच्या ४४ देशांपैकी भारतासह इराण, द. कोरिया, थायलंड व बांगलादेश हेच खरेखुरे संघ असले तरी बेहत्तर! आवाज घुमवला जातो एकच एक : ‘चला, जग जिंकूया!’ 

क्रिकेटसाठीही ‘विश्व’चषक हे बिरुद फसवंच. १९७५ पासून गेल्या ४२ वर्षांत ११ वा फड भरवला गेला, पण तो सदैव चौकटीत राहिला. ब्रिटिश राष्ट्रकुलातील सुमारे २० देशांच्या मर्यादेत. प्रत्यक्षात तो राष्ट्रकुल चषकच. पण त्याचा आव, त्याचा बडेजाव ‘विश्व’चषकाचा! भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात, त्याचा जयघोष कर्कश. वेळप्रसंगी यात्रा-शोभायात्रा काढून चाहत्यांना साद, ‘चला, जग जिंकूया’चीच! 

मग आत्ताही, असाच एक, आणखी एक विश्वचषक, उद््घाटनाच्या उंबरठ्यावर आहे भपकेबाज व निरर्थक, अगदी कलमाडीछाप. भव्य-दिव्य सोहळ्यावर करोडो रुपये उधळू नका, असा सल्ला, ‘फिफा’ या जागतिक संघटनेने दिला आहे. त्यामुळे फुटबॉलमधील कलमाडी अन् भारतीय फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, कुणी सांगावं, हात आखडता घेतीलही! पण या वेळी कोणी-कोणीही आवाज घुमवत नाहीए, ‘चल जग जिंकूया’चा. आणि हेच वेगळेपण आहे, उद्या शुक्रवार सहा ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या, १७ व्या १७ वर्षांखालील फिफा विश्वचषकाचं. असली व नकली विश्वचषकातील प्रचंड तफावतीचं. २१२ संलग्न देशांमुळे पंचखंडातील खडतर स्पर्धेच्या कसोटीचं. ऑलिम्पिकसारख्या अस्सल जगद्व्यापी चुरशीचं व कसोटीचं! 

अशा या खणखणीत विश्वचषकाच्या अंतिम टप्प्यात उतरण्याची संधी भारताने एकदाची कशी मिरवलीय? 
वर्षाआड, पहिल्या ११ स्पर्धा झाल्या १६ वयोगटांसाठी. पण २००७ पासून वयोमर्यादा १६ वरून १७ वर गेली. फिफा विश्वचषकाप्रमाणे १७ व २० वयोगटातील मुलांच्या स्पर्धात १६ ऐवजी २४ संघांना स्थान दिलंय व स्पर्धा व्यापक केली. स्पर्धक संघांचा खंडनिहाय कोटा वेळोवेळी निश्चित केला जातो. युरोपचा कोटा सहावरून पाचवर आणला गेला, तर ओशनियातून एकाऐवजी दोन संघ प्रवेशपात्र ठरवले गेले. आशिया, आफ्रिका, द. अमेरिका, मध्य व उत्तर अमेरिका व कॅरेबियन्स यांचा कोटा प्रत्येकी चारचा. यापैकी आशियातून या वेळी इराक, इराण, जपान अन् उ. कोरिया. पण त्यांसह भारत. केवळ स्पर्धेच्या यजमान या नात्यानं, म्हणजे कर्तृत्वाच्या व कामगिरीच्या आधारे हक्काने नव्हे, तर ‘फिफा’च्या मेहेरबानीमुळे! 

‘जग जिंकूया’ची गोष्टच सोडा आजवर जगातील निवडक १२ वा, १६ वा, २४ वा ३२ संघांच्या कोणत्याही फिफा विश्वचषकात, वयोगट तसेच पुरुष-महिला अशा सहाही विश्वचषकांत भारत प्रवेशपात्र ठरलेला नाही. आता भारताला एका स्पर्धेचं यजमानपद बहाल केलं, तसेच स्पर्धेसाठी सुमारे ११० कोटी रुपयांची तरतूद केलीय फिफानं. फुटबॉलमधील असंघटित, अविकसित देशांपर्यंत खेळाचं लोण पोहोचवण्याची फिफाची वृत्तीही उमदी आहे. हजारो कोटी डॉलर्सची उलाढाल करणारी फिफा, भ्रष्टाचार रोखू शकली नाही, हीही कटू वस्तुस्थितीच. पण जागतिक पातळीवरील विकासाचे फिफाचे उपक्रम मात्र स्तुत्यच. 

डबक्यातून, नदीतून एकदम अथांग सागरात भारत प्रथमच उडी घेतोय. कवी कुसुमाग्रजांच्या अजरामर अशा ‘कोलंबसाचे गर्वगीतां’तील दर्यावर्दी, सागराला हिणवतो : ‘अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला!’ त्याच रुबाबात पेलेचा ब्राझील, मॅराडाेना व मेस्सीचा अर्जेंटिना, बेकेनबॉरचा जर्मनी, ‘चला जग जिंकूया!’ च्या ओघात ‘किनारा तुला पामराला’, असं फिफा विश्वचषकाच्या अफाटतेला, अथांगतेला म्हणू शकतो. कदाचित, इटली, स्पेन, इंग्लंड व उरुग्वे हे विश्वचषक विजेतेही तोच सूर लावू शकतील, पण भारत? तूर्त अन् बराच काळ अजिबात नाही! 

