आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहार उमलत्या कळ्यांची!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यंदाचे वर्ष इंग्लंडला खासच फलदायी ठरलंय, फिफाच्या २० व १७ वर्षांखालील युवा व कुमार विश्वचषकांची विजेेतेपदे, युरो जेतेपद मिळालंय. गेल्या ५० वर्षांत म्हणजे १९६६च्या इंग्लंडमधील खुल्या फिफा विजेतेपदानंतर हे दुर्मिळ व पायाभूत यश. याचं श्रेय जातं ‘वुई आर ऑल इंग्लंड’ (आम्ही सारे इंग्लंडचे) उपक्रमाला. काळा-गोरा, सावळा-गोरा, मुस्लिम-ख्रिश्चन आदी भिंती फोडून टाकण्याच्या उपक्रमाला. 
 
 तब्बल तीन आठवडे प्रदर्शन मांडलं होतं उमलत्या कळ्यांचं. कळ्या पंचखंडातल्या. आपल्या आशियातल्या. जगावर दीर्घकाळ राज्य करणाऱ्या युरोप-अमेरिकेतल्या. आशियासारख्या आफ्रिकेच्या अन् सर्वात कमी लागवड असलेल्या ओशनियातल्या. साऱ्यांचं रंगरूप आगळंवेगळं. त्यांचा दरवळणारा सुगंध, रसिकांनाच काय, पण अरसिकांनाही वेगळ्याच विश्वात नेऊन सोडणारा. त्यांच्या मांडणीतील सप्तरंगांची उधळण, साऱ्या नजरांना एकटक आकर्षित करणारी. 
 
 
पंचखंडातील २१२ देशांमधील १७ वर्षांखालील कुमारांची ही १७वी फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा. उमलत्या कळ्यांचं सतरावं जागतिक प्रदर्शन. ते कितपत प्रेक्षणीय होतं? कितपत वैशिष्ट्यपूर्ण होतं? फिफाच्या तांत्रिक अभ्यास गटाचे सदस्य सोल कॅमबेल यांच्या शब्दांत सांगायचं तर, “१७ वर्षांखालील या स्पर्धेस सुरुवात झाली, ३२ वर्षांपूर्वी १९८५मध्ये. खरं सांगायचं तर १०-१५ वर्षांपूर्वी, म्हणजे सुमारे २००५ पर्यंत तरी तिला आजचं (प्रगत) रूप कुठे होतं?” 

४३ वर्षीय काळे-सावळे कॅमबेल हे इंग्लंडमधील सुप्रसिद्ध आर्सेनल क्लबचे व इंग्लंडचे माजी फुटबॉलपटू. १९९६ ते २००७ या १२ वर्षांत ते ७३ वेळा इंग्लंडतर्फे आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले. १७ वर्षांखालील फिफा विश्वचषकाचा दर्जा कुठल्याकुठे उंचावत गेला, त्याची सहर्ष नोंद करून ते म्हणतात, “फुटबॉलचं तांत्रिक कसब, खेळाचं सर्वांगीण ज्ञान, डावपेच, खेळाडूंचं अक्कलहुशारीनं केलेलं पोझिशनिंग या साऱ्याच बाबतीत विलक्षण सुधारणा झालीय.” 

फुटबॉलमध्ये मागासलेल्या, पण जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या (साहजिकच सर्वात मोठ्या बाजारपेठा असलेल्या) चीन व भारत देशांना स्पर्धांचे संयोजन करण्याचा मान व संधी दिली फिफानं. मैदानात फारशी प्रगती करू न शकणाऱ्या या खंडप्राय देशात, फुटबॉलची लोकप्रियता व्यापक होती व आहे. भारतीयांना मेजवानी मिळाली ५२ सामन्यांत मिळून विक्रमी १८३ गोलांची. १९८५च्या कुमार विश्वचषकाने १२ लाख ३० हजार ९७६ (१२,३०,९७६) प्रेक्षकांना मैदानांकडे ओढून आणलं. चीनपेक्षा १०-१२ कोटी कमी लोकसंख्या असलेल्या भारतातील गर्दीचा आकडा १३ लाख ४७ हजार १३१ (१३,४७,१३१). यापैकी राजधानी दिल्लीत क्रीडा खात्यानं हरियाणातील शाळांतून धरपकड करून आणलेली सव्वा- दीड लाख शाळकरी पोरं वगळली तरी प्रतिसाद १२ लाख फुटबॉलवेड्यांचा. म्हणजे प्रत्येक सामन्यास सरासरी २५ हजारांचा. कोलकात्यातील शेवटच्या तीन सामन्यांना ६६, ५३ व ६६ हजारांवर रसिकांचा. 

