आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा दहावीची; पोरं चौथीतली!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परीक्षेतील अमेरिकन पेपरमध्ये ०-३, कोलंबियन पेपरमध्ये १-२ व घानाच्या पेपरमध्ये ०-४. ही कामगिरी जगातील पंचखंडातून आलेल्या २४ विद्यार्थ्यांत २४ वी व तळाची. ती इतकी खराब की उपउपांत्यपूर्व, उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम अशा शेवटच्या चार पेपर्समध्ये परीक्षेस बसण्यासही दहावीतली भारतीय पोरं अपात्र!

पोरं हुश्शार, कष्टाळू अन् मन लावून अभ्यास करणारी. त्यांच्या साहेबांना अचानक फिफाची लॉटरी लागली. परीक्षा केंद्र लाभलं अन् त्यासह १७ लाख डॉलर्स म्हणजे सुमारे १११ कोटी रु.चा लाभ झाला. फिफाची मुख्य अट एकच : साहेबांच्या साम्राज्यातील पोरं फिफाच्या परीक्षेत बसली पाहिजेत. एरवी त्या परीक्षेत लोकांना रस वाटणार नाही. साहेबांना प्रचंड आकर्षण लॉटरीचं. त्यांनाही हवी असलेली फिफाची अलिखित अट मंजूर होतीच. 

साहेबांनी फतवा काढला : पोरांनो चला, अभ्यासाला लागा. परीक्षा अडीच वर्षांनी होणार, तिच्या तयारीसाठी जर्मनीतून निकोलाई अॅडम गुरुजींना खास आणलं. भारतात सहसा परदेशी विशेषत: पाश्चात्त्य गुरूंशी येथील साहेबांचं खटकतंच. आपला खाक्याच तसा. येथेही परीक्षा आठ महिन्यांवर आलेली असताना अॅडम गुरुजींच्या हाती नारळ ठेवला गेला! नवीन पंतोजी मागवले गेले पोर्तुगालमधून. पंतोजी डी मॅतोस यांनी मग धीरज मोईरँगथम या सर्वात बुद्धिमान पोरासाठी अमेरिकेतील फिलाडेल्फिया युनिव्हर्सिटीमध्ये ट्यूशन्स घेणाऱ्या पावलो ग्रिलो यांना खास बोलावून घेतलं. 

साहेबांनी सरकारला साकडे घातले आणि चौथीतल्या निवडक मुलांच्या तुकडीला १८ देशांत हिंडवलं. तेथील विद्यार्थ्यांबरोबरच ९०-९० मिनिटांच्या देशभर परीक्षांना बसवलं. त्यांची खाण्यापिण्याची, राहण्याची चांगली व्यवस्था केली. फिफाच्या दहावीच्या काय, पण बारावीच्या वा पदवी परीक्षेस बसण्याचा मान आजवर कोणाकोणाही भारतीयांना मिळालेला नाही. अशा परीक्षेला बसणं हेच आपलं भाग्य - या बहुमानात पोरांना चेतवलं. 

गुरुजी जर्मनीतले अॅडम असोत किंवा पोर्तुगीज डी मॅटोस असोत - दोघांनाही जाणीव होती की, चौथी-पाचवीतली पोरं थेट दहावीच्या परीक्षेस बसवल्यास पास होणं असंभवच. त्याआधी क्रमाक्रमाने सहावी, सातवी, आठवी, नववीची परीक्षा द्यायला नको का? पण साहेब तेवढं थांबण्यास तयार नव्हते. आणखी दहा-बारा वर्षे थांबायचं या कल्पनेतून त्यांच्या पोटात धस्स व्हायचं. एवढ्या वर्षांनंतर आपण भारतातील सध्याच्या खुर्च्यावर बसणंही असंभव. त्यांना इतिहासात नोंद हवी होती की : आपल्याच कारकीर्दीत फिफाची दहावीची परीक्षा भारतात झाली! परीक्षा केंद्र मिळालं अन् मोगॅम्बो जातीचे साहेब तृप्त झाले. 

