आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दर्द जीवघेणा की मीठा मीठा...?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पल्याच संघाला खोल खड्ड्यात लोटणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर अतिशय संयमी शब्दांत कोहलीने हे अस्त्र म्हणा वा ब्रह्मास्त्र सोडलं २३ नोव्हेंबरला. पण त्यापेक्षाही खटकणारी व विदारक बाब म्हणजे जागरूक क्रीडा पत्रकारांनी हीच समस्या चव्हाट्यावर आणली ती किमान ९-१० आठवड्यांपूर्वी. पण भारतीय मंडळास जाण आणण्यात पत्रकार पुन्हा एकदा कमी पडले. 


क्रिकेट कर्णधार विराट कोहलीचं कोणतं अस्त्र अधिक धारदार, अधिक स्फोटक आहे?  त्याची बॅट की त्याची वाणी? का पहिले अस्त्र इतके प्रभावी असल्यामुळेही त्याच्या दुसऱ्या अस्त्राला, त्याच्या वाणीला, ब्रह्मास्त्राची शक्ती देतं? 


कसोटीसह ५० व २० षटकांच्या कसोटीत त्याचा धावांचा धबधबा अखंड वाहतोय. देशी तसाच गेल्या इंग्लंड दौऱ्याचा अपवाद वगळता परदेशीही. या तिन्हीही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अर्धशतकी सरासरी देणारा तोच राष्ट्रकुलातील एकमेव महारथी. राष्ट्रीय नेतृत्व करताना ११ कसोटी शतकं झळकवणाऱ्या सलामीवीर सुनील गावसकरचा उच्चांक त्याने नागपूरला चार दिवसांपूर्वी मोडला. १२ वर्षांपूर्वी कॅलेंडर वर्षात या तीन प्रकारच्या कसोटीत ९-९ शतकं ठोकणाऱ्या रिकी पाँटिंग अन् ग्रेग स्मिथ यांचेही उच्चांक त्याने त्याच ओघात मोडीत काढले. अर्धशतकांचे रूपांतर शतकांत करण्याचा सपाटा, १६ पैकी १२ खेळीत चालवताना त्याने दस्तुरखुद्द डॉन ब्रॅडमननाही (२१ अर्धशतके १४ शतकांत विकसित) मागे ठेवले! 


गिरसप्पाला साजेसा हा धबधबा : त्याने त्याच्या शब्दांना ताकद दिलीय. याआधी सुनील गावसकर व अधिकार गाजवण्याची मानसिकता कमी असलेला सचिन तेंडुलकर तसेच कपिलदेव निखंज यांचे बोल त्यांच्या अफाट मैदानी कामगिरीमुळे प्रचंड वजनदार बनले होते. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम संघाचे नेतृत्व करण्याचं भाग्य लाभलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या वाणीची वट त्याच्या कृतीला लाभली नव्हती का? 


कर्तृत्वाने मिळवलेली मान्यता व शक्ती यांच्या भक्कम आधारावर कोहलीने मंडळावर टीकास्त्र सोडलं. दुबळ्या श्रीलंकन संघाविरुद्धच्या कसोटी तसेच ५० व २० षटकांच्या मालिका संपल्यानंतर दोन दिवसांतच भारतीय संघ निघणार शक्तिमान दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर. खेळाडूंना विश्रांती देऊन ताजेतवाने होण्यास वावच नाही. ही तर पूर्वतयारीची क्रूर चेष्टा! 


चार वर्षांपूर्वीच्या द. आफ्रिकन दौऱ्याचा दाखला कोहली देतो. वेगळं हवामान अन् विशेषत: वेगळ्याच खेळपट्ट्या, चेंडू उसळवण्यास साथ देणाऱ्या हिरवळी खेळपट्ट्या यांच्याशी जमवून घेण्यास भारताच्या हाती िदला गेला होता जेमतेम एक आठवडा. मग व्हायचं तेच झालं. कसोटी व एकदिवसीय कसोटीत भारताला नमवणं दक्षिण आफ्रिकेला सोपं गेलं.  


