आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईशांत-अश्विनला बारा हत्तींचे बळ!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केवढा चमत्कार बघा : जे यश सचिन, द्रविड, सेहवाग, लक्ष्मण, गांगुली, कुंबळे, झहीर, धोनी (व हरभजन) अशा दिग्गजांना कमावता आलं नव्हतं, ते खेचून आणलंय विराट कोहलीच्या उगवत्या तार्‍यांनी! श्रीलंकेला श्रीलंकेतील मालिकेत हरवण्याची करामत, गेल्या बावीस वर्षांतील पाच मोहिमांत भारताला करून दाखवता आली नव्हती, तिचा आनंद भारत आता अखेर लुटत आहे. गेल्या तीन मोहिमांतील पराजयांची थोडीशी का होईना परतफेड करत आहे. अभिनंदन कर्णधार कोहली, उपकर्णधार रहाणे, प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या चमूचे.

कसा हा चमत्कार घडून आला? ज्या ईशांत शर्माला श्रीलंकेच्या गेल्या दोन दौर्‍यांत मिळून तेरा फलंदाज बाद करण्यासाठी ६४५ धावा मोजाव्या लागल्या होत्या, म्हणजेच एकेक बळीसाठी पन्नास धावांची किंमत द्यावी लागली होती. तो यंदा तर ३०२ धावांतच, तेवढेच तेरा बळी (सरासरी फक्त तेवीस) कसे घेत होता? ज्या अमित मिश्रने गेल्या दौर्‍यात अवघ्या चार फलंदाजांना बाद करण्यासाठी प्रत्येकी ४७ धावा दिल्या होत्या, त्याला कोणती जादू प्राप्त झाली की, आता पंधरा-पंधरा धावांच्या स्वस्त सौद्यात तो पंधरा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत राहिला? आणि एकवीस फलंदाजांना गुंडाळण्याआधी ज्या अश्विनला ऑस्ट्रेलियाच्या गेल्या दोन दौर्‍यांत ११४९ धावांचे महागडे मूल्य मोजावे लागले होते. त्याच अश्विनच्या खात्यात आता जमा झाले होते तितकेच, एकवीस बळी अवघ्या ३८० धावांच्या मोबदल्यात! ईशांतच्या कामगिरीत दुप्पट सुधारणा, अश्विन-मिश्र यांच्यात तिप्पट! ईशांत-अश्विन-मिश्र यांच्या अंगी, ऑगस्टच्या महिन्यात बारा हत्तींचं बळ आलं तरी कुठून?

या चमत्काराचा वेध घेताना थोडंसं तपशिलात जाऊया.
कोणत्याही संघाची बरीचशी भिस्त, सहसा पहिल्या चार फलंदाजांवर असते. पाचव्या क्रमांकाचा फलंदाजही महत्त्वाचाच. पण तिथून अष्टपैलू खेळाडू सुरू होतात. भारताचे पहिले चौघे, याआधी सेहवाग, गंभीर, द्रविड व तेंडुलकर, तर कांगारूंचे वॉर्नर, रॉजर्स, क्लार्क व स्मिथ. वीस वर्षांपूर्वी भारताचे गावसकर, श्रीकांत, वेंगसरकर व विश्वनाथ, तर विंडीजचे ग्रिनीज, हेन्स, रिचर्ड््स व रिचर्डसन. यंदाही भारताचे धवन-राहुल-पुजारा-रहाणे-कोहली हे पाचही पांडव शतकवीर.

श्रीलंकेच्या पहिल्या चौघांचा खेळ कसा झाला, ते आता बघूया. तीन कसोटींतील त्यांचे योगदान बघूया. सलामीवीर सिलवा ५ व शून्य, ५१ व १, मग ३ व २७. एकूण सहा डावांत ८७! सलामीवीर करुणरत्न ९ व शून्य, १ व ४६, मग तिसर्‍या क्रमांकावर ११ व शून्य. एकूण सहा डावांत ६७. सलामीवीर थरंगा ४ व शून्य. तिसर्‍या क्रमांकावर थिरुमन्न १३. संगकारा ३२ व १८. धम्मिका प्रसाद ३. चौथ्या क्रमांकावर संगकारा ५ व ४०. थिरुमन्न ६२. मॅथ्यूज २३. चंडिमल २३ व १८. या सार्‍यांची गोळाबेरीज अशी की, पहिल्या चौघांच्या सहा-सहा डावांत मिळून केवळ ३१५ धावा. धावसंख्या उभारणीची भिस्त ज्यांच्यावर, त्या चौघांचे सरासरी योगदान तेरा-तेरा धावांचे (आठव्या वा सहसा नवव्या क्रमांकावर खेळणार्‍या रंगना हेराथची अठरा धावांची सरासरी, अव्वल चौघांचे वस्त्रहरण करते) पहिल्या चौघांची सलामीही अर्थातच केविलवाणी. दोन बाद १५ व ३ बाद पाच, दुसर्‍या कसोटीत एक बाद एक व एक बाद आठ आणि तिसरीत दोन बाद ११ व दोन बाद दोन! एवढ्या कच्च्या पायावर डाव उभारी घेणार तरी कसा? यास कारणीभूत गोलंदाजांच्या नव्यानं लाभलेल्या कर्तबगारीपेक्षा, फलंदाजांचाच हलका खेळ. याउलट, गेल्या पाच मोहिमांत कोणत्या फलंदाजांचे आव्हान स्वीकारावे लागले ते बघूया. वेट्टीमुनी, रॉय डायस, दुलीप मेंडिस यांचा वारसा समर्थपणे चालवणार्‍यांची ही दोन दशके काय सांगतात?