साहेबांनी आणि साहेबांच्या दिल्लीतल्या बड्या साहेबांनी एक स्वप्न तयार केलं आणि बाजारात आणलं. आसेतु हिमालय, सारा भारतवर्ष फुटबॉलमय! सर्वसामान्य भारतीय हा भाबडा, आशेवर जगणारा. त्याला स्वप्न दाखवत राहायला हवं हे साहेबांनी अन् बड्या साहेबांनी हेरलेलं. त्यांच्या पूर्वजांनी स्वप्न दाखवलं होतं ‘गरिबी हटाव’ अन् ‘नयी रोशनी लायी है !’ मोठ्या साहेबांनी स्वप्ने दाखवली- दरसाल एक करोड बेकारांना नोकऱ्यांचं आणि प्रत्येकाच्या खात्यात चक्क १५-१५ लाख जमा करण्याचं. आता नवी पिढी, नव युवा पिढी, नव स्वप्न : खेळांचा बादशहा अशी जागतिक मान्यता मिळवणाऱ्या फुटबॉलचं वेड आसेतु हिमालय भारतवर्षाला लावण्याचं. 

देश नव्हे, पण बंगाल व केरळ जरूर फुटबॉलमय झाला. पण तो ना साहेबांमुळे ना दिल्लीतील मोठ्या साहेबांमुळे. या दोन्हीही राज्यांना फुटबॉलवेडाची परंपरा शंभर वर्षांची. गोव्याविषयीही तेच म्हणता येईल. पण बड्या साहेबांच्या लाडक्या दिल्लीचं काय? ‘दिल्ली एके दिल्ली’ असं मानणाऱ्या दिल्लीतील हिंदीभाषिक नोकरशाहीचं काय? तिथं या स्वप्नांचे गड्डे बाजारात जस्सेच्या तसे पडून राहिले! जवाहरलाल स्टेडियमची क्षमता सुमारे ५५ हजार. पण सात हजार नागरिकही स्वप्न व स्वप्नाचं तिकीट विकत घेत नव्हते! मग काय टीव्हीवर रिकाम्या स्टेडियममधील सामने, तेही स्थानिक (भारतीय) संघाचे दाखवायचे? टीव्हीच्या आधारावर जागतिक साम्राज्य उभारणाऱ्या फिफास ही गोष्ट साफ नामंजूर. फिफाने साहेबाला अन् साहेबानं बड्या साहेबाच्या माणसांना निरोप दिला. गर्दी जमवायची एवढंच ना? बडा साहेब त्या तंत्रात पारंगत. शालेय संचालकांमार्फत हुकुमी व्यवस्था केली गेली. चौथी-पाचवीतल्या पोरांचा खेळ पाहण्यास ४० हजार पोरांची नेण्या-आणण्याची, नाष्ट्याची व्यवस्था केली गेली. या ४० हजार पोरांना तिरंगी झेंड्याखाली खेळणारी चौथीतल्या एकवीस पोरांपैकी एकही जण माहिती नव्हता. त्यांना स्वप्न विकलं गेलं -त्यांच्या माहितीतले मेस्सी-रोनाल्डो-नेमार जो खेळ खेळतात तो खेळ पाहण्याचं! 

हे स्वप्न कसंबसं तग धरून राहिलं, तीन दिवसांतले दोन-दोन तास. ऑक्टोबर सहा, नऊ व बारा इ.स. २०१७ ! त्या दिवसांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न असं म्हणता येईल का याचा शोध घेतला गेला. अखेर निर्णय झाला : “ ऐतिहासिक शब्दाने गौरवीत करण्याचा. म्हणजे ९ ऑगस्ट चले जाव, १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन, तसाच हा ऐतिहासिक दिन! 

परीक्षा केंद्रात, फिफाच्या इच्छेनुसार व आदेशानुसार जमवलेल्या ४५-५० हजारांची गर्दी या ऐतिहासिक-दिनाची ‘याचि देही याचि डोळा’ साक्षीदार. त्यांच्यासमोर जीर्ण होत गेलेलं स्वप्न उद्ध्वस्त झालं. परीक्षेतील अमेरिकन पेपरमध्ये ०-३, कोलंबियन पेपरमध्ये १-२ व घानाच्या पेपरमध्ये ०-४. ही कामगिरी जगातील पंचखंडातून आलेल्या २४ विद्यार्थ्यांत २४ वी व तळाची. ती इतकी खराब की, उपउपांत्यपूर्व, उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम अशा शेवटच्या चार पेपर्समध्ये परीक्षेस बसण्यासही दहावीतली भारतीय पोरं अपात्र! 

