आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदाल : क्ले कोर्टचा शहेनशहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्ले कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या खुल्या फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेतील सर्वोच्च शिखरावर झेंडा फडकावलाय राफेल नदालने. तो झेपावलाय फ्रेंच स्पर्धेतील चक्क दहाव्या विजेतेपदावर. चार ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या कोणत्याही एका स्पर्धेतील हे यश अतुलनीय. ही भरारी कदाचित चिरंतन राहणार नाही. कारण सारे विक्रम हे केव्हा ना केव्हा मोडले गेले आहेत. नदाल विराजमान झालाय त्या शिखराला एव्हरेस्ट संबोधण्याची घाई मी अजिबात करणार नाही. कारण कुणी सांगावं येत्या दोन-तीन वर्षांत तो अकरावं-बारावं फ्रेंच जेतेपद खिशात टाकेलही. म्हणून मी म्हणेन, थकला-भागला नदाल जिथं अखेर विसावेल ते शिखर असेल एव्हरेस्टचं! सलाम राफा नदाल!
 
नदाल अन् क्ले कोर्ट असं अद््भुत समीकरण राफाने बनवून टाकलंय त्या समीकरणाचं मोठेपण तसेच त्याच्या मर्यादाही सुरुवातीसच समजून घेऊया. टेनिसचं विश्वच वेगळं. बहुरंगी अन् बहुढंगी. या विश्वात ग्रास कोर्ट (विंबल्डन) - क्ले कोर्ट (फ्रेंच), हार्ड कोर्ट अन् विविध प्रकारचे सिंथेटिक कोर्ट (ऑस्ट्रेलियन व अमेरिकी स्पर्धा) गुण्यागोविंदाने नांदतात. हॉकीत आता सिंथेटिक कोर्टचा गालिचा अनिवार्य. त्यात फरक वेगवेगळ्या कंपन्यांचा, टर्फ वा पॉलिग्रासचा. फुटबॉलने सिंथेटिकचा नाद सोडून सर्वत्र मान्यता दिली नैसर्गिक मैदानांना. बास्केटबॉल - व्हॉलीबॉलची कोर्ट एकच ढाच्यातली. कुस्ती सर्वत्र मॅटवरच. अॅथलेटिक्स धावशर्यतीचे ट्रॅक अन् जिम्नॅस्टिक कसरतींचे फ्लोअरिंग सगळीकडे समान. सायकलिंग ट्रॅकमध्येही विविधतेला वाव नाही.
 
टेनिसने मात्र कोर्टच्या विविधतेची परंपरा जाणीवपूर्वक जोपासली. ग्रास, क्ले, सिंथेटिक अन् हार्ड कोर्टच्या स्वरूपानुसार खेळाची तंत्रे बदलणार. त्यातूनच टेनिसपटूत अष्टपैलुत्व येणार. फटक्यांचं रूप बदलत जाणार. सर्व्हिसचं महत्त्व आणि सीमारेषेवर ठाण मांडून खेळण्याचं कसब कोर्टनुसार बदलणार. क्रिकेटमध्येही भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडीज यांनी मॅटिंगवरील सामन्यांचा आग्रह कायम ठेवला असता अन् सरसकट हिरवळीवरील (टर्फ) खेळणं, मॅटचं क्रिकेटमध्ये विलीनीकरण करून टाकलं नसतं तर खेळातली आव्हाने वाढली असती. पण भारत आहे अनुकरणप्रिय. साहेबाच्या सुरात सूर मिसळणारा. तीच गोष्ट हॉकीला नैसर्गिक हिरवळीवरून सिंथेटिकवर नेण्याची, मान खाली घालून युरोपपुढे होयबा बनण्याची. पण तो आहे वेगळाच विषय!
 
सांगण्याचा मुद्दा एवढाच की बियाँ बोर्ग, पीट सॅम्प्रस, रॉजर फेडरर हे जसे विंबल्डनच्या ग्रास कोर्टवरचे दादा, त्यापेक्षा फ्रेंच क्ले कोर्टवर नदालची अधिक हुकूमत. आता चारही प्रकारच्या कोर्टवर प्रभुत्व दाखवण्याचं असामान्य, चतुरस्त्र कौशल्य कुणाचं? तर ऑस्ट्रेलियाचा रॉड लेवरचं. मोसमात या चारही अव्वल स्पर्धात एकदा नव्हे तर दोनदा बाजी मारण्याची अफाट किमया आजवर त्याला एकट्यालाच साधलेली. क्ले कोर्टवरची नदालची दादागिरी केवढी प्रचंड बघा : यंदा स्पर्धेत सात फेऱ्यांतील सात सामन्यांत त्याने एकवीस सेटपैकी एकवीस सेट जिंकले. आपल्या सर्व्हिसवरील सुमारे १०५-११० गेम जिंकले अन् प्रतिपक्षाच्या तितक्याच सर्व्हिसवरील फक्त ३५ गेम गमावले. फ्रेंच स्पर्धेत यापेक्षाही तीन कमी गेम घालवून ग्रँडस्लॅम जिंकण्याचा बियाँ बोर्गचा उच्चांक त्याला मोडता आला नाही खरा. पण बोर्ग (१९७८) व रुमेनियाचा इली नस्तासे (१९७३) यांनी एकही सेट न गमावता जेतेपद खेचून आणलं ते एकेकदाच. नदालने ही अद््भुत कामगिरी करून दाखवलीय त्रिवार : २००८, मग २०१३ मध्ये वयाच्या विशी-पंचविशीत अन् आता वयाच्या ३१ व्या वर्षी २०१७ मध्ये.
 