येथे हेही समजून घेऊया की, अॅशेस मालिका ब्रिस्बेनच्या कसोटीत सुरू होण्यापूर्वी तब्बल २५ दिवस (हो, चक्क २५ दिवस आधीच!) इंग्लिश संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला होता. पहिल्या कसोटीआधी प्रथम श्रेणीच्या तीन सामन्यांची संधी त्यांना इंग्लंडने मिळवून दिली होती. या उलट भारतीय संघाचं कोणतं हित भारतीय मंडळाने जपलंय? पाच जानेवारीला केपटाऊनमधील सलामीच्या कसोटीआधी भारतीय संघ खेळेल दोन दिवसांचा एक सामना! 


आपल्याच संघाला खोल खड्ड्यात लोटणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर अतिशय संयमी शब्दांत कोहलीने हे अस्त्र म्हणा वा ब्रह्मास्त्र सोडलं २३ नोव्हेंबरला. पण त्यापेक्षाही खटकणारी व विदारक बाब म्हणजे जागरूक क्रीडा पत्रकारांनी हीच समस्या चव्हाट्यावर आणली ती किमान ९-१० आठवड्यांपूर्वी. पण भारतीय मंडळास जाण आणण्यात पत्रकार पुन्हा एकदा कमी पडले.

 
जागरूक इंग्लिशभाषी प्रसारमाध्यमे तेव्हापासून सांगत होती : दक्षिण आफ्रिकन मालिका सुरू होण्याआधी किमान १२-१४ दिवस दक्षिण आफ्रिकेत सामने व सराव यासाठी मिळायलाच हवेत. हीच आग्रही मागणी विराट कोहली करत होता. तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा प्रस्ताव होता ५० दिवसांच्या दौऱ्याचा. चार कसोटीनंतर (यातील महत्त्वाचा भाग म्हणजे कसोटी मालिकेआधी नव्हे तर ती संपल्यावरच!) ५० व २० षटकांच्या तीन-तीन कसोटी. हे सहा एकदिवसीय सामनेही कसोटी मालिकेआधीच्या सरावासाठी भारताला न देण्याचा. 


विराटची मागणी भारतीय मंडळाने प्रतिष्ठेचा रास्त मुद्दा केला नाही. साहजिकच दक्षिण आफ्रिकेला ती धुडकावून लावणं सोपं केलं. प्रश्न पडतो साहजिकच : असं का होतय? पुन:पुन्हा का होतय? राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना आपापल्या संघाच्या हितसंबंधांपेक्षा इतर कोणत्या गोष्टींना महत्त्व देत आहेत? 


दक्षिण आफ्रिकेच्या वेळापत्रकानुसार, एक मार्चपासून ऑस्ट्रेलियन संघाची मालिका होत आहे. त्याआधी आपल्या संघाची विश्रांती व पूर्वतयारी यासाठी त्यांना काही दिवस हाताशी ठेवायचे आहेत. त्यामुळे संपूर्ण जानेवारीपाठोपाठ संपूर्ण फेब्रुवारीचे बुकिंग भारतासाठी करणं, त्यांना कोणत्याही परिस्थितीत टाळायचं होतं व टाळलंच. नाताळच्या सुटीतला महोत्सवी ‘बॉक्सिंग-डे’ आणि नववर्ष दिन हे कसोटी सामन्यांसाठी वापरणं गल्लाभरू. तेही त्यांना साधायचंय. भारत त्या दिवसांच्या सामन्यांसाठी उपलब्ध नसल्यास पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या छोट्या दौऱ्याचा पर्याय दक्षिण आफ्रिकेच्या विचाराधीन होता अन् आहे. 


