आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारभूत नव्हे, आधारभूत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनाच्या तालावर शरीर चालते की मन हे शरीराच्या हुकमांनुसार मान झुकवतं? इच्छाशक्ती माणसाच्या हातून व शरीरामार्फत काय काय गोष्टी घडवून आणू शकते? अशा सार्‍या प्रश्नांची उत्तरे सापडतात, कांगारू कर्णधार मायकेल क्लार्कच्या विश्वचषक विजयी मोहिमेत. क्लार्क हा संघाला भारभूत ठरतोय, अशा शंका घेतल्या जात होत्या. तशी टीका केली जात होती. प्रशिक्षक व निवड समिती सदस्य क्लार्कला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करत होते. पण राष्ट्रीय संघाला आपण भारभूत नव्हे, तर आधारभूत होतो, आहे व असू, असे त्याने सिद्ध केले मैदानात आणि मैदानी कर्तबगारीचा डोलारा उभारला, मैदानाबाहेरील तपश्चर्येच्या ताकदीतून.

मायदेशीचा विश्वचषक सुमारे दोन महिन्यांवर आला अन् क्लार्कच्या मांडीमागचे स्नायू जबरदस्त दुखावले. त्यांवर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली. जोडीला पाठदुखीचे दुखणे. ते तर कायमचे पिच्छा पुरवणारे. पूर्णपणे फिट नसूनही भारताविरुद्ध सलामीच्या कसोटीत मोठी शतकी खेळी खेळणारा क्लार्क कळवळला. ‘माझे क्रिकेट बहुधा संपलेच!’ अशी भाषा करू लागला. कसोटीसाठी स्टीव्ह स्मिथ व झटपट कसोटीकरिता जॉर्ज बेली यांच्याकडे नेतृत्वाची सूत्रे सोपवली गेली. क्लार्कच्या कारकीर्दीपुढे खरंच पूर्णविराम पडणार होता की स्वल्पविराम? भारताविरुद्धची कसोटी मालिका त्याला अर्धवट सोडावी लागली. तरीही मायदेशातील विश्वचषकासाठी पूर्णपणे फिट ठरण्याचा चंग त्याने बांधला होता; पण ऑस्ट्रेलियन मंडळ व व्यवस्थापन त्याला कोणतीही दयामाया दाखवण्यास थोडंच तयार होतं? १४ फेब्रुवारीच्या इंग्लंडशी होणार्‍या लढतीसाठी तो फिट नव्हता. तेव्हा कप्तान जॉर्ज बेलीने पाचव्या क्रमांकावर ६९ चेंडूंत ५५ धावा काढल्या व अ‍ॅरॉन फिंचसह १६५ चेंडूंत १४६ धावांची झकास भागीही रचली! प्रशिक्षक डॅरन लीमन व निवड समितीप्रमुख जेफ मार्श यांनी फर्मान काढले, फिटनेस सिद्ध करण्यासाठी क्लार्कला आणखी आठ-दहा दिवसांची मुदत दिली!

अभूतपूर्व चलबिचल : मायदेशातील विश्वचषक सुरू झालेला; पण यजमान ऑस्ट्रेलियन संघाने मायकेल क्लार्क, जॉर्ज बेली, स्टीव्ह स्मिथ या तीन संघनायकांच्या तलवारी एका म्यानात खोवलेल्या. यापैकी नेमकी कोणती तलवार नऊ सामन्यांच्या मोहिमेसाठी म्यानाबाहेर काढली जाणार? नऊपैकी दोन लढती संपल्यावरही सारीच प्रश्नचिन्हं. सारीच अनिश्चितता. मोहिमेतील सर्वात महत्त्वाच्या गोष्टीबाबत अभूतपूर्व चलबिचल! आणि ही चलबिचल, ही अस्थिरता कोणत्या संघाच्या गोटात? तर गेल्या पाऊणशे वर्षांत, डॉन ब्रॅडमन, रिची बेनॉ, इयन चॅपल, अ‍ॅलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ आदी आदर्शवत कर्णधार देणार्‍या कांगारूंच्या गोटात! विश्वचषकासाठी प्रमुख दावेदार मानलेल्या संघांचे कर्णधार, अधिकारपदी स्थिरावलेले. ब्रेंडन मॅकुलम, एबी डिव्हिलियर्स, महेंद्रसिंग धोनी, ऐनलो मॅथ्यूज प्रभृतींचे नेतृत्व सर्वमान्य व वादातीत. पण अजब बाब अशी की, ऑस्ट्रेलिया होती कायमस्वरूपी कर्णधाराच्या शोधात!