क्रिकेट व त्यापेक्षाही कबड्डीतील विश्वचषकाबाबत, ‘दूध का दूध, अन् पानी का पानी,’ करून जातोय, फिफाचा १७ वर्षांखालील विश्वचषक. साहजिकच नदी-नाल्यातून दऱ्यांत उतरताना, पोर्तुगालसारख्या फुटबॉलवेड्या देशातील भारतीय प्रशिक्षक लुई नॉरट्स डी गॅतोस हिशेब मांडतात : “प्राथमिक ‘अ’ गटवार साखळीतील आमचे प्रतिस्पर्धी, अमेरिका, कोलंबिया व घाना यांना सामोरे जाताना आम्ही भारतीय, फेव्हरिट्स वा विजयाचे दावेदार असणार नाही. पण खेळाच्या मैदानात काहीही घडू शकतं. भारतीय यशाची शक्यता अल्प-स्वल्प, िकमान पाच-दहा टक्के वा अगदी वीस टक्केही असेलच. त्या शक्यतेच्या आधारावर आम्ही किल्ला लढवू!”  

विश्वचषकात स्थान मिळालं, ठीक आहे. पण या स्पर्धेतील इतर संघ, विशेषत: युरोपीय संघ कसे तय्यार असतात, याकडे गॅतोस, भारतीयांचे लक्ष वेधतात. युरोपीय शाळकरी पोरं, वयाच्या सहाव्या वर्षापासून फुटबॉल खेळतात याचा अर्थ असा की, १७ वर्षांखालील स्पर्धांत उतरताना त्यांच्या पाठी असतो तब्बल दहा-अकरा वर्षांचा अनुभव. भारतीय युवा संघाच्या प्रशिक्षणाची जबाबदारी गॅतोसनी स्वीकारली, त्याला आता होतील फक्त सव्वासात महिने. त्यांच्याआधी होते, जर्मनीतील निकोलाय अॅडम. वादग्रस्त परिस्थितीत त्यांची हकालपट्टी झाली अन् गॅतोसना आणलं गेलं. एवढ्या अल्पावधीत अॅकॅडमीत पाच-सहा वर्षे तयार झालेल्या युरोपियन, लॅटिन अमेरिकन व आफ्रिकी संघांना तोडीस तोड ठरवण्याची अपेक्षा कशी धरावी? 

‘अ’ गट साखळीतील भारताचे सामने दिल्लीत होतील ऑक्टोबर ६, ९, १२ रोजी. त्यात अपयशी न ठरणाऱ्या भारतासाठी, एरवी २२ दिवस रंगणारी स्पर्धा १२ ऑक्टोबरला संपणार काय? तसे होऊ दिले जाऊ नये. या स्पर्धेनंतर आयएसएल या देशांतील व्यावसायिक लीगमधील संघांनी, १५-१७-२० वर्षांखालील गुणी मुलांसाठी अॅकॅडमी चालवल्या पाहिजेत. या संघांचे ठेकेदार आहेत बडे भांडवलदार, करोडपती क्रिकेटर व कलावंत. भारतीय फुटबॉल फेडरेशनपेक्षा आयएसएल ठेकेदार, टाटा अॅकॅडमी, मोहन बागान व ईस्ट बंगालसारखे संघ हेच देशाच्या फुटबॉलला नवे वळण देऊ शकतील. 

या स्पर्धेतील किमान सहा स्पर्धा- केंद्रांचं आधुनिकीकरण झालंय. कोलकात्यातील सॉल्ट लेक स्टेडियममधील बदलांवर, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींनी जवळपास १०० कोटी रु. खर्च केले आहेत. केरळमधील कोची (जुनं कोचीन) नगरीवरील खर्च अंदाजे २५-३० कोटी रु. गोव्यात ट्रेनिंग वा सराव मैदानावरही १५-२० कोटी रु., डी. वाय. पाटील नवी मुंबईत सात कोटी रु. केंद्र सरकारतर्फे डी. वाय. पाटील स्टेडियमसमोरील इतर पाच केंद्रांवर १००-१२० कोटी रु. हे आकडे थोडेफार फुगवलेले व भ्रष्टाचाराने फुगवलेले असू शकतील. पण या स्पर्धेने देशास लाभतील, सामन्यांची उत्तम सहा केंद्रे व १७ नवी सराव मैदानं. हे सारं इन्फ्रास्ट्रक्चर, या साऱ्या स्टेडियम सुविधा यापुढे जपण्याचं आव्हान उरतं. त्यातूनच तुम्ही-आम्ही नव्हे, पण पुढली वा त्यापुढची पिढी स्वप्न बघेल; ‘चला, जग जिंकूया!’ 
 
- वि. वि. करमरकर, (ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व समीक्षक)
बातम्या आणखी आहेत...