इयत्ता चौथीतली पोरं, दहावीतल्या मुलांच्या तुलनेत, परीक्षेत फिकी पडली. त्यात नवल ते काय? पण ती किती फिकी पडली आणि भारत व इतर बरेचसे देश यातील दरी केवढी, त्याची थोडी आकडेवारी बघूया. चेंडूवर भारताचा ताबा किती वेळ? अमेरिकेसमोर ४३ टक्के म्हणजे ९० मिनिटांच्या खेळात ३९ मिनिटं. कोलंबियाशी ३२ टक्के (२९ मिनिटं) व घानाशी ४० टक्के (३६ मिनिटं) पण हा ताबा बऱ्याचदा बचावाच्या पवित्र्यात वा आपल्या हद्दीत. विशेषत: घाना व अमेरिका यांच्या लढतीत. गोलवर शॉट भारताचे अमेरिकेशी एक, घानाशी दोन व कोलंबियाशी चार. एकूण फक्त सात. याउलट भारतीय गोलवर अमेरिकेचे आठ, कोलंबियाचे सात व घानाचे १० असे एकंदरीत २५ हल्ले!  कॉर्नर भारताचे सहा, भारताविरुद्ध १६! प्रतिपक्षाच्या ९ गोलसमोर भारताचा एकमेव गोल. जागतिक साखळीत गुणांचा भोपळा फोडू न शकणाऱ्या दोन संघांपैकी भारत (१ वि. ९ गोल) अन् उत्तर कोरिया (शून्य विरुद्ध पाच) यातही भारताचा गोल फरक तीन गोलनी खराब! 

एक बाब नाजूक व वादग्रस्त. हा फिफा विश्वचषक १७ वर्षांखालील कुमारांसाठी. वय व विशेषत: जन्मतारीख निश्चित करण्याची कसोटी अद्याप सापडायची आहे. पाचदा ही स्पर्धा जिंकणाऱ्या नायजेरियाच्या पथकातील साठपैकी २६ जण वयचोरीबद्दल हुसकले गेले ही वस्तुस्थिती आहे. त्यानंतरही घाना, माली, नायजर आदी आफ्रिकी संघातील काही खेळाडूंच्या नेमक्या वयाविषयी व जन्मतारखेविषयी मनात शंका येतात. तसं पाहिलं तर या स्पर्धेत भारताचा एकमेव गोल नोंदवणाऱ्या जॅक्सनचा किस्साही सूचक आहे. वय १४, उंची जवळपास ६ फूट हे त्याचं समीकरण, तेव्हाचे प्रशिक्षक निकोलाई अॅडम यांना दोन वर्षांपूर्वी खटकलं होतं व त्यांनी जॅक्सनला संघाबाहेर ठेवलं नव्हतं का? 

अधिक मूलभूत मुद्दा भारतीय फुटबॉलच्या बांधणीचा. युरोप, अमेरिका, जपान व बहुधा चीनमधील राष्ट्रीय संघटना व प्रमुख व्यावसायिक क्लब, बाल व युवा खेळांडूसाठी अकॅडमी चालवतात. वयोगट ५ ते १० मग १३-१५-१६-१७-२० वर्षांखालील मुलांसाठी अकॅडमीचा कार्यक्रम त्यांनी काही दशके चालवला आहे. योग्य आहार, व्यायाम, स्पर्धा सहभाग, परदेशी दौरे यांचा पद्धतशीर कार्यक्रम राबवतात. भारतात ज्युनियर लीग होतातच कुठे? त्यामुळे तेव्हाचे प्रशिक्षक निकोलाई अॅडम्स यांना चाचणी शिबिरं घेत देशभर हिंडावं लागलं होतं. 

काही कुमारांनी या स्पर्धेत आपली चमक जरूर दाखवली आहे. विशेषत: मणिपुरी गोली धीरजसिंगने तसेच मुंबईच्या डॉन बॉस्कोत तयार झालेल्या बचावपटू नमीन देशपांडेने. बचावाची जादा जबाबदारी उचलत त्यानेच अन्वर अलीला आक्रमणासाठी मोकाट सोडलं. या तिघांप्रमाणे मिझोरामच्या कोमलने. उगवत्या खेळाडूंचा हा संच एकत्र ठेवायचा आणि आय-लीगमध्ये त्याला दोन वर्षे उतरवायचं ही भारतीय फेडरेशनची संकल्पित बांधणी योग्यच. पण या खंडप्राय देशात आयएसएलचे ठेकेदार व बडे क्लब यांनी युवा अकॅडमीचा दीर्घकालीन उपक्रम सुरू केलाच पाहिजे. एरवी भारतासाठी ही स्पर्धा ठरेल निव्वळ एक इव्हेंट, एक जल्लोष! 

- वि. वि. करमरकर (ज्येष्ठ क्रीडा पत्रकार)
बातम्या आणखी आहेत...