रोलाँ गॅरो या पॅरिसमधील खुल्या फ्रेंच टेनिस स्पर्धेत क्ले कोर्टवर त्याची जय-पराजयाची आकडेवारी आहे ७९ जय व अवघे दोन पराजय. फ्रेंच ग्रँडस्लॅमआधी माँटे कार्लो अन् बार्सिलोना या क्ले कोर्टवरील स्पर्धातही त्याने यंदाच पूर्ण केलंय अजिंक्यपदाचं दशक! क्ले कोर्टवर अर्जेंटिनाच्या गिलेरमो विलासची कमाई ४९ सोनेरी यशाची. त्याला मागे सारणारा राफा आता पोहोचलाय ५३ विजेतेपदांवर!
फ्रेंच ग्रँडस्लॅम त्याने प्रथम जिंकली तेव्हा तो होता केवळ एकोणीस वर्षांचा सळसळता युवक. तेव्हा तो वापरायचा बिनबाह्यांचा टी शर्ट अन् गुडघ्याखाली येणाऱ्या (ज्याला आजची पिढी थ्री-फोर्थ म्हणते) अशा हाफ पँट. त्या वेळी त्याच्यात आजची व्यावसायिकता नव्हती अन् होती तारुण्याची बेछूट मस्ती. चॉकलेट केकचा मोह त्याला टाळता येत नव्हता. त्याचे काका व प्रशिक्षक टोनी नदाल यांना राफाचा एजंट कार्लोस कोस्टा यांनी विनवलं ‘बघा! राफा वेड्यासारखा चॉकलेट क्रॉइसँटवर, चॉकलेट केकवर ताव मारतोय. त्याला आवरा!’
पण टोनी नदाल गुरुजी महाबेरके. ‘नाही-नाही, त्याला मी अजिबात आवरणार नाही, तुम्हीही त्या फंदात पडू नका. त्याला हवा तेवढा ताव मारू दे चॉकलेट केकवर. त्यामुळे पोट बिघडतं याचा अनुभव त्याला येईल. त्यातूनच तो धडा घेईल.’
राफाला घडवणाऱ्या त्याच्या चमूत आहेत : एजंट कार्लोस कोस्टा. फिजिओ राफेल मेमो ऊर्फ तितीन. व्यायाम शिक्षक जोन कोरकाडेस. नाईकी कंपनीचे व्यवहार बघणारा जिगरी दोस्त जोरडी रॉबर्ट््स ऊर्फ तुत्स. डॉक्टर एंजल रुईझ. संपर्कप्रमुख बेनितो पेरेझ बारबादिल्लो. या सात जणांच्या पथकात केंद्रबिंदू टोनी नदाल गुरुजी व त्यांचे सहायक फ्रान्सिस रॉइंग.
तसं पाहिलं तर जॉफ्रे पोरता यांचंही मार्गदर्शन राफाला तरुणपणी लाभलंय. पण बालपणापासून ते आजपर्यंत त्यांचे खरे एकमेव प्रशिक्षक आहेत ते टोनी नदाल काका. आपल्या साऱ्या यशाचं श्रेय राफा मुक्तपणे देतो गुरुजी टोनी नदाल काकांना. निरागस राफाला काकांनी इतकं भारून टाकलं होतं की त्यांच्या सुरस व चमत्कारिक कहाण्यांवर तो भक्तिभावानं विश्वास ठेवायचा. टोनी काका सांगत, ‘मी अदृश्य होऊ शकतो.’ त्यांच्या कटात राफाचे आई-वडील सामील होत. त्यांच्या डोळ्यांसमोर टोनी बसलेले असले तरी ते एकमेकांत विचारत ‘टोनी कुठेय? नाहीसा कसा झाला? सात वर्षांच्या राफाची झुंज तब्बल बारा वर्षीय मुलाशी लागली तेव्हा त्यांना राफाला धीर दिला : ‘गुणफलक ०-५ असेल तेव्हा मी पावसाला बोलवेन व सामना स्थगित करून टाकीन.’ त्यानंतरचे तीन गेम राफाने जिंकले अन् राफाने टोनी काकांना आव्हान दिले. ‘पावसाला बोलवण्याची आता गरज नाही. मीच सेट जिंकतो.’
 
रॉजर फेडरर हा टेनिसचा नायक, राफाचा सर्वात तगडा प्रतिवर्षी. फेडररच्या असामान्यतेची जाणीव टोनी काकांना होती व आहे. ‘त्याची प्रतिभा, त्याच्या फटकेबाजीतील नेत्रदीपकता तुझ्यात नाही. चांगली चकमक (रॅली) रंगत असताना फेडररच अचानक विजयी फटका लगावू शकतो. पण त्याच्याविरुद्धच्या रॅली जास्तीत जास्त लांबवायचे, त्याच्या संयमाची परीक्षा कसोटी पाहण्याचे डावपेच तू दीर्घकाळ खेळत राहिले पाहिजेत.’
टोनी काकांनी लाडक्या पुतण्यापुढे पर्याय ठेवले. ‘सामना संपेपर्यंत झुंजत राहा व सारा शारीरिक-मानसिक त्रास सहन कर. एक तर सांगून मोकळा हो की तू थकला आहेस व निवृत्त हो किंवा अथक मेहनतीचा बोजा उचलण्याचा त्रास सहन कर अन् झुंजत राहा, खेळत राहा!’
राफाने तो गुरुमंत्र समजावून घेतलाय. तो झुंजतोय, खेळत राहतोय. पंधरा ग्रँडस्लॅमनंतर वयाच्या पस्तिशीपर्यंत स्पर्धात्मक खेळाचं ओझं वाहू पाहतोय. प्रत्यक्षात आता निवृत्त होत आहेत गुरू टोनी काका, पण त्यांचा पठ्ठ्या किल्ला लढवत राहणारच आहे.
बातम्या आणखी आहेत...