आणि कोलकाता वा केरळमधील कोची येथे भारताचे सामने नसूनही खचाखच भरणाऱ्या स्टेडियमचा!  मला आठवण येते १९८७च्या विश्वचषक उर्फ राष्ट्रकुल क्रिकेट अंतिम फेरीची भारत व पाकिस्तान यात ती लढत होणार, या आशावादातून त्या सामन्याची तिकिटं काळ्याबाजारात प्रचंड भावानं आगाऊ ‘बुक’ केली गेली होती. प्रत्यक्षात भारत व पाकिस्तान उपांत्य फेरीतच गारद झाले. मग कसला तिकिटांचा काळाबाजार? खूप कमी किमतीत, स्वस्तात ती तिकिटं कोलकात्यात काढून टाकली जात होती! 

पण फुटबॉलवर बंगाली समाजाचं आत्यंतिक प्रेम. त्यांच्या खालोखाल केरळ, गोवा, बंगळुरू, आसाम, मणिपूर, मिझोरम, मुंबई-कोल्हापूर यांचं. भारताचे सामने हटवादीपणाने दिल्लीत खेळवले गेले. याबाबत तक्रार करण्यात अर्थ नाही हे त्यांनी ओळखले. भारतापेक्षा खूपच बलवान अशा युरोपियन, लॅटिन अमेरिकन, आफ्रिकन संघांचा खेळ पाहण्यातील सरस आनंद लुटण्याची संधी त्यांनी साधून घेतली. पेले, गारींचा, मॅराडोना व बेकेनबॉर, झिदान, रोनाल्डो, मेसी, नेमार यांना याचि देही याचि डोळा पाहता येण्याचं भाग्य आपल्या नशिबी नाही. निदान उद्या-परवा-तेरवाचे बालवयातील रोनाल्डो व मेसी तरी बघूया, असा त्यांचा साधासुधा हिशोब. 

अस्सल फुटबॉल शौकिनांचं सुदैव की, या कुमार संघांनी आपला खेळ खूप उंचावत नेला. इंग्लंड ५ विरुद्ध स्पेन २, हा सामना भारतात खेळलेल्या निवडक बहारदार सामन्यात मानाचं स्थान मिळवेल. ९० मिनिटांच्या खेळात, ४३ मिनिटांनंतर इंग्लंड दोन गोलनी पिछाडीवर. पण झुंजार इंग्लंडचे त्यानंतरच्या पाऊण तासात पाच गोल. अंतिम सामन्यात एखाद-दुसरा गोल नव्हे, तर चक्क सात गोल. त्यात पेनल्टी शूट-आऊट नाही वा एकही पेनल्टी गोल नाही, सारेच्या सारे मैदानी गोल! रसिक तृप्त, पैसेही वसूल! 

या उमलत्या कळ्यांचं या अवस्थेपर्यंत कुणी संगोपन केलं? कुमार फिफा विश्वचषकाचा मानकरी ‘गोल्डन बॉल’चा मानकरी फिली फोडेन, तसेच तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी व सर्वाधिक ८ गोल चढवून ‘गोल्डन बूट’चा मानकरी ऱ्हायान ब्रुस्टर आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारे कॅलम हडसन. ओडोई तसेच मध्य फळीतून प्रतिपक्षाच्या मध्य फळीतील फटींचा वेध घेणारे, पासेस सतत पुरवणारा सेस्सेगनॉन आदींना घडवलंय, इंग्लंड संघटनेच्या अॅकॅडमींनी. गेली पाच वर्षे त्यांच्यावर घेतलेल्या मेहनतीतून या कळ्या उत्तम उमलत्या आहेत.  

