आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 ऑलिम्पिक! काय मिळालं?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सानिया म्हणते, मी एकविसाव्या शतकातील भारतीय नारी. भारतीय टेनिसमधील असंतुष्ट शिलेदारांपैकी एकाला शांत करण्यासाठी, माझा वापर तुच्छतापूर्वक आमिष म्हणून केला जातो, ही गोष्टच एकविसाव्या शतकातील महिलेचा भ्रमनिरास करणारी.

अखेर एकदाचं गंगेत घोडं न्हालं : ४३ वर्षीय लिएंडर पेसच्या सातव्यासलग ऑलिम्पिकवारीला हिरवा कंदील दाखवला गेला. पण त्यासाठी, गेल्या दशकाआधीच्या प्रभावशाली लिएंडरला साऱ्या सहकाऱ्यांच्या कित्ती-कित्ती मिनतवाऱ्या कराव्या लागल्या. मिनतवाऱ्या, तोलामोलाच्या महेश भूपतीच्या, तसेच त्याच्या वारसदार रोहन बोपन्नाच्या, आणि सानिया मिर्झाच्याही. त्यातून कटुप्रश्न अटळ उभा राहायचा. ४३ वर्षीय लिएंडर ऑलिम्पिक कशासाठी खेळतोय? १९९६ नंतर सलग सहा वांझोट्या ऑलिम्पिक वाऱ्यांचा ‘विक्रम’ गौरवास्पद का विदारक?
रिओ-ऑलिम्पिकमध्ये लिएंडरला जोडीदार म्हणून स्वीकारताना रोहन बोपन्नाने चार चिमटे काढून घेतलेत : ‘माझी लिएंडरची शैली परस्परांना ना तारक, ना पूरक. नॉर कॉम्पॅटिबल नॉर कॉम्प्लिमेंटरी. लिएंडर त्याची आजवरची कामगिरी यांची मी कदर करतो. पण मनापासून खूप-खूप प्रयत्न केल्यानंतरही आमचा ताळमेळ जमत नाही.’ बोपन्नानं पुन्हा स्पष्ट केलं की दुहेरीच्या जागतिक रँकिंगमध्ये पेसपेक्षा ७९ जागांनी मागे असलेला साकेत मायनेनी हाच आहे, त्यांचा पसंतीचा जोडीदार!
सानिया मिर्झाने तर पेससह पेसपेक्षाही भारतीय टेनिस संघटकांचे वाभाडे काढले. गेल्या ऑलिम्पिकमध्ये महेश भूपतीसह मिश्र दुहेरीत खेळण्याची तिची स्वाभाविक इच्छा होती. कारण लंडन-ऑलिम्पिकआधी फ्रेंच ग्रँड स्लॅम स्पर्धेत सानिया-भूपती यांनीच विजेतेपद पटकावलेलं होतं. पण लंडन ऑलिम्पिकच्या दुहेरीत पेसला साथीदार स्वीकारण्यास भूपती बोपन्ना यांनी चक्क नकार दिला होता! त्यामुळे पेसला जोडीदार मानावं, अशी गळ संघटकांनी सानियाला घातली होती! त्याची पुनरावृत्ती यंदाच्या ऑलिम्पिकसाठी होणे नाही, हे स्वाभिमानी सानियानं जाहीर केलं!
टेनिसच्या गणवेशाबाबात मुल्ला-मौलवींचे फतवे धुडकावून लावणारी सानिया कडवट भाषेत सांगते: मी आहे एकविसाव्या शतकातील भारतीय नारी. भारतीय टेनिसमधील असंतुष्ट शिलेदारांपैकी एकाला शांत करण्यासाठी एक निव्वळ आमिष म्हणून तुच्छतापूर्वक माझा वापर केला जावा, ही गोष्ट २१ व्या शतकातील माझ्यासारख्या स्त्रीला भ्रमनिरास करणारी वाटते, खुपते!”