सुरुवात होते १९९७ च्या मोहिमेपासून. तेव्हा सलामीवीर जयसूर्यचा धमाका ३४० व ३२ व ११ धावांचा. त्याचा साथीदार (व यंदा निवड-समिती अध्यक्ष) अटापटू २६, १७ व २९. महानाम २२५, ३७ व ३५ आणि अरविंद डिसिल्वा चक्क १२६, १४६ व १२०! त्या मालिकेत कोलंबोच्या खेळपट्ट्या निर्जीव होत्या खर्‍याच; पण केवढी भक्कम ही पायाभरणी. त्यानंतर वर्षभराने पुन्हा पाटा खेळपट्टीवर लढत. तिथे अटापटू ६, आरनल्ड (यंदा टीव्ही समीक्षक) ३४, जयवर्धन २४२ व हथुरसिंघ १४.
नव सहस्रकाच्या मुहूर्तावर २००१-०२ च्या मालिकेत. जयसूर्य व अटापटू या बिनीच्या जोडीसह संगकारा शतकवीर, तर जयवर्धनेची शतकांची जोडी. मग २००८ च्या मालिकेत आधीच्या मालिकेप्रमाणे श्रीलंकेचा सहाशे धावांचा डोंगर, पुन्हा उत्तम पायाभरणीच्या आधारावर व कोलंबोतील एसएससी मैदानातच. आणि २०१० च्या मालिकेतही तीच सहाशेची झेप मारताना संगकारा २१९ व जयवर्धन १७४. त्याच मालिकेत परमवितनाने दोन शतकांमार्फत हात धुऊन घेतलेले. ही सारी आकडेवारी, तिच्या आलेखातील चढउतार व यंदाची घसरगुंडी स्वयंस्पष्ट आहे. तिच्यावर भाष्य करण्याची गरज कुठे उरते? कोणतेही विजय अभिनंदनीय. पण त्यात हुरळून जाणं धोक्याचं व आत्मघातकी. आजचा श्रीलंकन संघ खिळखिळा झालाय. पाकपाठोपाठ विंडीजही त्यांना हरवू शकेल.

व्यापक पातळीवरचं एक उदाहरण देतो. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पाच वर्षांपूर्वी दिल्लीत झाल्या होत्या. त्यात शूटिंगमध्ये भारतानं लुटली होती तेरा सुवर्ण, अकरा रौप्य व पाच ब्राँझ अशी २९ पदकं. कुस्तीतही मल्लांनी हस्तगत केली होती दहा सुवर्ण, पाच व चार ब्राँझ अशी १९ पदकं. पण त्यानंतर दोन वर्षांनी लंडन ऑलिम्पिकमध्ये आपली गाडी थांबली दोन अधिक दोन अशा चार पदकांवर! सुज्ञांस अधिक काय सांगावे? अशा या कमकुवत संघाविरुद्धच्या मालिकेतून भारतानं काय कमावलं?
मला वाटतं, डगमगून न जाण्याच्या कसोटीवर हा संघ यशस्वी ठरला. पहिल्या कसोटीत दुसर्‍या डावात चंडीमन व थिरीमल हे झेलबाद असताना पंचांनी त्यांना नाबाद ठरवलं. एरवी तिसर्‍याच दिवशी भारत डावाने विजयी झाला असता. तसेच, दुखापतींमुळे धवन व विजय हे आघाडीवीर कधीच जोडीने खेळू शकले नाहीत. मग पुजाराने संधीचं सोनं करून दाखवले. अजिंक्य रहाणेचे डावातील पाच व पहिल्या सामन्यातील आठ झेल, एकनाथ सोलकरच्या स्मृती जागवणारे होते. या विजयाचे टॉनिक दक्षिण आफ्रिकेच्या कसदार संघाविरुद्ध भारताला हुरूप देऊ शकेल.

वि. वि. करमरकर, ज्येष्ठ क्रीडा समीक्षक