आता वळूया भारतीय मंडळाकडे. भारतीय मंडळानं आपले हात मोठ्या आनंदात बांधून घेतले आहेत टीव्ही करारांशी. स्टार समूहाशी एप्रिल २०१२ मध्ये केलेल्या करारानुसार जुलै २०१३ ते मार्च २०१८ या पावणेसहा वर्षांच्या कालावधीत भारतात ९६ आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास मंडळ करारबद्ध आहे. व्यावहारिक भाषेत हेच सांगायचं झाल्यास ९६ सामने दाखवण्यास (व त्यातून भरमसाट जाहिरातबाजीची कमाई स्टारला मिळवून देण्यास) मंडळ करारबद्ध आहे. यातून स्टार समूहाला पैशाचा धबधबा लाभो. भारतीय मंडळाचा लाभ होतोय ३,८५१ कोटी रु.चा. भारतीय क्रिकेटपटूंचे या करारात या हिशेबात स्थान अव्वल नव्हे तर दुय्यम. २०१७ च्या वर्षात १२ कसोटी, ५० षटकांच्या २९ व २० षटकांच्या १३ कसोटी त्यांनी खेळायचं. हे क्रिकेट वर्षातून ९२ दिवसांचं वा ६११ दिवसांचं. 


हे झालं आंतरराष्ट्रीय क्रिकेटपुरतं. त्यात भर आयपीएल जल्लोषाची. सुमारे दीड महिन्यात १७ सामन्यांची म्हणजे आणखी ६५ तासांच्या खेळाची. म्हणजेच वर्षात सुमारे ६७५ तास कौशल्यपूर्ण खेळण्याची. 


या कराराचं पालन करण्याची मंडळास केवढी घाई व केवढी निकड! भारतातील ऑस्ट्रेलियन मालिका संपली तेव्हाना करारातील ९६ पैकी ९३ सामने भारतात झालेले. ९६चा कोटा पुरा करण्यासाठी न्यूझीलंडपाठोपाठ श्रीलंकेच्या तीन चुरसहीन मालिका व त्यातून भारतातील ९६ सामन्यांची सवाई पूर्तता. 


टीव्हीशी करार हाच ऑलिम्पिक ते फुटबॉलपाठोपाठ विविध खेळांसाठी प्राणवायू. पण असे करार करण्यापूर्वी कसोटीवीर व रणजीवीर यांच्या हितसंबंधांचा िवचार प्रामुख्याने व्हायला हवा होता. प्रत्येक मालिकेआधी व मालिकेनंतर, प्रत्येक दौऱ्याआधी व दौऱ्यानंतर, खेळाडूंची पूर्वतयारी व विश्रांती यांना प्राधान्य द्यायला हवं होतं. खेळाडूंना करोडो रुपये मानधन देऊन विकत घेण्याची प्रवृत्ती टाळायला हवी होती. अति पैशाच्या अति लोभातून क्रिकेट अति होतंय. क्रिकेटऐवजी पैसा केंद्रबिंदू बनतोय. ते टाळायला हवं होतं. 
तूर्त तरी क्रिकेटपटू मालामाल होत आहेत. अति क्रिकेटच दर्द बनलंय प्रत्यक्षात मीठा मीठा दर्द! 


निवृत्त खेळाडू याबाबत का चूपचाप? गावसकर व कपिल, वेंगसरकर व मोहिंदर, बेदी व कुंबळे, द्रवीड व सेहवाग, गांगुली व लक्ष्मण, तेंडुलकर सारेच मौनव्रतात. का तेही निवृत्तीनंतर मीठा मीठा दर्दचं सुख अनुभवत आहेत? 


सरतेशेवटी सर्वोच्च न्यायालयाने मंडळाचा गैरकारभार थांबवण्यासाठी नेमलेले एक प्रशासक विनोद राय यांना विनंती : विराट व कसोटीवीर यांच्यावरील सामन्यांचा बोजा कमी करण्याचे आश्वासन तुम्ही देत आहात. छान! पण त्यासह रणजी-दुलिप-इराणी आदी स्पर्धांतील वर्षांतून चार सामने खेळण्याची अटही कसोटीवीरांना अवश्य घाला. मगच देशांतर्गत स्पर्धांचा कस वाढेल अन् रणजीवीरांची कसोटी लागेल!

- वि.वि. करमरकर, ज्येष्ठ क्रीडा पत्रकार

बातम्या आणखी आहेत...