यंदाचं वर्ष इंग्लंडला खासच फलदायी ठरलंय, फिफाच्या २० व १७ वर्षांखालील युवा व कुमार विश्वचषकांची विजेेतेपदे, युरो जेतेपद मिळालंय. गेल्या ५० वर्षांत म्हणजे १९६६च्या इंग्लंडमधील खुल्या फिफा विजेतेपदानंतर हे दुर्मिळ व पायाभूत यश. याचं श्रेय जातं ‘वुई आर ऑल इंग्लंड’ (आम्ही सारे इंग्लंडचे) उपक्रमाला. काळा-गोरा, सावळा-गोरा, मुस्लिम-ख्रिश्चन आदी भिंती फोडून टाकण्याच्या उपक्रमाला. 

१९७८मध्ये व्हिव्ह अँडरसन या इंग्लिश संघातील पहिल्या काळ्या फुटबॉलपटूची हुर्यो उडवली गेली होती. पण आता २०१७ मधील इंग्लिश कुमार संघातील पहिल्या ११ फुटबॉलपटूंत फिल फोडेन, बचावपटू जॉर्ज मॅकइचहॅन व गोली कर्टिस अँडरसन हे आहेत, इन-मीन-तीन गोरे ! काळे, आशियाई व अल्पसंख्याक (ब्लॅक, एशियन, मायनॉरिटी इथनिक उर्फ बीएएमई उर्फ बेम) यांची संख्या पहिल्या ११ व ८ अन् एकूण १९ जणांत १३! गोऱ्या साम्राज्यवादी विन्स्टन चर्चिल ते मार्गारेट थॅचर या नेत्यांच्या धोरणांपासून डावीकडे, समतावादी व सहिष्णुतावादी दिशांनी ही वाटचाल. गेल्या खुल्या फिफा विश्वचषकातही ‘बेम’चे सहा खेळाडू इंग्लिश पथकात होते. अमेरिकेत अॅथलेटिक्स व बॉक्सिंग, बास्केटबॉल व महिला टेनिसपटूमध्ये काळे (वा आफ्रिकी-अमेरिकन) जे स्थान हक्कानं भूषवत आले आहेत, त्याचाच स्वीकार इंग्लिश क्रिकेट, अॅथलेटिक्सपेक्षा इंग्लिश फुटबॉल करत आहे. त्या उमद्या उपक्रमास आलेले हे फळ. 

स्पेन, जर्मनी, ब्राझील, अमेरिका आदी संघांतील गुणवंतांना बडेबडे क्लब करारबद्ध करू पाहत आहेत. करोडो रुपयांच्या कारकीर्दीकडे वळवत आहेत. ऱ्हायान ब्रुस्टरला सुप्रसिद्ध लिव्हरपूल क्लब दुय्यम संघातून अव्वल संघात स्थान देईल, पण तूर्त राखीव खेळाडूत ठेवेल, असं दिसतं. फिल फोडेनमध्ये मँचेस्टर सिटी क्लबला रस आहे. या स्पर्धेत चमकलेल्या डझनभर खेळाडूंना व्यावसायिक संघांत उमेदवारीसाठी निवडलं जाईल. 

१७ वर्षांखालील फुटबॉल व खुला फुटबॉल यात फार मोठी दरी आहे. ब्राझीलचा रोनाल्डिन्हो, स्पेनचा सेस फेबरगॅस अशा मोजक्या अर्धा डझन उमलत्या कळ्यांची फुलं झकास फुलली. गोल्डन बूटचे ९०-९५ टक्के मानकरी, फुटबॉलमधील जीवघेण्या स्पर्धेत टिकाव धरू शकले नाहीत, असा फिफाचा इतिहास सांगतो. 

भारतानं यापासून काय बोध घ्यावा?  फिफाचे तांत्रिक समिती सदस्य सोल कॅम्पबेल यांचे म्हणणे ऐकून घेऊया. भारताने स्पर्धा उत्तम भरवली. पण ती निव्वळ सुरुवात मानावी. आज भारत  विकसित जगाच्या तुलनेत शे-पन्नास वर्षेे मागे आहे, हे समजून घ्यावं. चौथीतली पोरं यंदा दहावीच्या परीक्षेस बसवली गेली. पण चौथीनंतर पाचवी, मग सहावी-सातवी-आठवी-नववी या क्रमानेच प्रगती होत असते. त्यासाठी हवी चिकाटी, निर्धार अन् एकाग्रता! हेच खरं आव्हान!

- वि. वि. करमरकर, ज्येष्ठ क्रीडा समीक्षक
बातम्या आणखी आहेत...