क्लार्ककडे कर्णधारपद सोपवलं गेलं, ते २०११च्या विश्वचषकातील कांगारूंच्या पराभवानंतर. तेव्हाच्या संघनायक पाँटिंगचा तो आवडता खेळाडू. भावी कर्णधार व आपला वारसदार म्हणून पाँटिंग क्लार्ककडे बघायचा, त्याचे नाव घ्यायचा. आपल्या हाताखाली त्यालाच उपकर्णधार नेमले जावे, हीच होती त्याची इच्छा. त्यानं अधिकाधिक जबाबदार्‍या उचलण्यात पुढाकार घ्यावा, असेच पाँटिंग व प्रशिक्षक टीम नीलसन यांचे प्रयत्न होते. मात्र, त्यांना मायकेल क्लार्क ऊर्फ ‘पप’ ऊर्फ ‘क्लार्की’ची साथ मिळत नव्हती, ही त्यांची व्यथा.

असा कसा हा उपकर्णधार? नवनवीन मोहिमांच्या अनुभवातून आपण जे काय शिकतो, त्या त्या अनुभवांचा खजिना तरुण सहकार्‍यांच्या हवाली करणे, करत राहणे, हे आपले कर्तव्यच हीच पाँटिंगची भावना होती. आपल्या निवृत्तीनंतर तो वारसा ‘पप’ने पुढे चालवावा, ही त्याची स्वाभाविक अपेक्षा; पण उपकर्णधार झाल्यावर पहिल्या दोन वर्षांत तरी ‘पप’ने पाँटिंगचा अपेक्षाभंग केला होता. पाँटिंग विषादाने म्हणाला होता की, आपली कामगिरी उत्तम होत असेल तर ड्रेसिंग रूममध्ये उत्साहाने धावपळ व बडबड करणार्‍या, पण व्यक्तिश: अपेशी ठरत असल्यास मख्ख, कोरडा चेहरा करून कोपर्‍यात चूपचाप बसणार्‍या एका जुन्या सहकार्‍याची आठवण क्लार्कच्या त्या वेळच्या वर्तनामुळे होत होती.

मॅट हेडनच्या बहुधा शेवटच्या कसोटीत, उपकर्णधाराला व भावी कर्णधाराला न साजेशी आत्मकेंद्रित प्रवृत्ती मायकेल क्लार्क उर्फ पपला लपवता आली नव्हती. सामन्यानंतर सहकार्‍यांच्या अनौपचारिक गप्पागोष्टींसाठी त्याच्याकडे फुरसत होतीच कुठे? अशा वेळी सारे खेळाडू आनंदाने राष्ट्रगीत एकसाथ गातात. ते केव्हा एकदाचे उरकलं जातय, याचीच तो वाट बघत होता. सर्वांसह त्यानेही शेवटपर्यंत थांबले पाहिजे, अशी समज त्याला दिली होती; पण पपची कुरकूर चालूच! मग सायमन कॅटिचने त्याला चक्क पकडून ठेवले. तरीही पप सटकलाच! ‘पपला सांगण्यात अर्थ नाही, तो तसलाच आहे’, असं सारे एकमेकांना म्हणत राहिले होते. पण परिस्थितीने पपला बदललं. उपकर्णधार पप कर्णधार क्लार्की झाला व सहकार्‍यांचा विचार आस्थेने करू लागला. फिटनेसबाबत कुणाला बोलायला जागा राहू नये, याची काळजी घेऊ लागला. प्रशिक्षक लीमन व निवड समिती प्रमुख मार्श यांनी जाहीर तंबी व मुदत दिल्यावर, त्याने शब्दाशब्दी टाळली. टीकेला उत्तर बॅटनं, फिटनेसनं व कुशल नेतृत्वानं द्यायचे हे पथ्य शांत, संयमानं पाळलं.

अंतिम सामन्याचा एक किस्सा सांगतो. ऑस्ट्रेलियन संघाने हॉटेल सोडण्याआधी तासभर मायकेल क्लार्क मैदानात होता आणि हे तो नियमितपणे करत होता. तो तास त्याने राखून ठेवला होता वैयक्तिक पूर्वतयारीसाठी. विशिष्ट व्यायाम व वॉर्म अप यासाठी. त्याच वेळात तो फलंदाजीचा विशिष्ट सराव करायचा. संघाच्या सरावाच्या वेळात वैयक्तिक गोष्टी करायच्या नाहीत ही त्याची व्यापक वृत्ती. जुन्या आत्मकेंद्रित प्रवृत्तींचा त्याग करणारी व संघहिताशी बांधिलकी बाळगणारी वृत्ती. विश्वचषकातील खेळ पन्नास व पन्नासच षटकांचा असतो. डोळ्यांपुढे किमान सव्वातीनशे धावांचे लक्ष्य त्याने सतत ठेवले. मॅक्सवेलसारख्या धडाकेबाजाला फलंदाजीत आपल्या वरचा किंवा निदान पाचवा-सहावा क्रमांक दिला. फटकेबाज फॉकनरची बॅट गंजू नये म्हणून दोनदा तरी त्याला बढती दिली. आशिया, युरोप, आफ्रिका, अमेरिका व यांपाठोपाठ ओशनिया खंडातील विश्वचषक संघास जिंकवून दिला. भारभूत नव्हे, तर पंचखंडातील विजयांना आधारभूत ठरलेला असा हा कर्णधार क्लार्क!
वि. वि. करमरकर
ज्येष्ठ क्रीडा समीक्षक