सलग सातव्या ऑलिम्पिक वारीमुळे धन्य-धन्य झाल्यासारखं पेसला वाटतंय. पण पेस एवढ्यावर थांबत नाही, तरीही मायानगरीचं जाळं विणत राहतो. मी आहे विक्रमांचा भोक्ता. नवा इतिहास घडवत राहणं मला आवडतं.” माझा आक्षेप आहे तो पेसच्या भंपकबाजीला. लिएंडरला दैवत (चक्क आयकॉन!) मानणाऱ्यांची दिशाभूल करण्याच्या स्टंटबाजीला. लिएंडरच्या प्रयत्नशीलतेचे, चाळिशीतील फिटनेसचे कौतुक करून, त्याला खडा सवाल करूया : ‘विक्रम’? कोणते हे विक्रम? आणि ‘इतिहास घडवणं?’ हा कोणता इतिहास घडवणं? लिएंडर जी गोष्ट जाणतो, पण प्रसिद्धिमाध्यमांतील त्याचे जे भक्तगण भ्रमात आहेत, ती अशी दुहेरीपुरतं बोलायचं तर ग्रँड स्लॅमचं विश्व वेगळं अन् ऑलिम्पिकची दुनिया वेगळीच! ऑलिम्पिकमध्ये देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न येतो, म्हणून (ग्रँड स्लॅम दुहेरीकडे ढुंकूनही बघणारे) फेडरर-नदाल-जोकोविच-मरे आदी बरेचसे दिग्गज त्या आखाड्यात आवर्जून उतरतात. आणि दुहेरीतील १८ ग्रँड स्लॅम जिंकणाऱ्या पेसने, तसेच भूपती-बोपन्ना-सानिया यांनी ऑलिम्पिकमध्ये काय तीर मारले आहेत? १९९६च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये पेसचे एकेरीचे ब्राँझपदक, हा एक गौरवशाली अपवाद. एकेरीत १९९२ २००० या दोन्हीही ऑलिम्पिकमध्ये लिएंडर पहिल्याच फेरीत बाद. त्याला हरवणारा पेरूचा जेम यागा स्वीडनचा मिकाईल टिलस्ट्रॉम हे कुणी मोठे मान्यवर नव्हेत! सानिया मिर्झाचीही २००८ ऑलिम्पिकमध्ये एकेरीच्या पहिल्याच फेरीत, दोन सरळ सेट्समध्ये शरणागती.
दुहेरीत १८ ग्रँड स्लॅम अजिंक्यपदे काबीज करणारा लिएंडर ऑलिम्पिकमध्ये चार वेगवेगळ्या पुरुष जोडीदारांसह खेळलाय खेळेल. १९९२मध्ये कलावंत रमेश कृष्णनसह. चार वर्षांपूर्वी लंडनला नाइलाज म्हणून विष्णुवर्धन या कच्च्या लिंबूशी जोडी जमवण्याची खटपट करत. आता रिओत त्याचा जोडीदार असेल रुसलेला रोहन बोपन्ना. दरम्यानच्या चार ऑलिम्पिकमध्ये त्याला साथ देत होता महेश भूपती. पण या सहाही मोहिमांत, १८ ग्रँड स्लॅमचा विजेता पेस एकदाही ऑलिम्पिक जेतेपदावर नाव कोरू शकला नाही. एवढंच नव्हे, ना अंतिम फेरीची मजल मारू शकला किंवा दुहेरीतील ब्राँझचा दिलासा देऊ शकला. २००४मध्ये लिएंडर-भूपती निदान ब्राँझपदकाच्या सामन्यापर्यंत झुंजत राहिले. त्या वर्षी स्वित्झर्लंडचे फेडरर-ऑलेग्रो, अमेरिकेचे रॉडिल-फिश यांना सरळसरळ सेट्समध्ये नमवू शकले. एरवी मात्र पेसचे आव्हान दोनदा उपांत्यपूर्व फेरीत तीनदा दुसऱ्याच फेरीत गुंडाळले गेले. आणि येथे हेही सांगितले पाहिजे की भूपती-बोपन्ना हेही लंडन-ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्याच फेरीचा अडथळा पार करू शकले नव्हते. मिश्र स्पर्धेत सानियाच्या मनाविरुद्ध भूपतीऐवजी पेसला जोडीदार खेळवले गेले. ती जोडी उपांत्यपूर्व फेरी पार करू शकली नव्हती. पण निदान अव्वल सिडेड जोडीला ५-७, ६-७ झुंजवल्याचं थोडंसं समाधान त्यांनी पाठीराख्यांना दिलं होतं.
१९९८ ते २००४ पर्यंत लिएंडर-भूपती किल्ला लढवत होते. पण सुरुवातीला कुणालाही हेवा वाटेल अशी ही ली-हश जोडी, पाहता पाहता फुटली. छाती पुढे काढत, छातीने छातीला टाळी देण्याची त्यांची शैली, त्यांच्यातील जवळीक दाखवत होती. मग अचानक प्रेमभंग झाल्यासारखे त्यांनी नवनवे जोडीदार जोडले. नेमकं काय घडलं ते का टाळता आलं नाही, ते आजवर स्पष्ट झालेलं नाही.
तेव्हापासून आजतागायत, ऑलिम्पिकआधीच्या काही महिन्यांत भारतीय टेनिसपटूंचे फुगे इतके फुगवले जातात, की बघणाऱ्यांना भुरळ पडावी. एकदा ऑलिम्पिक सुरू झालं रे झालं की हे फुगे फोडण्यास टाचणीही पुरेशी पडते! अगदी विनाकारण लोक अवाक् होतात; विनाकारण, कारण ग्रँड स्लॅम दुहेरीचं विश्व वेगळं अन् ऑलिम्पिकची दुनिया वेगळीच! िलएंडरला खुशी सलग सातव्यांदा ऑलिम्पिक सहभागाची, तुम्हा-आम्हाला दु:ख वांझोट्या वाऱ्यांचं!
बातम्या आणखी आहेत...